नुकतेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य प्रतिमेचे दिल्लीतील ‘इंडिया गेट’च्या ‘कर्तव्यपथा’वर पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पण, आजही नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कारण, नेताजींच्या मृत्यूनंतर पुढे सुमारे दोन दशकं आपल्या देशाचे राजकारण या मुद्द्याभोवती फिरत होते आणि आजही फिरत आहे. नेताजींच्या मृत्यूच्या वादातील बारकावे समजून घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यलढ्यातील परिस्थिती समोर ठेवावी लागेल.
दि. ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ‘इंडिया गेट’ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नेताजींचा हा ग्रॅनाईटचा पुतळा २७ फूट उंचीचा आणि ६५ मेट्रिक टन वजनाचा आहे. हा पुतळा अरुण योगीराज या कलाकाराने तयार केला आहे. तसेच आधीचा ‘राजपथ’ आता ’कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. भारतीयांच्या मनात आजही नेताजींबद्दल अतोनात आदराची भावना आहे.
दुर्दैवाने नेताजींच्या मृत्यूबद्दल आजही वाद आहेत. कोणत्याही देशाच्या राजकीय जीवनाच्या इतिहासातील काही वादग्रस्त मुद्दे पुन्हा चर्चेत येत असतात. राज्यशास्त्राचे काही अभ्यासक तर असे मानतात की, राजकीय जीवनात ’इतिहास’ असे काही नसतेच. इतिहासातील कोणता मुद्दा केव्हा चर्चेत येईल आणि त्याचे राजकारण केले जाईल, हे सांगता येत नाही. हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या प्रभू रामचंद्रांचा जन्म कुठे झाला, या मुद्द्यावरून बघता बघता आपल्या देशात १९९०च्या दशकात रामजन्मभूमीची चळवळ उभी राहिली. पुढे सुमारे दोन दशकं आपल्या देशाचे राजकारण या मुद्द्याभोवती फिरत होते आणि आजही फिरत आहे. नेताजींच्या मृत्यूच्या वादातील बारकावे समजून घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यलढ्यातील परिस्थिती समोर ठेवावी लागेल.
१९२०च्या असहकार चळवळीनंतर गांधीजी काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे दोन तरुण नेते काम करत होते. गांधीजींना नेताजींपेक्षा पंडित नेहरु जास्त आवडत होते, हे तर उघड गुपित. यात व्यक्तिगत आवडनिवड जशी होती, तसेच राजकीय तत्त्वज्ञानाचासुद्धा मुद्दा होता. गांधी व नेताजींमधील मतभेद तात्त्विक स्वरूपाचे होते. वास्तविक पाहता पंडित नेहरू काय किंवा नेताजी काय, हे दोघे तरुण नेते समाजवादी विचारांकडे आकृष्ट झाले होते.
पण, या दोघांपैकी एकानेही १९३६ साली काँग्रेसअंतर्गत स्थापन झालेल्या ‘काँग्रेस समाजवादी पक्ष’ या गटाचे सभासदत्व घेतले नव्हते. पुढे नेताजी १९३७ साली काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेस पक्षात नियोजन मंडळ स्थापन केले व पंडित नेहरूंना याचे अध्यक्षपद दिले. जेव्हा १९३८ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक आली, तेव्हा नेताजींनी पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याचा इरादा जाहीर केला. या खेपेस गांधीजी नेताजींना दुसर्यांदा अध्यक्ष होऊ देण्यास राजी नव्हते.
नेताजींनी गांधीजींच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अध्यक्षपदाचा अर्ज भरला. परिणामी, गांधीजींचे आशीर्वाद लाभलेले डॉ. पट्टाभी सीतारामैय्या विरुद्ध नेताजी असा सामना झाला. ही लढाई नेताजींनी दणदणीत बहुमताने जिंकली. यामुळे गांधीजी कमालीचे नाराज झाले. नंतर नेताजींनी जपानच्या कैदेत असलेल्या भारतीय युद्धकैद्यांच्या मदतीने ’आझाद हिंद सेना’ स्थापन केली होती. दुसरे महायुद्ध सुरू असताना ही सेना कोहीमापर्यंत आली होती.
अभ्यासकांनी नमूद करून ठेवले आहे की, तेव्हा सर्व देश नेताजीमय झाला होता. तेव्हा जर नेताजी खरेच भारतात आले असते, तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते, यात तीळमात्र संशय नाही. पण, पुढे लढाईचे फासे फिरले. नंतर नेताजींच्या विमानाला दि. १८ ऑगस्ट, १९४५ रोजी अपघात झाला. तेव्हापासून आजपर्यंत नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही.
नेहरूंना नेताजींच्या अफाट लोकप्रियतेचा अंदाज होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर इंग्रज सरकारने आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर देशद्रोहाचा खटला भरला होता. या सैनिकांची लोकप्रियता बघून गांधीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागला व या सैनिकांच्या बचावासाठी निधी व निष्णात वकिलांची व्यवस्था करावी लागली होती. तेव्हा जर गांधीजींनी ’मला हिंसा मान्य नाही व हिंसाचार करणार्यांसाठी मी काही प्रयत्न करणार नाही,’ असे म्हटले असते तर लोकांनी गांधीजींना बाजूला सारून त्या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना मदत केली असती.
