डावी डोकी कोणतेही विषय काढो, पवारांचे पगडी-पागोट्याचे राजकारण चालू द्या, ममतांचे तुष्टीकरणाचे राजकारण चालू द्या, नेहरू-गांधी परिवाराचे घराण्याचे राजकारण चालू द्या, सामान्य मतदाराला यापैकी कशातही रस नाही. सामान्य मतदार म्हणत असताना येथे राष्ट्रीय विचार करणारा मतदार प्रामुख्याने डोळ्यापुढे आहे. गेल्या आठ-दहा वर्षांचा राजकीय इतिहास काय सांगतो, हे समजून घ्यायला पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणुका २०२४ साली पार पडतील. परंतु, त्याची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. मध्यंतरी प्रशांत किशोर यांच्या बातम्या जवळजवळ रोजच प्रत्येक वर्तमानपत्रात झळकत होत्या. आता त्याही बंद झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे काम प्रशांत किशोर करणार, अशी हवा पसरविण्यात आली. राम-रावण युद्धात लक्ष्मणाला संजीवनी देण्याचे काम हनुमंताने केले. हिमालयात जाऊन एक डोंगरच उचलून तो लंकेत हनुमंत घेऊन गेले. प्रशांत किशोर काय करणार होते, हे त्यांचे त्यांनाच माहीत आणि काँग्रेस पक्षाला माहीत!
लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीचा विचार केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व राजकीय पक्षाचे नेते अशी ही लढत होणार आहे आणि पक्षाचा विचार केला, तर भारतीय जनता पार्टी विरूद्ध अन्य सर्व पक्ष असा हा सामना रंगणार आहे. ‘नरेंद्र मोदी नको’ म्हणणारे या देशात कोण आहेत? त्यांची यादी अशी - १. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी. २. शरद पवार, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी. ३. असदुद्दीन ओवैसी, सुन्नी मुस्लीम संघटना आणि कॅथलिक चर्च. या सर्वांना नरेंद्र मोदी नको आहेत.
नरेंद्र मोदी का नको? ते देशाचे नुकसान करतात का? त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली का? त्यांचे परराष्ट्रीय धोरण फसले का? त्यांच्या काळात आर्थिक विकासाला खीळ बसली का? पण, यापैकी काहीही घडले नाही. कारण, यापैकी एखादी गोष्ट घडली असती तरी देशात मोठा उद्रेक झाला असता. लोक रस्त्यावर उतरले असते. ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली असती. १९७४-७५ साली इंदिरा गांधींच्या विरूद्ध सर्व देशभर अशी प्रचंड आंदोलने झाली होती. ती चिरडून टाकण्यासाठी इंदिरा गांधींनी २६ जूनला देशात आणीबाणी पुकारली. मोदींच्या जवळजवळ आठ वर्षांच्या काळात देशाची स्थिती बिघडेल, असे काहीही घडले नाही.
तरीही या लोकांना मोदी नकोत. तर याची कारणे कोणती? ती कारणे अशी आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी हा नेहरू-गांधी परिवार आहे. त्यांना असे वाटते की, आपला जन्म देशावर राज्य करण्यासाठीच झालेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही. म्हणून त्यांना मोदी आणि भाजप नको. शरद पवार, लालूप्रसाद आणि अखिलेश हेदेखील घराणेशाही चालविणारे राजनेते आहेत. नरेंद्र मोदी सांगतात की, घराणेशाही हा लोकशाहीला मोठा धोका आहे. घराणेशाहीत सामान्य राजनेत्याला पुढे येण्याची काही संधी नसते. तो क्रमांक एक किंवा दोनचा नेता होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी, पवार आणि त्यांच्या घारणेशाहीला आव्हान देत असल्यामुळे त्यांनाही मोदी नको आहेत.
ममता बॅनर्जी या मुस्लीम तुष्टीकरणवादाचा चेहरा झालेल्या आहेत. नरेंद्र मोदी मुसलमानांचे तुष्टीकरण करीत नाहीत. त्यांना नागरिक म्हणून समानतेने वागवतात. ममतांचा मतदार मुसलमान आहे. मुस्लीम तुष्टीकरणनीतीच्या विरोधात मोदी असल्यामुळे ममतादीदींना मोदी आवडत नाहीत. याच कारणासाठी ओवेसी आणि त्यांचे धर्मबांधव हे नरेंद्र मोदी यांचा विरोध करतात. नागरिकत्व कायदा, घटनेचे ‘३७० कलम’ रद्द करणे, पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करणे या मंडळींना आवडत नाही आणि मोदी हे काम करतात, म्हणून त्यांचा मोदींना विरोध आहे.
या सर्वाचा अर्थ असा झाला की, २०२४ ची निवडणूक ही ‘घराणेशाही विरूद्ध लोकशाही किंवा गणतंत्र’ यात होणार आहे. २०२४ ची निवडणूक ‘मुस्लीम तुष्टीकरण विरूद्ध राष्ट्रवाद’ अशी होणार आहे. म्हणून या निवडणुकीची सैद्धांतिक विषयसूची आतापासून बनत चालली आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ही विषयसूची विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हेच बनवित आहेत. आपण आगीशी खेळ खेळत आहोत, हे त्यांच्या लक्षात येईल. जेव्हा २०२४च्या निवडणूक आगीत त्यांचे हात भाजून निघतील तेव्हा!
