नवे सरकार अन् गतिमान मेट्रोचा कारभार!

23 Aug 2022 21:41:21

 
mm
 
 
 
मुंबई महानगर क्षेत्रातील एकूणच वाहतुकीची परिस्थिती सुधारायची असल्यास मेट्रोचे जाळे विस्तारणे, सक्षम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण, मेट्रो रेल्वेसंबंधी कामे कोरोनाच्या कारणास्तव आणि कारशेडच्या प्रश्नामुळे काहीशी संथपणे सुरू होती. पण, आता राज्यात फडणवीस-शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर या मेट्रोेचा कारभारही पुन्हा गतिमान झाला आहे. तेव्हा, मुंबईतील विविध मेट्रो मार्गांची नेमकी सद्यस्थिती विशद करणारा हा लेख...
 
 
सध्या जगभरात रस्त्यांवरील वाहतूक अधिकाधिक सक्षम व्हावी म्हणून तज्ज्ञमंडळी खासगी वाहनांपेक्षा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी बळकट करता येईल, यालाच अधिकाधिक प्राधान्य देतात. पण, मुंबई महानगरपालिका मात्र ‘कोस्टल रोड’सारखे खर्चिक प्रकल्प राबवून खासगी वाहनांनाच शहरात चालना मिळावी, यासाठी धन्यता मानताना दिसतात. त्यामुळे महानगरपालिकेने आणि या प्रकल्पासाठी हट्ट करणार्‍यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, खासगी वाहनांची रस्त्यांवर वाढ झाल्यावर वाहतूककोंडीची समस्या अधिकाधिक वाढेल आणि शहराच्या विकासाला त्यातून अडसरच निर्माण होईल.
 
 
मेट्रोसारख्या वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूककोंडी कमी होईलच, पण ‘इलेक्ट्रिक’ मेट्रोमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी देखील कमी होण्यास मदत होईल. तसेच मुंबईच्या लोकल रेल्वेमधील गर्दी कमी होऊन लोकल सेवेचा दर्जा सुधारता येईल. एकूणच रेल्वे स्थानकांपेक्षा मेट्रोची स्थानके आपल्या घरापासून अर्धा ते एक किमीवर अंतरावर असल्यामुळे प्रवाशांसाठीही ती अधिक सोयीची ठरतील.
 
 
सध्या मुंबईत एकूण चार मेट्रो मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे, तर मोनोची सेवा मात्र तोट्यात आहे. सध्या मोनो रेल्वेची सेवा केवळ सात गाड्यांवर अवलंबून आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक 20 किमी लांब व 18 स्थानकांसह ती कशीबशी सुरू आहे. ‘एमएमआरडीए’ 590 रुपये कोटी खर्चून जानेवारी 2024 पर्यंत मोनोच्या आणखीन दहा गाड्या विकत घेणार आहे. याच मोनो रेल्वेच्या उभारणीसाठी 3025 रुपये कोटी इतका प्रचंड खर्च झाला आहे.
 
 
तसेच मोनो रेल्वेचे संचालन करणारी ‘स्कोमी’ संस्था 2018 मध्ये अडचणीत आल्यामुळे आता मोनोल रेल्वेचा सर्व कारभार ‘एमएमआरडीए’च्या अख्यात्यारीत आहे. या मोनो रेल्वेची अपेक्षित प्रवासीसंख्या दिवसाला दीड ते दोन लाख होण्याकरिता मात्र संचालकांकडून बहुस्तरीय प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, मेट्रो-3 पर्यंत व महालक्ष्मी स्थानकापर्यंत मोनोचा विस्तार करणे.
 
 
मेट्रो-1 - वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी रोज सुमारे पाच लाख प्रवासी मुंबईतील या पहिल्या मेट्रोचा लाभ घेतात. आजवर 72 कोटी मुंबईकर प्रवाशांनी या मेट्रोसेवेचा लाभ घेतला आहे. तसेच आता ही मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावून सेवा पुरविणार आहे. देशातील ही पहिली मेट्रो आहे, जिने नोव्हेंबर 2017 पासून व्हॉटसअ‍ॅपवर मोबाईल तिकीटे देण्यास सुरुवात केली.
 
