शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

    29-Aug-2022
Total Views |
 
homeopathy
 
 
 
शरीराच्या प्रकृतीनुसार, ठेवणीनुसार, तसेच माणसाला जनुकीय जडणघडणीनुसार रोगप्रवणस्थिती तयार असते, त्याचप्रमाणे माणसाच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, हवेचा, भौगोलिक परिस्थितीचासुद्धा माणसाच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे एखादा माणूस काय काम करत आहे व कुठल्या परिस्थितीत व सान्निध्यात करत आहे, या सर्व गोष्टींचाही रोगप्रवणस्थिती बनण्यामागे हातभार असतो. जेव्हा शरीराबाहेरच्या वातावरणामुळे शरीरातील आतील वातावरण बिघडून जाते, त्यावेळी ही रोगप्रवण स्थिती कार्यरत होते, ज्याला मग आपण Traits,Tendencies आणि मग नंतर ‘डायथेसिस’ म्हणतो.
 
क्षयरोगकारक रोगप्रवण स्थितीनंतर त्याच सदृश्य अजून एक रोगप्रवणस्थिती असते व तो म्हणजे ’Scrofulous diathesis’ म्हणजेच शरीरग्रंथीवृद्धी प्रवणस्थिती. आता या रोगप्रवणस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ‘स्क्रोफ्युला’ म्हणजे काय, ते पाहणे महत्त्वाचे आहे.‘स्क्रोफ्युला’ म्हणजे शरीराच्या विविध भागांतील ग्रंथी सुजून व त्यात जंतूंचा संसर्ग होऊन होणारे रोग. सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की, ग्रंथीला सुज येऊन जेव्हा रोग होतो तेव्हा बहुंताश करुन त्याचे निदान हे क्षयरोगामध्येच होते म्हणूनच ही रोगप्रवणस्थिती ‘ट्युबरक्युलर डायथेसिस’च्या जवळपास जाणारी आहे. परंतु, जसे आपण भूमितीमध्ये म्हणतो की, ’Every square is a rectangle every rectangle is not a square.’ त्याचप्रमाणे क्षयरोगामध्ये होणारी ग्रंथींची वाढ व सूज म्हणजे ‘स्क्रोफ्युला.’
 
प्रत्येक वेळची ग्रंथीची वाढ ही क्षयरोगामुळेच असते असे नाही, तर त्याची इतरही कारणे असू शकतात. सर्वसाधारणपणे या ग्रंथीची सूज व जंतुसंसर्ग हा मानेतील ग्रंथीमध्ये व पोटातील तसेच काखेतील, जांघेतील ग्रंथीमध्ये झालेला दिसून येतो. त्याला ‘लिम्फॉडीनायटीस’ असेही म्हणतात. हे ’लिम्फॉडीनायटीस’ म्हणजे शरीरातील ‘लिम्फ’ ग्रंथींना झालेला जंतुसंसर्ग. ‘लिम्फ’ ग्रंथी या शरीराच्या रोगप्रतिकारक संस्थेचा एक भाग असतो. बहुतांशी संसर्ग क्षयरोगाचा असू शकतो. यामध्ये ‘लिम्फ’ ग्रंथींना सूज येते व त्या टणक बनतात आणि हळूूहळू त्यांचा आकार वाढू लागतो आणि त्या मोठ्या होतात. त्यामध्ये जंतूंचा संसर्ग होऊन मग त्यात पू तयार होतोे. या लक्षणांच्या बरोबरीनेच अजूनही काही लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.
जसे, ताप येणे - जंतुसंसर्गामुळे शरीरात कणकण जाणवते व कधीकधी तीव्र ताप येतोे, सततचा थकवा जाणवणे.
सतत बरे वाटत नाही, असे वाटत राहते.
 
प्रचंड घाम येणे - घाम येत राहतो व बरेच वेळा घामाचे प्रमाण वाढते. कुठ्यालाही कारणाशिवाय वजन कमी होत जाणे इत्यादी लक्षणे ही या Scrofulous diathesis च्या रुग्णांमध्ये आढळून येतात. ग्रंथीची ही सूज वारंवार होत राहते व त्यामुळे ही रोगप्रवणस्थिती जर काढून टाकायची असेल, तर होमियोपॅथी शिवाय दुसरा पर्याय नाही. पुढे आपण या ’Scrofulous diathesis'’ बद्दल अजून माहिती पाहूया.
 
- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.