‘कोरोना’ लसीचा ‘बूस्टर डोस’

29 Aug 2022 19:56:20
 
booster
 
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे कोरोना लसीचा तिसरा डोस (बूस्टर डोस) संपूर्ण देशात मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. ही लस दि. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. सर्व देशवासीयांसाठी असलेल्या या लसीकडे अनेक नागरिकांनी पाठ फिरविलेली दिसते. कोरोना महामारीतून सावरुन जनजीवन सामान्य होत आहे. या आजाराच्या कटू आठवणी झपाट्याने पुसल्या जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोना लसीचा बुस्टर डोस देशभर मोफत देण्याचे जाहीर केले, तरी त्या लसीकरण मोहिमेत सामान्य नागरिक भाग घेताना दिसत नाही. हा बूस्टर डोस का घ्यावा? हे राष्ट्रीय कर्तव्य कसे आहे का? यासंबंधी लोकप्रबोधन करणारा हा लेख...
 
  
कोरोना महामारीच्या काळात देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले होते. या ‘लॉकडाऊन’चा कालावधी सारखा वाढत जाऊन तो ७५ दिवसांपर्यंत गेला. लोक जीव मुठीत धरुन घरी बसले होते. अनेकांना या काळात कोरोना झाला. काहींना रुग्णालय गाठावे लागले, तर काही या भयानक साथीचे बळी ठरले. या अंध:कारमय काळात एकच आशेचा किरण होता, तो म्हणजे कोरोना आजाराची लस उपलब्ध होणे. जगभरातील शास्त्रज्ञांनी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सुमारे २५० ठिकाणी हे संशोधन चालू होते. अनेक सोपस्कार पार पाडलेल्या दहा लसींना जगभरात मान्यता देण्यात आली. भारतात ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन व्हॅक्सिन उपलब्ध झाल्या.
 
या लसीकरणाचा शिस्तबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. लसीचे वितरण, लसीची प्राथमिकता, लस देण्यासाठी दिले जाणारे ‘ट्रेनिंग’, लसीबद्दलची लोक शिक्षणार्थ माहिती या सर्वांचे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे व्यवस्थित आयोजन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य खात्याने आपल्या आरोग्य खर्चात १३७ टक्क्यांनी वाढ केली व कोरोना लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.दि. १६ जानेवारी, २०२१ ला लसीकरणास सुरुवात झाली. आरोग्यरक्षक, पोलीस, वरिष्ठ नागरिक अशा क्रमाने ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली. काही महिन्यांतच कोरोना लसीचा पहिला डोस मुले सोडून बहुसंख्य नागरिकांना देण्यात आला. हे केंद्र सरकारचे मोठे यश होते. त्याकडे सामान्य नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहिले. दुसरा डोसदेखील बर्‍यापैकी देण्यात आला.
 
मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा तडाखा बसला. कोरोना ‘व्हेरिएंट’मुळे ही लाट उद्भवली होती. पहिल्या लाटेपेक्षा ही जास्त भयावह होती. बेड्सचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, औषधांचा तुटवडा या सर्वांमुळे अनेक अकाली मृत्यू घडले. अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हरवले. हे सर्व घडत असताना दुसरा डोस दिला जात होता. सरकारने आपल्या यंत्रणेचा योग्य वापर करुन २०० कोटी लसींचा टप्पा पार पडला, तरी पण सामान्य नागरिक म्हणून आपल्यापैकी अनेकांनी दुसरी मात्रा घेतली नाही. याला फक्त आपला आळस जबाबदार होता. सरकारी रुग्णालयात लस मोफत उपलब्ध होती, तर काही खासगी रुग्णालयात ती माफक दरात उपलब्ध होती. अनेक सेवाभावी संस्थांनी झोपडपट्टी विभागात मोफत लसीकरण केले.
जेव्हा तिसर्‍या डोसची घोषणा झाली, तोपर्यंत जनजीवन सामान्य झाले होते. लोक कोरोनाच्या कटू आठवणी विसरू पाहत होते. दोन डोस पुरेसे झाले, अशी त्यांची समजूत झाली. तिसरा डोस मोफत उपलब्ध असूनही नागरिक तिथे फिरकत नव्हते. सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने ही काळजीची बाब आहे. प्रत्येक नागरिकास विनंती आहे की, त्याने कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यावा. याने साथ चांगल्या प्रकारे आटोक्यात येऊ शकेल. आजही आपण बघतो की, मुंबईमध्ये रोज पाचशे ते एक हजार दरम्यान नवीन रुग्ण आढळून येतात. लस उपलब्ध असताना ती न घेणे म्हणजे, आपण आपल्या कर्तव्यात चुकतो आहे, असे मला वाटते.
 