 
‘मेट्रो मार्ग 2 अ’ व 7
 
या मेट्रो मार्गावरील टप्पा-1 मधील अनुक्रमे आनंद नगर ते डहाणूकरवाडी आणि दहिसर पू ते आरे कॉलनी हे मार्ग गेल्या 22 एप्रिलपासून प्रचालनात आहेत. या मेट्रोच्या प्रचालनाचा दुसरा टप्पा अनुक्रमे डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि आरे कॉलनी ते अंधेरी पूर्व सुरू करण्यासाठी डिसेंबर 2022 उजाडणार आहे व या दोन्ही मार्गांवरील मेट्रोच्या चाचण्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. या दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्याचे प्रचालन तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे.
 
 
परंतु, प्रवाशांची संख्या केवळ सरासरी 26 हजार इतकी आहे. ही संख्या दुसर्‍या टप्प्यानंतर निश्चितच वाढेल. अंधेरीत विमानतळ ‘मेट्रो 7 अ’ हा 2.7 किमी लांब मार्ग असून ती मेट्रो-7चाविस्तार आहे. या मेट्रो 7-अ मध्ये दोन स्थानके राहणार आहेत. एक विमानतळाजवळ भूमिगत व दुसरे या मार्गावरील उन्नत स्थानक असेल. ‘मेट्रो 2 अ’ व 7 यांच्या 18 स्थानकांबाहेर सायकल प्रवासाची देखील सोय करण्यात येणार आहे.
 
 
मेट्रो मार्ग 2 ब - डीएन नगर ते मंडाले - स्थूल किंमत रु. 10,986 कोटी; लांबी 23.6 किमी उन्नत स्वरुपात; प्रचालनात येण्याचे अंदाज 2024
 
 
इतर मार्गांचे काम प्रगतीपथावर
 
‘मेट्रो मार्ग 3’ - कुलाबा-वांद्रे-सीप्झ; स्थूल खर्च रु. 23,136 कोटी, यामध्ये यापुढे रु. 33,405 कोटी; आधीच्या खर्चात 44 टक्के वाढ करण्यात आली. कारण, जमीन खणण्यासाठीचा खर्च वाढला. तसेच ट्रॅफिककरिता तात्पुरते स्टील डेक बांधावे लागले. अधिक मेट्रो गाडी आठ डब्यांची असल्यामुळे त्याकरिता जादा खर्च. सरकारच्या विलंबित निर्णयामुळे आरे कारशेडचे काम लांबले आणि त्यामुळे वाढीव खर्चा भुर्दंड. या मार्गाचे काम नेव्हीनगरपर्यंत विस्तारित होणार असून कफपरेड ते नेव्हीनगरपर्यंत लांबी अडीच किमी व जास्तीची स्थूल किंमत रु 2500 कोटी इतकी असेल. या मेट्रो मार्गाच्या भुयारीकरणाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.
 
 
 रूळ आणि अन्य महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर सध्या युद्धपातळीवर भर दिला जात आहे. याचे रुळ ‘लो व्हायब्रेशन’ पद्धतीचे म्हणजे गाडी रुळावरून गेल्यावर आजूबाजूला तिचे धक्के जाणविणार नाहीत अशा स्वरुपाचे असून रुळामध्ये कंपन शोषले जाणार आहे. सारिपूतनगरमध्ये यशस्वीरित्या आठ डब्यांच्या गाडीची कारशेडमध्ये जोडणी झाली असून 350 टन वजन खेचण्याची क्षमता या बॅटरीचलित शंटरची आहे.
 
 
या मेट्रो मार्गाच्या गाडी व रुळावरील चाचणीचे काम आता सुरू होईल. कारण, तात्पुरते कारशेड उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आंध्र प्रदेशातून डबे यायला सुरुवात झाली आहे. हे डबे निळसर हिरवे व पिवळा फिक्या रंगात आहेत. डब्याचे वजन 42 टन आहे. सारिपूतनगर ते मरोळ नाका या तीन किमी अंतरावर मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ही गाडी स्वयंचलित, संपूर्ण वातानुकूलित व आर्द्रता नियंत्रित आहे. मनोरंजनासाठी व जाहिरातींसाठी ‘एलसीडी’, मार्गाचा ‘डिजिटल’ नकाशा; सुंदर बैठक व उभे राहण्यासाठी खांबाची व्यवस्था; ‘सीसीटीव्ही’, अद्ययावत एअर सस्पेन्शन्चा वापर, प्रत्येक डब्यात अग्निशमनाची, धूर व अग्निरोधक यंत्रणा असणार, आपत्कालीन वापरासाठी वा अन्य कामासाठी प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात ध्वनी संवाद यंत्रणा असणार.
 