या सर्व मंडळींना बौद्धिक खाद्य देण्याचे काम देशातील कम्युनिस्ट डोकी करीत असतात. अनेक महत्त्वाच्या बौद्धिक क्षेत्रात त्यांचे प्राबल्य अजूनही कायम आहे. त्यांनी एक विषयसूची बनविण्याचे काम केले आहे. या विषयसूचीतील मुद्दे असे - १. मोदी कार्यकाळात देशाचा आर्थिक विकास ठप्प झाला. २. बेरोजगारी वाढली. ३. शेतकर्यांची दैना झाली. ४. दलितांचे आरक्षण कमी कमी होत चालले. ५. अल्पसंख्याकांचे जीवन आणि मालमत्ता संकटात येत चालली. ६. देशाचे सांप्रदायिक विभाजन करण्यात आलेले आहे. ७. बहुसंख्यवाद लोकशाहीला धोकादायक आहे. ८. सर्व देशभर एकाच विचाराची छाप पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे देशाची विविधता धोक्यात येणार आहे. या मुद्द्यांना धरून डावी डोकी आपल्या खोक्यातून वेगवेगळी कथानके बाहेर काढीत असतात. रोहित वेमुला ते अखलक अशी कथानकांची एक मालिका यापूर्वी तयार करण्यात आली होती, आता नवीन कथानके तयार करण्यात येतील.
नरेंद्र मोदी यांच्याशी टक्कर देईल, असा एक चेहरा शोधण्याच्या मागे सर्व मंडळी लागली आहेत. ‘नटसम्राट’ नाटकातील एक वाक्य खूप प्रसिद्ध झाले, ‘कुणी घर देता का घर’ तसं आता शरद पवार ते केजरीवाल ‘कोणी चेहरा देता का चेहरा’ या शोधात आहेत. चेहर्याच्या शोधात असणारी माणसे तशी अतिशय धूर्त, कपटी, धोरणी आणि लबाड आहेत. खरं म्हणजे या प्रत्येकालाच आपलाच चेहरा पुढे आणायचा आहे. पण, सध्या तरी ते ममता बॅनर्जींचे नाव पुढे घेतात आणि ममतादीदींनाही असे वाटू लागले आहे की, मीच उद्याच्या भारताची पंतप्रधान आहे. पंतप्रधान नसतानाही त्या पंतप्रधानाच्या तोर्यात फिरत असतात. ‘मला विचारल्याशिवाय उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचे धाडस तुम्ही कसे काय करू शकता?’ हा ममतादीदींचा आताचा सवाल आहे.
डावी डोकी कोणतेही विषय काढो, पवारांचे पगडी-पागोट्याचे राजकारण चालू द्या, ममतांचे तुष्टीकरणाचे राजकारण चालू द्या, नेहरू-गांधी परिवाराचे घराण्याचे राजकारण चालू द्या, सामान्य मतदाराला यापैकी कशातही रस नाही. सामान्य मतदार म्हणत असताना येथे राष्ट्रीय विचार करणारा मतदार प्रामुख्याने डोळ्यापुढे आहे. गेल्या आठ-दहा वर्षांचा राजकीय इतिहास काय सांगतो, हे समजून घ्यायला पाहिजे. तो इतिहास हे सांगतो की, समाज आता आपली मुळे शोधू लागला आहे. आपल्या अस्मितेचे भान त्याला येऊ लागले आहे. आम्ही कोण आहोत, आमची संस्कृती कोणती, आमची जीवनमूल्ये कोणती, याचा तो शोध घेऊ लागला आहे.
योगविद्येचा प्रचार, आयुर्वेद उपचाराकडे धाव, पर्यावरण म्हणजे निसर्ग याच्याशी जुळवून घेण्याची मनस्थिती, भोगवादाच्या मर्यादा, सांस्कृतिक मूल्यांविषयीच्या आस्था, सण-उत्सव-यात्रा याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी आणि त्यात सहभागी होण्याची मानसिकता हे सर्व बदललेल्या भारताचे चित्र आहे. या भावजागरणाचा चेहरा आहेत, नरेंद्र‘ मोदी! सामान्य मतदार आपल्या आशा-आकांक्षा, राष्ट्रीय ध्येयवाद, राष्ट्रीय अस्मिता याचे प्रतिबिंब नरेंद्र मोदी यांच्यात पाहतो. तो पगडी-पागोट्याच्या राजकारणात आता गुंतत नाही. एकजातीय पक्ष त्याला आवडत नाहीत. घराणेशाहीची त्याला घृणा आहे. म्हणून २०२४ सालची लढाई राष्ट्रीय मतदार विरूद्ध लबाडांची विचारसरणी याच्यात होणार आहे. त्यात कोण जिंकणार, हे सांगायलाच पाहिजे का?