पाडापाडी...

12 Sep 2022 22:18:55
KHANDALA 
 
 
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या खंडाळा घाटातला आणि तब्बल १९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्यात आला. हा पूल प्रसिद्ध आणि अनेक स्मृती जगविणारा होता, त्यामुळे तो पाडताना हळहळ देखील व्यक्त झाली होती. आता हे आठवण्याचे कारण एवढेच की, आता येत्या काही दिवसांत चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे कामदेखील सुरू होणार आहे. अमृतांजन पूलदेखील स्फोटकांच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आला होता.विशेष म्हणजे, त्यावेळी हा पूल पाडण्याचे कारणदेखील एक्सप्रेस- वे वर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूककोंडी हेच होते.
 
 
कोरोना काळात एप्रिल २०२० मध्ये या पुलाच्या पाडण्याच्या कामास सुरुवात झाली होती. त्यावेळी वाहतूक बंद होती म्हणून फार अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या, आता चांदणी चौकातील वाहतूक वळविणे म्हणजे त्या पूल पाडण्यापेक्षा प्रशासनासाठी वाहतूक वळविणे दिव्य होऊन बसले आहे. त्या तुलनेत आता या महामार्गावर वाहतूकदेखील जवळजवळ तिपटीने वाढली आहे.
अमृतांजन पूल पाडताना आधुनिक ड्रिल मशीनच्या साह्याने पुलाला ४० होल पाडण्यात आले होते, ‘नवयुग’ कंपनीतर्फे हे काम करण्यात आले होते. स्फोटकांचा वापर करून हा पूल पाडण्यात आला होता.
 
 
आता चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. हा पूल पाडून तेथे ११५ मीटर लांब आणि ३६ मीटर रुंद पूल उभारला जाईल. चांदणी चौकातील पूल पाडताना यंत्रणेपुढे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान यावेळी आहे. पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. त्याचे नियोजन केले जात आहे. मुंबई-बंगळुरू अशी ही वाहतूक खंडित होता कामा नये, म्हणून तयारी केली जात आहे. रोज या मार्गावर ये-जा करणार्यांना त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागणार आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे हाच उद्देश आहे, मात्र तो कालांतराने तीच समस्या उभी ठाकत असल्याने पुलाच्या जीवावर बेतते. अमृतांजन, चांदणी चौक पुलानंतर कुणाचा नंबर लागू नये एवढेच आणि वाहतूक मात्र सुरळीत व्हावी हा उद्देश सफल व्हावा.
 
 
पाडापाडीनंतर आपण उभारणीचादेखील कानोसा घेऊ. निर्बंधमुक्त गणेशोत्सवात याचा विशेषत्वाने प्रत्यय आला. छोट्या छोट्या व्यवसायिकांनी जी उभारी घेतली, ती दिमाखदार होती. गेली दोन वर्षे मनासारखा व्यवसाय करू न शकणारे हे लोक यानिमित्ताने हुरुपाने बाहेर पडले आणि पुन्हा एकदा त्यांचे जीवनचक्र आणि समाजाचे आर्थिक चक्र नियमित फिरू लागले. उत्पन्न बंद झाल्याची भावना दूर झाली, नैराश्यातून बाहेर पडताना मिळकत सुरू झाल्याने जगण्याची आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळत गेली.
 
 
माणसाचे जीवनात उभे राहणे हेदेखील एक दिव्य असते. आता अनेक पर्याय उभे राहण्यासाठी आणि सक्षम तसेच ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी उपलब्ध आहेत. सुदैवाने केंद्र आणि राज्यातील सरकारदेखील अशा उभारणीला बळ देण्यास अनुकूल असल्याने पुणे शहरालगत चारही बाजूने आता प्रगतीची उभारणी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी प्रशासकीय पातळीवर अगदी वेगाने काम सुरू झाले आहे.
 
 
मेट्रो रेल्वे ही येत्या काळात पुण्यात दिमाखात धावताना दिसणार आहे. ही रेल्वे प्रवाशांच्या खिशाचा भार तर हलका करतेच, मात्र त्याचवेळी वाहतूककोंडीसाठी सक्षम पर्याय आणि सरकारच्या तिजोरीत भरदेखील घालीत असते. पुण्यातील वाढती गर्दी टाळण्यासाठी आता ‘प्रदूषण ई-बसेस’ रस्त्यावर धावू लागल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणे गरजेचे आहे, हेदेखील प्रत्येक कारणासाठी वाहने वापरणार्या पुणेकर नागरिकांना पटू लागले आहे. यामुळे पुण्याचे आरोग्य सुधारेल, हे निश्चित.
 
 
‘जायका’ प्रकल्पाला वेग मिळण्याची चिन्हे असून, विमान वाहतूकदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ‘कार्गो हब’ आणि ‘कॉरिडॉर’ प्रकल्प हे भविष्यात पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकतील यात शंका नाही. यामुळे रोजगार निर्मिती होणारच आहे, पण या प्रकल्पाच्या लाभातून केवळ एका व्यक्तीची उभारणी नव्हे, तर राष्ट्रउभारणीसदेखील बळ मिळणार आहे. एकूणच पुण्यातील ही पाडापाडीची आणि उभारणीची प्रक्रिया केवळ खेळखंडोबा आणि वेळेचा अपव्यय नाही, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
 
 
अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0