फारूख अब्दुल्ला यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच!

12 Sep 2022 22:04:24

FAROOKH

 
जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. देशातील बदलते वारे लक्षात घेऊन गुलाम नबी आझाद यांनी, ‘कलम ३७०’ आता पुन्हा येऊ शकत नाही, असे जे वक्तव्य केले त्यापासून काही बोध घेण्याची अब्दुल्ला आणि ‘गुपकार गँग’ची तयारी दिसत नाही. फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
 
जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे घटनेचे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द केल्याच्या घटनेस तीन वर्षे उलटून गेली तरी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि ‘गुपकार गँग’चे अन्य नेते नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास तयार नाहीत. काश्मीरमध्ये पुन्हा ‘३७०कलम’ लागू होईतोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा या नेत्यांचा निर्धार आहे. ‘कलम ३७०' आणि ‘३५ अ’ मोडीत काढण्यात आल्यानंतर लडाख हा भूभाग वेगळा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात बिमोड करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी श्रीनगरसह काश्मीर खोर्यात राष्ट्रध्वज डौलाने फडकविला गेला. आता जम्मू-काश्मीरला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत.
 
 
त्या निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांमध्ये स्थानिक नसलेल्या मतदारांची नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने फारूक अब्दुल्ला आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचे आणि संघटनांचे पित्त खवळले आहे. हे सर्व नेते अजून ‘कलम ३७०’ विसरण्यास तयार नाहीत! काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असलेले काश्मिरी नेते गुलाम नबी आझाद यांनी, जम्मू -काश्मीरमध्ये आता पुन्हा ‘कलम ३७०’ लागू होणे शक्य नाही, असे म्हटले आहे. पण, फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांची जो बदल झाला आहे, तो स्वीकारण्याची तयारी नाही. काश्मीरला जे विशेष अधिकार देण्यात आले होते, त्या मानसिकतेतून हे नेते बाहेर पडायला तयार नाहीत! लोकशाही मार्गाने केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये जो ऐतिहासिक बदल घडवून आणला, तो स्वीकारण्याची या नेत्यांची अजून तयारी नाही. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये स्थानिकेतर मतदारांचा समावेश करण्यास फारूख अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे.
 
 
फारूख अब्दुल्ला यांनी ज्या स्थानिकेतर मतदारांचा समावेश मतदार याद्यांमध्ये केला जाणार आहे, त्या मतदारांचा उल्लेख ‘बाहेरचे’ असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाने फारूखअब्दुल्ला यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी तरुण चुघ यांनी, मतदारांना ‘बाहेरचे’ म्हणणारे फारूख अब्दुल्ला कोण लागून गेलेत! अशी भाषा वापरून ते जम्मू - काश्मीरच्या जनतेचा अपमान करीत आहेत. ‘बाहेरचे’ म्हणजे कोण हे फारूख अब्दुल्ला यांनी स्पष्ट करावे, अशी विचारणाही भाजपने केली आहे.
 
 
 ज्या भारतीय नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, असा नागरिक तो जेथे राहतो त्या ठिकाणी मतदान करू शकतो, याचे स्मरणही फारूख अब्दुल्ला यांना करून देण्यात आले आहे. फारूख अब्दुल्ला यांनी ‘बाहेरचे’ या शब्दाचा वापर एखाद्या धर्माबद्दल, प्रांताबद्दल की जातीबद्दल केला आहे? तसेच फारूख अब्दुल्ला यांनी ‘बाहेरचे’ पक्ष असे जे म्हटले आहे, ते कोणाबद्दल हेही लक्षात येत नाही. देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला देशाच्या कोणत्याही भागात निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, हे यानिमित्ताने भाजपने फारूख अब्दुल्ला यांच्या लक्षात आणून दिले.
 
 
फारूख अब्दुल्ला हे या केंद्रशासित प्रदेशामध्ये समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, जम्मू-काश्मीरची जनता त्यांच्या ‘आदेशा’नुसार वागणार नाही, हे फारूख अब्दुल्ला यांनी ध्यानात घ्यावे, असा टोला भाजपने हाणला आहे. जम्मू-काश्मीरने प्रगती केली आहे. पण, फारुख अब्दुल्ला अजूनही ५०, ६० आणि ७० च्या दशकातील राजकारणातच वावरत आहेत, असे भाजपने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास मंडळ, पंचायत विकास मंडळ आणि पंचायतीच्या ज्या निवडणूक झाल्या, त्यामध्ये २१ लाखांहून अधिक जनतेने सहभाग घेतला आणि पंतप्रधानांच्या विकास कार्यक्रमाच्या बाजूनी त्यांनी कौल दिला, हे भाजपने फारूख अब्दुल्ला यांच्या निदर्शनास आणून दिले.
 