मात्र, याच गांधीजींनी १९३० साली इंग्रज सरकार जेव्हा भगतसिंग, राजगुरू व बटुकेश्वर दत्त या तीन तरुणांना फाशी देण्यात येणार होती, तेव्हा शिक्षा रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे ठामपणे नाकारले होते. उलटपक्षी गांधीजींनी ’हे वाट चुकलेले देशभक्त आहेत,’ असे उद्गार काढले होते. असाच प्रकार गांधीजी आझाद हिंद सेनेतील सैनिकांबद्दल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. एवढेच नव्हे, तर खुद्द नेहरू वकिलाचा काळा कोट घालून न्यायालयात हजर राहत असत.
या खटल्यातील मुख्य वकील होते, मुंबईचे नामवंत वकील भुलाभाई देसाई. याच नेहरूंनी जेव्हा आझाद हिंद सेना कोहिमाजवळ पोहोचली होती तेव्हा ’मी या सैनिकांना रोखण्यासाठी स्वतः बंदूक घेऊन सीमेवर जाईन’ असे जाहीर केले होते. पण, जेव्हा आझाद हिंद सेना नेताजींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती, तेव्हा नेहरू व काँग्रेसने त्यांना जवळ केले.
नेताजींच्या मृत्यूबद्दल इंग्रज सरकारने चौकशी केली आणि निष्कर्ष काढला की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला. याबद्दल तेव्हासुद्धा संशय व्यक्त केला जात होता.
शेवटी १९५६ साली भारत सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी शहानवाझ खान समिती स्थापन केली. या समितीत नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोसदेखील होते. या समितीने नेताजींचे दि. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले, असा निष्कर्ष काढला. मात्र, समितीच्या अहवालावर सुरेशचंद्र बोस यांनी सही करण्यास नकार दिला. १९६६ साली सुरेशचंद्र बोस यांनी जाहीर केले होते की, लवकरच नेताजी भारतात परत येणार आहेत.
तेव्हा पुन्हा एकदा नेताजींच्या मृत्यूचे गूढ चर्चेत आले. १९७० साली इंदिरा गांधी सरकारने न्यायमूर्ती खोसला समिती स्थापन करून पुन्हा एकदा याची चौकशी करण्याचे आदेश दिले. या समितीनेसुद्धा नेताजींचा मृत्यू दि. १८ ऑगस्टच्या अपघातात झाला, असाच निष्कर्ष काढला. नरसिंह राव सरकारने १९९२ साली नेताजींना मरणोत्तर ’भारतरत्न’ प्रदान केले. पुढे १९९९ साली वाजपेयी सरकारने न्यायमूर्ती मुखर्जी समिती गठीत केली.
या समितीने मात्र नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही आणि जपानमध्ये असलेल्या अस्थी नेताजींच्या नाहीत, असा निष्कर्ष काढला. २०१६ साली मोदी सरकारने नेताजींबद्दलच्या सुमारे ३०० फाईल्स अभ्यासकांना उघड केल्या. या प्रकारे फाईल्स उजेडात आणण्याची प्रक्रिया १९९७ पासून सुरू आहे. आजपर्यंत सुमारे अडीच हजार फाईल्स उजेडात आलेल्या आहेत. या माहितीमुळे जुने प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत.
मात्र, या सर्व राजकीय वादावादीत नेताजींच्या मुलीचा फारसा विचार होत नाही, हे दुर्दैव. नेताजी १९३४ साली व्हिएन्ना शहरात होते. तिथे ते एमीली फाफ या तरुणीच्या प्रेमात पडले. त्यांनी डिसेंबर १९३७ मध्ये लग्न केले. इंग्रज सरकारने नेताजींना १९४० साली अटक करून कोलकात्याला नजरकैदेत ठेवले होते. येथून नेताजी १६ जानेवारी, १९४१ रोजी पळून आधी जर्मनी, नंतर जपानला पोहोचले.
याच काळात ते व्हिएन्ना येथे असताना दि. २९ फेब्रुवारी, १९४२ रोजी त्यांना कन्यारत्न झाले. तिचे नाव अनीता. ती अवघ्या एका महिन्याची असताना नेताजींना तिला सोडून जावे लागले. पिता आणि कन्येची ही शेवटची भेट! नेताजींच्या मृत्यूनंतर अनीता बोसला तिच्या आईने एमिलींनी एकटीने मोठे केले. यासाठी एमिलींना अनेक छोट्या-मोठ्या नोकर्या कराव्या लागल्या. या दरम्यान भारत सरकारने त्यांना मदत करायला हवी होती.
यथावकाश अनीता मोठी झाली आणि आज एक नामवंत अर्थतज्ज्ञ म्हणून जग तिला ओळखतं. तिला भारताबद्दल फार प्रेम आहे. नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात, अशी तिची जुनी मागणी आहे. एवढेच नव्हे, तर या अस्थींची ‘डीएनए’ टेस्ट घ्यावी, अशीही तिची मागणी आहे. या मागणीला भारतीय जनतेचा पाठिंबा आहे. ही मागणी ना काँग्रेस सरकारने पूर्ण केली नाही.
दि. २३ जानेवारी रोजी मोदी सरकारने नेताजींच्या १२५व्या जयंतीनिमित्त भारताच्या जर्मनीतील दूतावासात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला एक सन्माननीय अतिथी म्हणून अनीता बोस यांना आमंत्रित केले होते. आता अनीताचं वय ८० वर्षे आहे. त्या विवाहित असून त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मुलांची नावे बघा : पीटर अरूण, थॉमस कृष्णा आणि माया करिना. मोदी सरकारने नेताजींच्या अस्थी भारतात आणून त्यांची ‘डीएनए’ टेस्ट करावी, ही मागणी आता तरी पूर्ण होण्यास हरकत नसावी.