सामान्य माणसांच्या मनात लसीकरणाबद्दल अनेक शंका असतात. लसीच्या ‘साईड इफेक्ट’बद्दल मनात सुप्त भीती असते. काहीजण तर इंजेक्शनच्या सुईला सुद्धा घाबरतात. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य लोकशिक्षण फार गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, रुग्णालये व दवाखाने, सेवाभावी संस्था, आरोग्य सेवक या सर्वांकडून आरोग्य लोकशिक्षण अपेक्षित आहे. वृत्तपत्रे, टीव्ही, वृत्तवाहिन्या, अ‍ॅनिमेशन फिल्म याद्वारे आरोग्य लोकशिक्षण अधिक प्रभावी करता येऊ शकेल.
 
कोरोनाच्या तिसर्‍या मात्रेबद्दल शंकानिरसन
 
१ ) तिसरा डोस खरोखरीच गरजेचा आहे का?
 
नक्कीच. पहिला डोस दिला जात होता तेव्हा त्याने मिळणारे संरक्षण हे सहा ते नऊ महिने असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पहिल्या डोसमुळे साथीचा प्रसार कमी होऊ लागला व साथ आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच एप्रिल २०२१ मध्ये दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसला. दुसरा डोस घेणे गरजेचे ठरले. या दुसर्‍या डोसचे लसीकरणदेखील बर्‍यापैकी प्रभावी ठरले. कोरोना महामारीसारख्या साथीत फक्त उच्चभ्रू लोकांनी लस घेणे महत्त्वाचे नसते, तर हे लसीकरण तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यादृष्टीने केंद्रीय सरकारने ही लस मोफत उपलब्ध करून त्यांचे प्रभावी वितरण केले. आज आटोक्यात आलेली साथ ही लसीकरणाच्या दोन डोसच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आहे. तिसरा डोस सर्व नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घेतला, तरी सध्या आढळणार्‍या केसेस कमी होताना दिसतील. कोरोनाची साथ संपूर्ण आटोक्यात येईल.
 
२) कोरोना लसीचे असे किती डोस घ्यावे लागतील?
 
प्रत्येक व्हायरसची रचना वेगळी आहे. त्यांचा होणारा प्रसारदेखील वेगवेगळा आहे. कांजण्या (चिकन पॉक्स), गोवर या लसी एवढ्या प्रभावी ठरल्या की, प्राथमिक लसीकरणात या लसी मुलांना दिल्या गेल्यावर त्या मुलांचे या आजारापासून संरक्षण, तर झालेच शिवाय दरवर्षी येणारी साथदेखील गेली काही वर्षे कमी-कमी होताना दिसत आहे. या दोन्ही लसींचे वैशिष्ट्ये म्हणजे या लसींमुळे मिळणारे संरक्षण अनेक वर्षे (संपूर्ण आयुष्य) पुरते. त्यामुळे या लसीचे डोस पुन्हा पुन्हा घ्यावे लागत नाही.
 
 
कोरोना लसीमध्ये झपाट्याने होणार्‍या ‘म्युटेशन’मुळे लसीपासून मिळणारे संरक्षण अल्पकाळासाठी आहे. तिसरा डोस सध्या उपलब्ध आहे. तो आपण सर्वांनी घ्यावा. एवढ्यावरच कोरोना आटोक्यात येऊ शकतो. फक्त तिसर्‍या डोसचे लसीकरण प्रभावीपणे झाले पाहिजे. कोरोना व्हायरसमध्ये जसे ‘म्युटेशन’ होते, तसे आपल्या शरीरांच्या पेशींमध्येदेखील ‘म्युटेशन’ होते. कोरोना ‘व्हायरस’ निष्प्रभ करण्यासाठी आपल्या शरीरातदेखील गेल्या दोन वर्षांत अनेक बदल झाले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कोरोनाची साथ आटोक्यात येऊ शकते. त्यासाठी तुम्ही आम्ही हा तिसरा डोस घेणे गरजेचे आहे. देश पातळीवर ही लस उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने हजारो करोड रुपये खर्च केले आहेत. हा खर्च आपल्या उदासीनतेमुळे वाया जाऊ नये.
 