 
फारूख अब्दुल्ला यांच्या जम्मूतील निवासस्थानी झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना, ‘बाहेरच्यांना’ या केंद्रशासित प्रदेशात मतदानाचा अधिकार असता कामा नये, असे म्हटले होते. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने त्या राज्यात होणार्या निवडणुकीत देशातील कोणतेही पक्ष सहभागी होऊ शकतात; तसेच १८ वर्षे पूर्ण झालेला आणि देशाचा नागरिक असलेला कोणीही निवडणुकीत मतदान करू शकतो, हे अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांच्या अजूनही पचनी पडत नाही.
 
 
जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. देशातील बदलते वारे लक्षात घेऊन गुलाम नबी आझाद यांनी, ‘कलम 370’ आता पुन्हा येऊ शकत नाही, असे जे वक्तव्य केले त्यापासून काही बोध घेण्याची अब्दुल्ला आणि ‘गुपकार गँग’ची तयारी दिसत नाही. फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
 
 
धर्मांतरासाठी ‘अॅमेझॉन’चा पैसा!
 
अरुणाचल प्रदेशमधील ‘सोशल जस्टीस फोरम’ने ‘अॅमेझॉन’ आणि ‘अमेरिकन बाप्टिस्ट मिशन’ यांच्यावर, धर्मांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणण्यासाठी हा पैसा वापरला जात असल्याचा आरोप ‘सोशल जस्टिस फोरम’ने केला आहे. गृहमंत्रालय आणि भारत सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी आग्रहाची मागणीही या संघटनेने केली आहे.
 
 
धर्मांतर करण्याच्या कार्यात गुंतलेल्या ख्रिस्ती संस्थांना प्रचंड आर्थिक उलाढाल असलेली ‘अॅमेझॉन’ ही ई-कॉमर्समधील कंपनी अर्थपुरवठा करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ‘अॅमेझॉन’ आणि ‘अमेरिकन बाप्टिस्ट मिशन’ यांच्यात संगनमत असून आर्थिक गैरव्यवहार करून प्रचंड पैसा धर्मांतर करण्यासाठी वापरला जात आहे. ‘अमेरिकन बाप्टिस्ट मिशन’ या संघटनेची ‘ऑल इंडिया मिशन’ या नावाची एक संघटना आहे.
 
 
त्या संघटनेने आपल्या संकेतस्थळावर ईशान्य भारतातील २५ हजार लोकांना ख्रिश्चन करण्यात आल्याची माहिती अगदी उघडपणे दिली आहे. ‘ऑल इंडिया मिशन’ ही संघटना ब्रिटन आणि अमेरिकेत एक ‘धर्मादाय’ संस्था म्हणून नोंदणीकृत झाली आहे. या संघटनेशी संबंधित दोन आरोग्य सेवांच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचे काम चालत असल्याचे लक्षात आले आहे. ‘अॅॅमेझॉन’ कंपनीच्या ‘अॅमेझॉन स्माईल’ या प्रतिष्ठानामार्फत धर्मांतर करण्यासाठी निधी पुरविला जातो, अशी माहिती अरुणाचल प्रदेशच्या ‘सोशल जस्टीस फोरम’ने दिली आहे.
 
 
तसेच, ‘ऑल इंडिया मिशन’शी संबंधित आणखी एका संघटनेकडून भारतात चर्चेसची उभारणी केली जात आहे. ‘प्रार्थना भवन’ या नावाखाली अशा चर्चेसची उभारणी करून भोळ्या जनतेला फसविले जात आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. देशातील हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या ख्रिस्ती संघटनांना कशा प्रकारे प्रचंड आर्थिक मदत करीत आहेत त्याची कल्पना या उदाहरणावरून यावी.
 
 
कटरा येथे ९०० कोटी खर्चून
मॉडेल स्टेशन उभारणार!
 
जम्मूपासून जवळच असलेल्या कटरा लगत त्रिकूट पर्वतावरील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जात असतात, अशा भाविकांच्या सोयीसाठी कटरा येथे सर्व सोयींनी युक्त असे मॉडेल स्टेशन उभारण्यात येणार आहे. 900 कोटी खर्च करू उभारण्यात येणार्या या मॉडेल स्टेशनची उभारणी झाल्यानंतर कटरा येथे येणार्या भाविकांना सर्व वाहतूक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. कटरा येथे २५ एकर परिसरात हे मॉडेल स्टेशन उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी भाविकांना बस, रेल्वे आणि हेलिकॉप्टर सेवा एकाच ठिकाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
तसेच, त्या ठिकाणी रिक्षा, टॅक्सी यांच्यासाठीही पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्लीहून कटरा येथे येणारा द्रुतगती महामार्गही या स्टेशनला जोडण्यात येणार आहे. या स्टेशनची उभारणी करण्याचे काम ‘नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आले आहे. तसेच, कटरापासून अर्धकुमारीपर्यंत रोप वे निर्माण करण्यात येणार आहे. हा रोप वे तयार झाल्यानंतर प्रतितास १५०० भाविकांना माता वैष्णोदेवीच्या दरबारात नेणे शक्य होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी कटरा येथे ज्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याची कल्पना यावरून यावी!
 
 
Powered By Sangraha 9.0