छायांकची ‘स्केटिंग’मधील सुवर्णझळाळी

11 Sep 2022 20:26:19
 
 
asd
 
 
 
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आज आपण हीच म्हण सार्थ करुन दाखवणार्‍या व ‘स्केटिंग’मध्ये सुवर्ण कामगिरी करणार्‍या छायांक देसाईबद्दल जाणून घेणार आहोत...
 
 
नव्या युगाच्या नव्या कुमारा
यशस्वितेचे पाऊल टाक पुढे...
विश्वाचे हे विशाल अंगण
आहे तुझ्याचसाठी हे खुले...
 
 
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असे काही लोकांच्या बाबतीत म्हटले जाते. यात लहान मूर्ती म्हणजे बर्‍याचदा उंची आणि वय याच्याशी संबंधित असते. पण यांच्या कामगिरीपुढे या सर्व गोष्टी गौण ठरू लागतात आणि ही लहान मूर्ती महान काम करून नावलौकिक मिळवतात. अशीच एक लहान मूर्ती आपल्या कीर्तीने केवळ आपले वा कुटुंबाचेच नाव नव्हे तर शाळेचे नावदेखील मोठे करत आहे, यशाचे नवनवे शिखर गाठून भल्याभल्यांना अचंबित करीत आहे. अशा या अतुलनीय कामगिरी करणार्‍या लहान खेळाडूचे नाव आहे, यशस्वी कुमार म्हणजेच छायांक सतीश देसाई.
 
 
यश कसे असते याचे वर्णन करणार्‍या वरील चार ओळी छायांकला तंतोतंत लागू पडतात. ‘न्यू हॉरिझन स्कॉलर्स स्कूल’ आणि ‘निओ किड्स, ऐरोली’ येथे पाचवीमध्ये शिकणार्‍या छायांक देसाई याने ‘स्केटिंग’मध्ये यशस्वितेची जी भरारी घेतली आहे, ती अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी आणि प्रेरणादायी आहे.
 
 
लहान मुले ही मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. छायांकच्या बाबतीत काहीसा असाच प्रकार झालेला पाहायला मिळतो. तो साडेतीन वर्षांचा असल्यापासून ‘स्केटिंग’ करतो आहे. त्याच्यात ही आवड निर्माण झाली ती त्याची बहीण श्रेया हिला ’स्केटिंग’ करताना पाहून. श्रेया ही त्याची मोठी बहीण असून ती नियमित ‘स्केटिंग’ला जाते. मग छायांकदेखील ‘स्केटिंग’चा हट्ट धरू लागला आणि तो तिचे ‘स्केट शूज’ घालून घरात ‘स्केटिंग’ करायला लागला. त्याची ‘स्केटिंग’मधील गती आणि आवड पाहून घरच्यांनी त्याला ‘स्केटिंग’ क्लासमध्ये पाठवण्याचे ठरवले. ‘विवियाना मॉल’मध्ये दशरथ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा क्लास सुरू झाला आणि येथूनच जणू नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची शृंखला सुरू झाली.
 
 
खारघरच्या ‘राजा स्केटिंग अकॅडमी’च्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये छायांकने सहभाग घेऊन ‘लॉन्ग रेस’ आणि ‘शॉर्ट रेस’मधील आपले पहिले सुवर्णपदक पटकावले आणि येथून जणू त्याने पदके जिंकण्याचा धडाकाच लावला. नंतर 2016मध्ये ‘ओपन रोलर स्पीड स्केटिंग कॉम्पिटिशन’मध्ये ‘लॉन्ग रेस’, ‘शॉर्ट रेस’मध्ये छायांकने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर पुणे येथील ‘नॅशनल कॉम्पिटिशन’मध्ये ‘लॉन्ग रेस’मध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर ‘स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन’मध्ये 2018 साली छायांकने पुन्हा एकदा सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याच्या शाळेतील ‘स्केटिंग’चे प्रशिक्षक सीयाराम पाल यांनीसुद्धा त्याला शाळेकडून वेगवेगळ्या ‘स्केटिंग’ भाग घ्यायला पाठवले. नवनव्या ‘टेक्निक’ आणि कौशल्ये त्याला शिकविली. एकोणिसाव्या ‘स्केटिंग चॅम्पियनशिप’मध्ये ‘लॉन्ग रेस’मध्ये छायांकने सुवर्णपदक जिंकले.
 
 
दि. 19 फेब्रुवारीला पहिली ‘श्री छत्रपती संभाजी राजे स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप’ झाली. यामध्ये छायांकने ‘लॉन्ग रेस’ आणि ‘शॉर्ट रेस’मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दि. 16 व 17 एप्रिलला मुंबई येथे ‘अ‍ॅपल स्केट इंडिया’च्यावतीने ‘स्केटिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये त्याला रौप्य आणि कांस्यपदक मिळाले. छायांकने अनेक पदकांवर आपले नाव तर कोरलेच आहे, पण त्यासोबतच नवनवे विक्रम आपल्या नावे करून तोस्वतः सोबतच परिवार आणि शाळेचे नावदेखील मोठे करत आहे. भारताच्या 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने दि. 14 ऑगस्ट रोजी ‘रोड रिले स्केटिंग कॉम्पिटिशन’चे आयोजन ठाणे येथे करण्यात आले होते. यामध्ये छायांकने व त्याच्या ग्रुपने निरंतर साडेसात तास ‘स्केटिंग’ करून ‘एशिया स्पेसिफिक’ (नॅशनल रेकॉर्ड) आपल्या नावे केला. ‘जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब, बेळगाव कर्नाटक’ येथे छायांकने 24 तास ‘स्केटिंग’चे रेकॉर्ड केले. यामध्ये त्याबद्दल त्याला ‘ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र व पदक मिळाले आहे.
 
 
छायांकची आजवरची कामगिरी ही प्रेरणादायी आहे. छायांकने आजवर ज्या ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्या त्या स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे. त्याचे यश सोन्यासारखे चकाकणारे आहे. त्याच्यापुढे उज्ज्वल भविष्यकाळ आहे. आपल्या अथक प्रयत्नांतून छायांक अजूनही मोठी भरारी घेईल आणि जगभरात आपले नाव उज्ज्वल करेल, यात शंकाच नाही. छायांकच्या सुवर्णमयी यशासाठी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्वर्णिम वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0