'बॉलीवूडला मी परवडणार नाही' म्हणणाऱ्या महेश बाबूचे हिंदीत पदार्पण?

    03-Aug-2022
Total Views |

maheshbabu
 
 
मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश बाबू. साउथ भागात त्याचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी, त्याच्या प्रोडक्शन हाऊस 'मेजर' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, त्याला हिंदी चित्रपटात काम करण्याबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा महेश बाबू म्हणाला होता की, बॉलीवूडला तो परवडणार नाही, त्यामुळे त्याला वेळ वाया घालवायचा नाही. त्याला साऊथमधून खूप प्रेम मिळत आहे आणि त्याला ही इंडस्ट्री पुढे न्यायची आहे. त्याच्या या वाक्याने बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र आता महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे म्हटले जात आहे.
 
 
एका वेबसाइटने साऊथ सुपरस्टार महेश बाबूविषयी दिलेल्या माहितीनुसार, तो आता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटात महेश बाबू दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
 
 
 
महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सरकारू वारी पाता' या तेलगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार कमाई केली नाही आणि चाहत्यांनाही तो फारसा पसंत पडला नाही. हा चित्रपट १२ मे २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचं दिग्दर्शन परशुराम यांनी केलं होते. परंतु त्याच्या त्या वक्तव्यानंतर मात्र, आता महेश बाबूच्या हिंदी सिनेसृष्टीत पदार्पणाबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. आता खरंच महेश बाबू बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.