सोशल मीडियावर सध्या समुद्री जीवांच्या कोरोना आणि ’स्वॅब टेस्टींग’ घेण्याचा एक व्हिडिओ ‘व्हायरल’ होत आहे. चिनी प्रसारमाध्यम ’साऊथ चायन मॉर्निंग पोस्ट’ या अधिकृत ’ट्विटर अकाऊंट’द्वारे हा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. कोरोना काळात जेव्हा चीनमध्ये हाहाकार माजला होता. त्यावेळेस कशाप्रकारे आरोग्य कर्मचार्यांनी जीवंत समुद्री जीवांना पकडून त्यांचे ’स्वॅब टेस्टींग’ केले होते, याची प्रचिती या व्हिडिओद्वारे मिळते.
जीवंत मासा, जीवंत खेकडा एकूणच काय चीनच्या समुद्रमार्गे येणार्या प्रत्येक गोष्टींची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, याचा उलटा असाही अपप्रचार झाला की आता समुद्री जीवांनाही कोरोना होणार की काय? सहाजिकच ज्या जीवांना फुफ्फुसेच नाहीत, अशांना कोरोनाचा त्रास तरी कसा होईल? तरीही या समुद्री जीवांची कोरोना चाचणी घेऊन चीनला नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवालही विचारला जाऊ लागला.
कोरोनाचे मूळ असलेल्या चीनच्या ’वुहान सी फूड मार्केट’मध्ये ज्यावेळी जगात पहिल्यांदा कोरोना बाधित आढळले होते. चीनचा खोटारडेपणाने कळस तर तेव्हाच गाठला ज्यावेळी ‘जागतिक आरोग्य संघटने’तून वुहान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पथक येऊन पोहोचले. त्यावेळेस तर त्यांचीही दिशाभूल करण्यात आली. इतके झाल्यानंतरही चीन स्वस्थ बसला नाही. याउलट शेजारील देश असलेल्या भारतात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली. भारताच्या शेजारील देशांना कर्जाच्या सापळ्यात ओढून त्यांच्या अर्थव्यवस्थाही खिळखिळ्या केल्या. ‘खाई त्याला खवखवे’, अशी म्हण आहे. त्यामुळेच चीन आता आयात केल्या जाणार्या सर्वच वस्तूंची आणि खाद्यपदार्थांची कोरोना चाचणी करावी लागत असल्याचा हा प्रकार दिसून आला.
कधी खेकडे, तर कधी मासे, कधी तर अन्य समुद्री जीवांना चिनी आरोग्य कर्मचारी ’पीपीई किट्स’ घालून कोरोना चाचणी करत आहेत. चाचण्यांची संख्या तब्बल पाच कोटींवर पोहोचली आहे. या चाचण्या वुहान मार्केट जिथून कोरोनाचा उगम झाला त्याच ठिकाणांहून केल्या जात आहेत. वुहान कोरोनाचे उगमस्थान आहे, ही बाब नाकारणार्या चीनवर तिथला भाजीपाला, समुद्री खाद्य या सगळ्या गोष्टींची ‘आरटीपीसीआर‘ चाचणी का करावी लागत आहे? हा प्रश्न आहे. चिनी प्रशासानाला आता नेमकी भीती कशाची वाटू लागली आहे? जगभरातून कोरोनाने काढता पाय घेतला तरीही अद्याप चीनमध्ये कोरोनाचे संकट ‘जैसे थे’ का आहे? तिथल्या लसीकरण मोहिमेचे पुढे काय झाले? हे सर्वश्रूत आहेच. शिवाय पाकिस्तानसारख्या देशांना चिनी ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसींचा कसा फटका बसला हा कोरोना काळातील इतिहास आजही कुणी विसरलेले नाही.
कोरोना महामारीच्या भयाण अनुभवानंतर चीन पुढील काळात काय आणि कशाप्रकारे रणनीती आखेल याची शाश्वती नाही. कोरोनाच्या आधीपासूनच वुहानबद्दल एक दावा केला जात होता की, तिथल्या प्रयोगशाळेत. जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे तब्बल एक हजार जनावरांच्या जनूकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यात ससे आणि माकडांचाही सामावेश होता. आता या दाव्याबद्दल ठोस पुरावे आढळलेच नाहीत. आढळले तरीही ते नष्ट करण्यात आले. चीनच्या वुहानमध्येच कोरोनाचा उगम आहे याबद्दलचा अहवाल ब्रिटिश पत्रकार जैस्पर बेकर यांंनी सादर केला होता. चिनी माध्यमांमध्ये येणार्या विविध वार्तांकनाद्वारे त्यांनी हा अहवाल तयार केला होता.
कोरोना काळात चीनच्या अशा करामती वारंवार उजेडात येत होत्या. अमेरिकेसह अन्य देशांत बंदी घालण्यात आलेले प्राण्यांवरील प्रयोग चीनमध्ये उघड उघड केले जात होते. प्राण्यांच्या शरीरात विषाणूचे ’इंजेक्शन’ टोचले जात होते. यापैकी काही प्रयोग मानवी शरीरावरही केले जात होते. तसेच, खाद्यपदार्थ आणि वापरांच्या वस्तूंवरही कोरोना विषाणूचा फैलाव केल्याचा प्रकारही जाणकारांनी उजेडात आणला होता. अर्थात त्यांचाही आवाज वेळोवेळी दाबण्यात आला. चीन विरोधात लिहिणार्या आणि संशोधन करणारे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ अचानक गायब होऊ लागले होते. इतकेच काय अमेरिकेने मैत्रीचा हात दाखविल्यानंतर तैवानलाही आता चिनी विषाणूंच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. जगात कोरोनाचा विस्फोट घडवणार्या चीनने आता प्राण्यांची ‘कोविड’ चाचणी करून भाबडेपणाचा आव आणला आहे की? स्वतःच पेरलेले विष उगवण्याची भीती आहे? हा प्रश्नच आहे.