फुलपाखरांचे ‘रंगीत’ जीवनचक्र

28 Aug 2022 19:43:43
phulpakhru4
 
 
 
मनमोकळं बागडणं हे सुख-शांतीचे द्योतक आहे, तसंच भरपूर फुलपाखरं हेदेखील जंगलातील सुदृढ वनसंपदेचं द्योतक होय! फुलपाखरू हे केवळ स्वच्छंदी-मनस्वीपणाचेच प्रतीक नसून, पर्यावरणातील जैव आणि अन्नसाखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच फुलपाखरांच्या रंगीत, आणि बागडत्या आयुष्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
पूर्वीच्या काळी जेव्हा पर्जन्यमानाच्या पूर्वानुमानाबाबतीत फारसे तंत्रज्ञान पुढारलेले नव्हते, त्या वेळचा शेतकरी हा फुलपाखरांच्यास्थलांतरावर पर्जन्यमान ठरवायचा आणि त्याचे हे ’आडाखे’ हे अचूक असायचे! अर्थात, आजही पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर फुलपाखरांचे स्थलांतर सुरूच असते. पश्चिम घाटापासून ते पूर्व घाटापर्यंत आणि परत असा त्यांचा स्थलांतर मार्ग असतो. मंडळी, फुलपाखरांमध्येसुद्धा ’वधू-वर सूचक मंडळ’ असतं बरं का ! कदाचित अतिशयोक्ती वाटायची शक्यता आहे, पण खरंच अशा प्रकारची एक जागा असते. घनदाट जंगलातील उंचावरील टेकडीवर एखादं उंच झाड मध्यवर्ती ठिकाणी असतं, हेच ते फुलपाखरांच, ’वधू-वर सूचक मंडळ’ होय. केवळ फुलपाखरंचं नव्हे, तर अनेक प्रजातीतील कीटकदेखील या ‘वधू-वर सूचक मंडळा’चा ’लाभ’ घेतात.
 
 
या ठिकाणी विशिष्ट झाडावर बसून फुलपाखरं त्या प्रदेशातील आपापल्या प्रजातींच्या माद्यांची टेहळणी करत असतात. याला इंग्रजीत ’हिल टॉपिंग’ असं म्हणतात. फुलपाखरांच्या माद्यांनादेखील ही जागा बरोबर ठाऊक असते. अशा विशिष्ट उंचीवरील झाडांच्या लगत येऊन मादी फुलपाखरू नरांना गंधयुक्त इशारा देऊन निघून जातात. ‘समझनेवाले को इशारा काफी होता हैं!’ मग उंचावर टेहळणी करीत बसलेली नर फुलपाखरं, आपापल्या मादीच्या गंधाचा मागोवा काढीत तिचा पाठलाग सुरू करतात. जंगलातील ही अशी उंचावरील झाडे ही फुलपाखरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जागा असते.  फुलपाखरांच्या सर्व गरजा फुलांमधील ’मधुरस’ पूर्ण करू शकत नाही, म्हणून फुलपाखरांना पूरक अन्नाची गरज असते. फुलांपासून त्यांना शर्करा, ग्लुकोज मिळते. प्रजनन, पचन, ऊर्जा यासाठी त्यांना द्रवरूप मीठ (सोडियम), फॉस्ङ्खेट इत्यादींची गरज असते. ही गरज जमिनीतील क्षार पूर्ण करतात. आपण चिखलात बसलेली फुलपाखरे पाहिली असतील.

phulpakhru
 
ही फुलपाखरे जमिनीतून सोडियम, नायट्रोजन, फॉस्ङ्खेट व इतर क्षार घेत असतात. फुलपाखरांना सोंड असल्यामुळे, हे क्षार त्यांना द्रवरूपानेच लागतात. या क्षार जमवण्याच्या क्रियेला इंग्रजीत ‘मडपडलिंग’ असे म्हणतात. जमवलेले क्षार, छोट्या, छोट्या अशा कुप्यांमध्ये साठवून ठेवतात. ज्या नर फुलपाखरांकडे चांगल्या प्रकारचे सोडियम जमलेले आहेत, असे नर सुदृढ समजले जातात व माद्यांमध्ये विशेष प्रिय असतात. म्हणून सर्वच नरांमध्ये सोडियम जमवण्यासाठी धडपड सतत सुरू असते. नव्याने जन्मलेली नर फुलपाखरे जंगलातील पाणथळीच्या किंवा ओढ्यांच्या, नाल्यांच्या काठी मोठ्या संख्येने आढळतात.
 
