इस्लामाबाद : आपला शेजारी देश पाकिस्तान मध्ये पुराने हाहाकार माजला आहे. आधीच टोलमास आर्थिक स्थिती असलेल्या पाकिस्तानसाठी हे दुहेरी संकट ओढवले आहे. संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर जायला लागलेली असताना पकिस्तान सरकारने देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. देशातील जवळपास प्रत्येक भागाला पुराने तडाखा दिलेला असून आता पर्यंत ९३७ जणांचा पुराने मृत्यू झाला आहे ज्यात ३४३ बालकांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ कोटींहून जास्त लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
एकट्या सिंध प्रांतात ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ बलुचिस्तान प्रांतात २३४, पंजाब प्रांतात १६५ तर पख्तुनवा प्रांतात १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची परिस्थिती सातत्याने ढासळत असून हे संकट आटोक्यात येण्यासाठीच्या सर्वच उपाययोजना फोल ठरल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकट्या ऑगस्ट महिन्यात २४१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे गंभीर पूरस्थिती ओढवली आहे. सर्वात जास्त फटका सिंध प्रांताला बसला असून तिथे सरासरीच्या तब्बल ७८४ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
पाकिस्तानात झालेला पाऊस बघता हे आतापर्यंत झालेला पाऊस हा अनैसर्गिकच म्हणावा लागेल. दक्षिणेकडील राज्यांना त्याचा जास्त फटका बसलेला असून वित्तहानी व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.