अमृत महोत्सवी वर्षातील ‘मराठवाडा मुक्ती दिन’

    14-Sep-2022
Total Views |
marathwada muktisangram

 
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...
 
 
दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. नुकताच आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला. परंतु, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील देशाचा काही भाग पारतंत्र्यात होता. परकीयांचे अत्याचार सहन करत होता. हा भाग मुस्लीमशासक निजाम, डच, पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. त्यावेळी एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा, गुलामगिरीतून मुक्तीचा आनंद साजरा करत होता, तर दुसरीकडे फाळणीच्या जखमादेखील त्रासदायक ठरत होत्या. अशा परिस्थितीत दक्षिण भारताच्या मधोमध हैदराबादचा निजाम नावाचा एक क्रूर शासक भारताच्या विभाजनाची आग्रही भूमिका घेऊन, पाकिस्तानप्रमाणे स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होता. पाकिस्तानसोबत जवळीक साधत होता. कासीम रिझवीच्या माध्यमातून हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार करत होता. परंतु, हैदराबादसह मराठवाड्यातील जनतेच्या एकजुटीने आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारतात सामील होण्याच्या जिद्दीने निजामाला गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि मराठवाडा भारताचा अविभाज्य भाग झाला.
 
 
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ५६५ संस्थांनांपैकी हैदराबाद, जम्मू व काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती. क्रूर निजामाच्या राजवटीतील त्यातील हैदराबाद हे एक मोठे संस्थान होते. मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक असलेला महत्त्वाचा भाग होता. हैदराबाद संस्थानात तेलंगण, मराठवाडा व कर्नाटक राज्याचा काही भाग होता. एकाच भारतमातेची ही लेकरं होती. परंतु, काहींना एक न्याय अन् काहींना वेगळा न्याय मिळत होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतरच्या काळात मराठवाडा आतून धगधगत होता, अत्याचार सहन करत स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि याच स्वाधीनता संग्रामाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व लाभले आणि मराठवाडा मुक्तीचा लढा सुरू झाला.
 
 
निजाम अत्यंत धर्मांध, धूर्त, हिंदूद्वेष्टा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कट्टरपंथी कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली ‘रझाकार’ नावाने एक क्रूर निमलष्करी दल स्थापन केले होते. या दलाने तेथील बहुसंख्याक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. त्या अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. हिंदू मंदिरे तोडली जात होती. अशा परिस्थितीत हिंदूंना धर्मांतरण करण्यासाठीदेखील प्रवृत्त केले जात होते. ‘मुस्लीम व्हा अथवा मरा’ अशी क्रूर वागणूक हिंदू जनतेला दिली गेली. निजामाचे प्रतिनिधी जबरदस्तीने कर वसूल करणे, लुटालूट करणे, हिंदू स्त्रियांची अब्रू लुटणे, हिंदूंची घरे जाळणे, जमिनी बळकावणे, सरकारी कर्मचार्यांवर हल्ले करणे इत्यादी अमानुष, लैंगिक कृती करत असत. या भागात उर्दू भाषेची सक्ती करण्यात आली होती. तसेच हिंदूंना गुलाम बनवण्याच्या मुस्लिमांच्या अधिकारावर कासीम रिझवीने अधिक भर दिला होता.
 
 
देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद मुक्तीची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांच्या दृष्टीने काश्मीरप्रमाणेच हैदराबाददेखील महत्त्वाचे संस्थान होते. त्यामुळेच हैदराबाद स्वतंत्र होणे हे त्यांच्यासाठी एकसंघ भारताचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते. हैदराबादमध्ये लष्करी कारवाईने हस्तक्षेप करावा लागणार, याची सरदार पटेलांना सुरुवातीपासूनच कल्पना होती. निजाम शरण येत नाही, त्या उलट सामान्य जनतेवरील अन्याय वाढले आहेत, हे लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने दि. १३ सप्टेंबर, १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यास सुरुवात केली. परंतु या मोहिमेला ‘लष्करी कारवाई’ न म्हणता ‘पोलीस अॅक्शन’ असे म्हणावे, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवले होते आणि त्याप्रमाणेच या कारवाईस संबोधण्यात आले व ‘ऑपरेशन पोलो’च्या माध्यमातून निजामाच्या अन्यायी व जुलमी मानसिकतेला भारतीय लोकशाही मार्गाची परिभाषा समजावून सांगण्यात आली.
 
