दुर्मिळ खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान

30 Aug 2022 13:18:38
Dodamarg
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील उघाडे गावातून संरक्षण जाळीत अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
 
दोडामार्ग मधील उघाडे गावामधील शेतकरी सखाराम भिकाजी राणे यांना सकाळी उठल्यानंतर आपल्या घराभोवती संरक्षणासाठी लावलेल्या नायलॉन दोरीच्या जळीमध्ये दुर्मिळ असे खवले मांजर अडकले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला माहिती कळवली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले, आणि या खवले मांजराची सुटका करण्पुयात आली. पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ते खवलेमांजर वनक्षेत्रपाल दोडामार्ग कार्यालयात आणण्यात आले. तपासणी दरम्यान हे खवले मांजर संपूर्णतः निरोगी आढळून आल्यामुळे त्याची सुटका नैसर्गिक अधिवासात करण्यात आली.
 
या अशा दुर्मिळ खवलेमांजराची माहिती वनविभागाला वेळेत कळवून त्या खवलेमांजराचे प्राण वाचवण्यासाठी वनविभागाच्यावतीने शेतकरी सखाराम भिकाजी राणे यांचे आभार मानून त्यांना आपल्या कोकणातील या दुर्मिळ अशा वन्यजीवाच्या, खवलेमांजराच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन म्हणून हजार रुपये बक्षीस देण्यात आले. या कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनमजुर विश्राम कुबल, नारायण माळकर व इतर सर्व दोडामार्ग परिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी सहभागी होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग मदन क्षीरसागर यांनी आपल्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व नागरीक बांधवांना या दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0