 
‘मेट्रो मार्ग 4’ व ‘4 अ’ - वडाळा ते कासारवडवली-गायमुख, लांबी 32.3 किमी व 2.7 किमी, स्थूल किंमत रु 14,549 कोटी व रु. 949 कोटी, 45 टक्क्यांहून जास्त स्थापत्य कामे पुरी झाली आहेत. या मेट्रोची लांबी सर्वांत लांब म्हणजे 35 किमी अशी आहे. प्रचालनाची शक्यता 2024 मध्ये होईल.
 
 
‘मेट्रो मार्ग 5’ - ठाणे-भिवंडी-कल्याण, लांबी 24.9 किमी व स्थूल किंमत रु 8417 कोटी, प्रचालनाची अपेक्षा सन 2024
‘मेट्रो मार्ग 6’ - समर्थ नगर ते विक्रोळी, लांबी 14.5 किमी. स्थूल किंमत रु. 6776 कोटी, या कामाचे 59 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे कांजुरमार्ग स्थानक दहा मजल्यांएवढे 30 मी उंच होणार. प्रचालन 2023 मध्ये होईल, अशी अपेक्षा आहे.
‘मेट्रो मार्ग 8’ - नवी मुंबई विमानतळ ते मुंबई विमानतळ, स्थूल किंमत रु. 15 हजार कोटी, लांबी 35 किमी. काम नियोजनात आहे.
 
 
‘मेट्रो मार्ग 9’ - दहिसर पू ते मीरा-भाईंदर, लांबी 13.5 किमी, स्थूल किंमत रु 6607 कोटी. प्रचालन अपेक्षित काळ - सन 2024.
‘मेट्रो मार्ग 10’ व 12 - मीरा रोड ते गायमुख व कल्याण ते तळोजा लांबी अनुक्रमे 9.2 किमी व 20.75 किमी, स्थूल किंमत रु 3831 कोटी व रु 4738 कोटी. सल्लागाराची नियुक्ती झाली. मेट्रो कामे नियोजनात.
 
 
‘मेट्रो मार्ग 11’ - वडाळा ते जीपीओ, लांबी 12.7 किमी, स्थूल किंमत रु. 8739 कोटी, काम नियोजनात.
‘मेट्रो मार्ग 13’ - शिवाजी चौक ते विरार, लांबी 23 किमी. स्थूल किंमत रु6900 कोटी. काम नियोजनात.
 
 
पुणे मेट्रो
 
शिवाजी धान्य गोदाम (सिविल कोर्ट) ते रामवाडी मेट्रोचे काम 95 टक्के पुरे झाले आहे. सात स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. कोर्ट ते गरवारे कॉलेज वा बंडगार्डन मार्ग प्रचालनात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
  
मेट्रो कामांकरिता कारशेड
 
मेट्रो-1 करिता कारशेड वर्सोवा येथे आहे; मेट्रो ‘2अ’ व 7 करिता कारशेड चारकोपला, ‘मेट्रो 3’ करिता आता कारशेडसाठी सरकारने आरे येथे पूर्वनियोजित जागेवर कारशेड बांधण्याची संमती दिली आहे. पण, कंत्राटदारांनी चाचण्या घेण्यासाठी तात्पुरती कारशेड सारिपूतनगरला उभी केली आहे. एप्रिल 2023 मध्ये कारशेडचे काम पूर्ण होईल. ‘मेट्रो 4’, ‘10’, ‘11’ करिता मोग्रापाड्याला कारशेडकरिता भूखंड मिळाला आहे.
 
 
‘मेट्रो 5’ करिता कशेळीला भूखंड मिळाला आहे. ‘मेट्रो 6’ करिता सरकारचा विक्रोळीला कारशेड बांधण्याचा विचार आहे; ‘मेट्रो 2 ब’ला कारशेड मंडालेला होणार आहे; ‘मेट्रो 9’ करिता कारशेड राई मुर्धाला होण्याची शक्यता आहे; इतर मेट्रोकरिता कारशेड मिळविण्यासाठी कामे नियोजनात आहेत.
 
 
त्यामुळे आगामी काही वर्षांत मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारल्यास, मुंबई महानगरातील वाहतूककोंडी आणि इतर सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0