जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेऊन काष्ठशिल्पकार बनलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, आटगावच्या संदीप अशोक निमसे या होतकरू कलाकाराविषयी...
ठाणे जिल्ह्यातील काष्ठशिल्पकार संदीप अशोक निमसे यांचा जन्म दि. 5 जानेवारी, 1983 साली शहापूर तालुक्यातील आटगाव या खेडेगावात झाला. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत कलाकार आजही योग्य व्यासपीठाअभावी दुर्लक्षित आहेत. त्यांच्याकडे समाजाचेही तितकेच दुर्लक्ष झाले आहे. मात्र, असे असले तरीही सर्वोत्तम कलाकृती साकारण्यासाठी जिद्द आणि कलात्मकता महत्त्वाची असते. अशीच कलात्मकता ठासून भरलेल्या संदीप यांनी काष्ठशिल्प कलेतच करीयर करण्याचा ध्यास घेतला आहे.
अतिशय हलाखीत बालपण गेलेल्या संदीपने प्रतिकूल परिस्थितीमुळे जेमतेम नववी इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाऐवजी त्याने शिल्पकलेतच रममाण होण्याचे ठरवले. शालेय जीवनात कागदावर चित्रे काढण्याचा छंद असल्याने एकदा लाकडावर गणपती बाप्पा कोरण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि अथक प्रयत्नाने कागदावर गणपतीची अप्रतिम कलाकृती चितारल्यानंतर त्याने हीच गणेशाची प्रतिमा लाकडाच्या फळीवरदेखील कोरली. ती काष्ठ शिल्पातील गणरायांची विलोभनीय प्रतिमा पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर संदीपला लाकडावर कोरीव चित्र काढण्याची कलाच अवगत झाली.
शिल्पकलेच्या दगड व धातू या दोन माध्यमांप्रमाणेच लाकूड किंवा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे. हस्त व्यवसाय व इतर कलामध्ये जसा लाकूडकामाचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणले जाते. काष्ठशिल्प कलेच्या माध्यमातून संदीपने अनेक कलाकृती लाकडात अजरामर करून ठेवल्या आहेत. संदीप हा एक कुशल कारागीर बनला आहे. लाकडावर कोरीव काम करून त्याने आजवर शिवराज्याभिषेक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आझाद यांसारख्या अनेक लोकनेत्यांचे व शिवसमर्थ, वीर हनुमान, गणपती बाप्पा, साईबाबा यांसारख्या देवदेवतांच्या तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा साकारल्या आहेत, अशी विविध चित्रे साकारून संदीप आपल्या कलेच्या अविष्कारातून त्यांच्यातील जीवंतपणा लाकडावर रेखाटत आहे.
लाकडावर कलाकृती साकारताना अतिशय संयम बाळगावा लागतो. शिवाय एकाग्रतेचीही चांगलीच कसोटी लागते. मात्र, संदीपने हे लिलया साध्य केले आहे आणि ते त्याच्या काष्ठ शिल्पकलेतून दिसूनही येते. अवघ्या दोन दिवसांच्या अवधीत संदीप हुबेहूब कलाकृती साकारतो. सुतारकामातील पटाशी, रंधा, पेन्सिल आणि वॉर्निशचा वापर करून तो लाकडावर कोरीव नक्षीकाम करतो. त्यामुळे प्रत्येक शिल्प जीवंत असल्याचे भासते. जेमतेम नववी शिकलेल्या संदीपच्या कलेचे शहापूर तालुक्यासह आजूबाजूच्या शहरी भागांतही कौतुक केले जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवर तसेच ठाणे नगरीतही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आल्याचे संदीप आवर्जून सांगतो.
आई, एक भाऊ, तीन बहिणी आणि पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार असलेल्या संदीपचे वडील गावचे सरपंच होते. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले होते. गावच्या सार्वजनिक मंडळामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असतो. नेहमीच गोरगरीब, वंचितांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे गावखेड्यात मानमरातब राखून असलेल्या संदीपची अनोख्या काष्ठशिल्पकलेच्या माध्यमातून एकप्रकारे समाजसेवाच सुरू आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर संदीपला मोठा धक्का बसला. मात्र, त्याने हार मानली नाही. ग्रामीण भागातील गावकुसात आपली ही काष्ठ शिल्पकला त्याने निरंतर जोपासत ठेवली आहे. त्याच्या या कलाकृतीला संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगरांमधून मोठी मागणी आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची दरवाजावर काढलेली कलाकृती पाहिली, तर अगदी हरखून जायला होते. त्यामुळे कला रसिक संदीपच्या काष्ठशिल्पांचे नेहमीच कौतुक करताना दिसतात.
संदीप याने लाकडावर कलाकुसरीने साकारलेल्या अनेक प्रतिमांना पुणे, नाशिक, मुंबई व कोकणात मोठी मागणी आहे. साध्या फोटोवरून लाकडी प्रतिमा बनविण्यासाठी त्याच्याकडे सध्या वाढती मागणी आहे. घराच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम, देवदेवतांची चित्रे, निसर्ग चित्रे तसेच महापुरुषांच्या प्रतिमा आणि लोकनेत्यांचे फोटोही लाकडावर हुबेहूब कोरत असल्याने संदीपच्या या काष्ठशिल्पकलेची ख्याती सर्वदूर पसरू लागली आहे. काही जण तर मोबाईलवर फोटो पाठवून काष्ठशिल्पातील प्रतिमा बनवून घेतात. त्याच्या कलेची जनमानसात वाहवा होत असली तरी शासन दरबारी या कलेची नोंद झाली, तरच ही कला जोपासली जाऊ शकते, अशी खंतही संदीप व्यक्त करतो.
कला क्षेत्राची निवड केल्याने आता याच क्षेत्रात काम करून खूप प्रगती करायची आहे. तोंडभरून कौतुक करून माझ्या या कलेची जाहिरात सध्या लोकच करतात, असे मानणारा संदीप नवीन पिढीला संदेश देताना, आपल्या कलागुणांना वाव द्या आणि एखादे क्षेत्र निवडले, तर त्यात स्वतःलाझोकून देऊन काम करा... यश हे तुमचेच असेल, असे सांगतो. प्रतिकूल परिस्थितीतही यशाची पायरी चढणार्या या हरहुन्नरी कलावंताला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!