 
भारतीय सैन्याने सरकारच्या आदेशानुसार मराठवाड्यासह हैदराबाद संस्थानात सैनिकी कारवाया करण्यास सुरूवात केली. मराठवाड्यातील जनतेसाठी गुलामगिरीची सावली नष्ट करण्याचा हा काळ होता. दि. ९ सप्टेंबर, १९४८ रोजी हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश सैन्य दलाला देण्यात आले. ले. जनरल राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, डी. एस. ब्रार, ए. ए. रुद्र यांनी ही योजना राबविली. दि. १३ सप्टेंबरच्या सकाळी कारवाईस सुरुवात झाली. पाच विविध ठिकाणावरून सैन्य संस्थानात शिरले. मुख्य चढाई सोलापूरहून सुरु झाली. विजयवाडा, कुर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे छत्रपती संभाजीनगरकडून (औरंगाबादकडून), वाशिममार्गे हिंगोलीकडून, अशा विविध मार्गांनी भारतीय फौजा संस्थानात घुसल्या आणि एकापाठोपाठ एक भाग काबीज होत गेला. पोलीस कारवाई सुरु होताच पुढील काही दिवसांत भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानामधील सर्व महत्त्वाच्या केंद्रावर ताबा मिळवला.
 
 
मराठवाड्याच्या गावागावांत हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पुढाकार घेतला. हैदराबाद मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रिझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरुच होते. परंतु, दुसर्या बाजूला मुक्तीसंग्राम लढा वेगात सुरु होता. सर्वसामान्य जनतेत राहून गनिमी कावा करून अथवा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेक नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. ज्यामध्ये स्त्री, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. या सर्वांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांसारख्या असंख्य नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले.
 
 
मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई अशी ओळख निर्माण झालेल्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चन्द्र जाधव, नळदुर्ग सर करणारे धाराशिव जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेडचे देवराव कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गावागावात हा लढा लढला गेला. त्याचप्रमाणे श्रीधर वर्तक, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील यांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता भारतात विलीन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अधुर्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा अविभाज्य भाग झाला.
 
 
सर्वसामान्य जनतेने मनावर घेतले तर काय होऊ शकते, याचा परिचय सांगणारा लढा म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची खरी ओळख आहे. हा किती मोठा संग्राम होता! किती महान क्रांतिकारकांनी बलिदान दिले! किती मोठा संघर्ष केला! सरदार पटेलांची भूमिका किती महत्त्वाची होती आणि किती मोठा इतिहास रचला गेला होता! हे सर्व मराठवाड्याच्या भूमीशिवाय इतर कोणीही अनुभवलेले नाही किंवा इतर कोणी सांगू देखील शकत नाही!
 
 
तेलुगु भाषिक तेलंगण, मराठी भाषिक मराठवाडा आणि कन्नड भाषिक कर्नाटकचा काही भाग असलेले हैदराबाद संस्थान अवघ्या चार ते पाच दिवसांत भारतात विलीन झाले. अवघ्या काही तासांत निजाम शरण आला. याचे जेवढे श्रेय तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते, तेवढेच श्रेय मराठवाड्यातील जनतेलादेखील जाते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला यश आले. सरदार वल्लभभाई पटेल हेच खर्या अर्थाने या विजयाचे नायक होते. १९४९ साली फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादला भेट दिली. त्यावेळी निजामाने विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. आजही हैदराबादसह मराठवाड्यातील जनतेच्या मनात सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्थान ‘आमचा स्वातंत्र्यदाता’ असेच आहे.
 
 
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, ’मराठवाडा मुक्ती संग्रामा’तील क्रांतिवीरांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
 
 
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हैदराबादसह मराठवाडा प्रदेशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपल्या पूर्वजांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे व देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी व स्वाभिमानासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, हीच या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल!
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
 
 
मंगलप्रभात लोढा
 
(लेखक राज्याचे पर्यटनमंत्री आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.