 
केवळ खाद्य आणि ‘नेक्टर वनस्पती’च नव्हे तर डिंक, लाख यासारख्या झाडाच्या खोडातून द्रवपदार्थ स्रवणार्‍या वनस्पतीदेखील फुलपाखरांना अत्यंत प्रिय असतात. या झाडांतील स्रवणारा द्रव पदार्थ प्राशन करून, फुलपाखरं आपली पचनसंस्था नीटनेटकी करतात ! फुलपाखरे ही पक्षी, कोळी, सरडे, पाली, टोळ, चतुर, भुंगे, मुंग्या यांचे भक्ष्य आहेत. म्हणजेच काय ? फुलपाखरांच्या अंडे-अळी-कोष-प्रौढ फुलपाखरू या विविध अवस्थांमध्ये वरील पैकी कोणाचे ना कोणाचे भक्ष्य बनून, अन्नसाखळीस हातभार लावतात. पाली, मुंग्या, टोळ यांना फुलपाखरांच्या अंड्यातून प्रथिने, सत्व मिळतात, तर पक्षी-सरडे यांना फुलपाखराच्या आळीमधून. कोळी, टोळ, पक्षी हे प्रौढ फुलपाखरांची शिकार करत त्याच्यापासून आपले पोषण करतात.
 
 
 

पाखरू १ १ १ १  
 
फुलपाखरांचे जगणे माणसासाठी प्रेरणा-आनंददायी, तर ’मरणं’ हे पक्षी-प्राणी-कीटकांकरिता अन्नदायी असतं! एकूण काय तर मंडळी फुलपाखरांचा आणि वनस्पतींचा हा फारच जवळचा संबंध होता. तसं नसतं, तर संत तुकाराम, रामदास यांच्या ग्रंथात निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि त्याचे महत्त्व याचे पदोपदी उल्लेख हे महात्मे करतेच ना. काळाच्या ओघात आपण फुलपाखरू आणि परिसंस्थेचा संबंध विसरत चाललोय. आपल्या परिसरातून झपाट्याने फुलपाखरे दिसेनाशी झालेली आहेत. यालाच पर्यावरणाचा ’र्‍हास’ म्हणता येईल. अर्थात, याला बरेच घटक जबाबदार आहेत. यापैकी अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक घटक म्हणजे ’माणूस.’ आपल्या स्वतःच्या कळत-नकळत पर्यावरणाच्या र्‍हासाला माणसाने हातभारच लावला आहे, असे म्हणणे फारस चुकीचे ठरणार नाही.
 
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, फुलपाखरे ही ’नैसर्गिक इस्टेट’ मानून आपण (अगदी जमीन जायदाद, बंगला, बँक बॅलन्स या प्रमाणेच) ती जपूनच नव्हे, तर वाढवून त्यात भर घालून आपल्या भावी पिढीला सुपूर्द करण्याकरिता तुम्हाला आणि मला ही ’बटरफ्लाय इस्टेट’ जपायची आहे. याकरिता आपल्याला काही प्रयत्नपूर्वक गोष्टी टाळायच्या आणि करायच्या आहेत. आपल्या नकळत आपण आपले अनेक सण, हे वृक्षतोडीने किंवा झाडांच्या फांद्या तोडून साजरे करतो. उदाहरणादाखल एक सण पाहा, दसरा.
 
 
पाखरू
 
 
दसर्‍याला आपण शमीची किंवा आपट्याची पाने तोडून एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि एकादशीला, म्हणजे दुसर्‍या दिवशी ती पाने निर्माल्यात फेकून दिलेली असतात. आपट्याच्या या पानांवर फुलपाखरांचा वंश वाढत असतो. फुलपाखरांची अंडी, अळ्या आणि कोष या अवस्था आपट्याच्या पानांवरच अवलंबून असतात. ही पाने तोडल्यामुळे त्यांचा वंश खुंटतो. ‘ट्राय कलर पाईड फ्लॅट’ म्हणजे ‘तिरंगी प्रतल’, ‘कॉमन इमिग्रंट’ म्हणजे ‘भटक्या’ आणि ‘ब्लॅक राजा’ म्हणजे ‘कृष्ण नरेश’ या तीन फुलपाखरांची ’आपटा’ ही खाद्य वनस्पती आहे. बहुसंख्य लोकांना आपटा ही फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे, हेच मुळात माहीत नसल्यामुळे अजाणतेपणी हे घडते. मंडळी, येत्या दसर्‍यापासून आपट्याची पाने देण्याऐवजी आपल्या प्रियजनांना आपट्याचे रोपच दिले तर... कशी वाटते कल्पना ?
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0