३) सध्या इतर आजारांच्या लसीकरणाची काय स्थिती आहे?
 
लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे देवीचे (स्मॉल पॉक्स) निर्मूलन झाले आहे. ‘पोलिओ’चे पण निर्मूलन होण्याच्या मार्गावर आहे. एमएमआर, कांजण्या (चिकन पॉक्स), हिपेटायटिस बी या लसींचा लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे दरवर्षी आढळणार्‍या या आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.पूर्वी सरकारी रुग्णालयात ‘ट्रिपल लस’ मोफत दिली जायची. त्याने धनुर्वात (टेटॅनस), घटसर्प (डिप्थेरिया) आणि डांग्या खोकला (परट्युसिस) या तीन आजारांपासून संरक्षण मिळत होते. आता केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे त्रिगुणी लसीत आणखी दोन लसींची भर टाकण्यात आली. ‘हिपेटायटिस बी’ आणि ‘हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाईप बी’ या दोन लसींची ‘ट्रिपल’ लसीत भर टाकण्यात आली. ही नवीन पंचगुणी लस एका इंजेक्शनने देता येऊ लागली व तिने पाच आजारांपासून संरक्षण मिळू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही महागडी पंचगुणी लस सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
 
 
४) ‘स्वाईन फ्लू’ लसीबद्दल अनेकांच्या शंका का असतात?
  
कोरोना लसीसारखेच ‘स्वाईन फ्लू’च्या लसीमुळे मिळणारे संरक्षण हे जेमतेम 12 महिन्यांचे असते. व्हायरसमध्ये होणार्‍या नित्य ‘म्युटेशन’मुळे ही लस दरवर्षी घेणे जरुरी आहे. ही लस सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाही. महागडी लस दरवर्षी घेण्याकडे लोकांचा कल दिसत नाही. असे असतानादेखील ‘स्वाईन फ्लू’च्या केसेस जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसत नाही व त्यातले मृत्यूचे प्रमाणदेखील कमी आहे. रुग्णांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यावर ‘टॅमी फ्लू’ हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने उपलब्ध आहे.
 
 
५) कोरोना लसीच्या तिसर्‍या डोसच्या लसीकरण कार्यक्रमात मी कसा भाग घेऊ शकतो?
 
सर्वप्रथम मी तिसरा डोस घेतला आहे की नाही, हे तपासून पहावे व घेतला नसेल तर तो त्वरित घ्यावा. आपल्यापैकी बर्‍याच जणांचा दुसरा डोस बाकी राहिला असेल किंवा एकही डोस घेतला नसेल, तर अशा लोकांनी डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे लसीकरण करावे. लस न घेऊन आपण समाजावर अन्याय केला आहे, याची जाणीव या लोकांनी ठेवावी.आपला तिसरा डोस झाला आहे, पण कुटुंबातील इतर व्यक्तींचा झाला नसेल, तर त्यांना लसीकरणासाठी लवकरात लवकर घेऊन जावे. याने आपले संपूर्ण कुटुंब कोरोनापासून सुरक्षित होईल.आपले शेजारीपाजारी, आपल्या घरी घरकाम करणारे, आपले सहकारी यांच्याकडेदेखील तिसर्‍या डोसची विचारणा करावी व त्यांना तिसरा डोस घेण्यास उद्युक्त करावे.सेवाभावी संस्थांनी घरोघरी सर्व्हे करुन लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा.
 
६) तिसरा डोस नाही घेतला, तर काय एवढे बिघडणार आहे?
एवढे काही बिघडणार नाही. देवाच्या कृपेने आपण सर्व कोरोना साथीत टिकलो. त्यास लसीकरणाची पण प्रभावी साथ होती. या प्रभावी लसीकडे आपण दुर्लक्ष करु नये.
- डॉ. मिलिंद शेजवळ
(लेखक ‘लसीकरण पालकांचे गाईड’ आणि ‘कोरोना फॅमिली डॉक्टरांच्या चश्म्यांतून’ या पुस्तकांचे लेखक आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0