रत्नागिरीत आढळून आला 'हा' दुर्मिळ पक्षी

16 Sep 2022 21:15:43
bbbe
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावामध्ये निळ्या दाढीवाला राघू या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी बुधवारी दि. १४ सप्टेंबर रोजी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. इंग्रजीत ह्या पक्ष्याला Blue-bearded Bee-eater असे म्हणतात. सदरचा पक्षी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये व चिपळूण तालुक्यातील घाटमाथा या भागामध्ये या आधी दिसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अपुऱ्या फोटोग्राफिक रेकॉर्ड व नोंदी अभावी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रथमच दिसला असण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आहे.
 
 
स्थानिक पक्षी अभ्यासक ओंकार मोघे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. आपल्या कॅमेऱ्यातून या पक्ष्याचे छायाचित्र टिपले आहे. सर्वसाधारण हिरवट- निळसर रंग, गळ्याखाली निळसर रंगाची दाढी सारखी भासणारी पिसे , आणि थोडा बाक असलेली चोच असे ह्याचे वर्णन करता येईल. ओलसर पानझडी जंगले आणि गर्द सदाहरित वनांमध्ये त्याचा सहवास असतो. भारतातील आसाम, हिमालय, सह्याद्री घाट, सातपुडा पर्वतरांगा ह्या ठिकाणी त्याचे मुबलक प्रमाणात दर्शन होते.भारतासह नेपाळ, व्हिएतनाम, थायलंड इत्यादी देशांमध्येही त्याचे अस्तित्व आहे. विविध प्रकारचे उडणारे कीटक, मधमाश्या हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0