अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले एक नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, अभिनेते, पथकथालेखक, संगीतकार आणि गायक असे विविध गुणसंपन्न असे एक ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. पुलंच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने ‘पु. ल. कट्ट्या’ची स्थापना केली. ‘पु. ल. कट्टा’ हे कल्याणमधील मुक्त विचारांचे एक व्यासपीठ... या ‘पु. ल. कट्ट्या’विषयी जाणून घेऊया.
पुलंना अभिप्रेत असलेली, रसिकता, लोकशाही मूल्ये, साहित्य-संगीत, कलाक्षेत्रत कार्यरत असणार्या प्रतिभावंतांशी संवाद वृद्धिंगत व्हावा, ही ‘पु.ल. कट्टा’ स्थापनेमागील प्रेरणा आहे. कट्ट्याचे संस्थापक किशोर खराटे यांना पुलंचा सहवास लाभला होता. पुल गेल्यानंतर त्यांचे एक स्मारक कल्याणात असावे, असे खराटे यांच्या मनात आले.
आयुष्यभर पुलंनी जी सामाजिक बांधिलकी जपली, जी साहित्यिक-सांस्कृतिक मूल्य जोपासली त्या मूल्यांचा , त्या अभिरूचीचा समाजात प्रसार व्हावा, विचारांचं आदान-प्रदान, चर्चा-संमेलनं, मान्यवरांची व्याख्यानं या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ’पु. ल. कट्टा’ या संस्थेची स्थापना झाली. कट्ट्यात पदाधिकार्यांची पदं न ठेवता सर्व सदस्यांना समान असे सर्वाधिकाराचे संयोजक हे पद देण्यात आले. कुठलाही बडेजाव, अनाठायी खर्च न करता अत्यंत साधेपणाने, कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबवले आहेत.
लहान मुले ही टीव्हीमध्ये गुंतून पडू लागली आहे. तसेच वाचन आणि कलेपासून दुरावत चाललेली आहेत. या बालकांनी पुन्हा एकदा साहित्याकडे वळावे, यासाठी माधुरी पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘बाल कला साहित्य संमेलना’चे आयोजन कट्ट्याच्यावतीने केले होते. त्यानंतर पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावी, नागरिक आणि पोलीस यातील संवाद वाढावा व पोलिसातील प्रतिभावतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पोलीस प्रतिभा संमेलन भरविण्यात आले होते.
कवी नारायण सुर्वे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या संमेलनाचे उद्घाटक होते. संमेलनाचा समारोप तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कट्ट्याावर आतापर्यंत अरूण साधू, य.दि. फडके, पुष्पा भावे, गिरीश प्रभुणे, रत्नाकरी मतकरी, अरूणा ढेरे, अशोक नायगावकर, न्या. नरेंद्र चपळगावकर, विजय केंकरे, वंदना गवाणकर, अरूण म्हात्रे, प्रविण दवणे, संदेश ढगे, किरण येले , मधुकर आरकडे, नारायण लाळे, सतीश सोळांकुरकर या मान्यवरांनी कट्ट्यावर उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधला आहे.
कट्ट्याच्या उपक्रमाची दखल घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांच्या प्रयत्नांतून कल्याण महानगरपालिकेने कट्ट्यास जागा व वाचनालयासाठी वास्तू उपलब्ध करून दिली आहे. या वास्तूचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते पार पडले होते. विंदांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाल्याच्या बातमीने मराठी साहित्य विश्वात चैतन्य निर्माण झाले. विंदाची कविता म्हणजे कालातीत, अर्थाचे अनेक पदर असणारी चिंतनगर्भ अभिव्यक्ती. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कट्टा कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी कट्टा संयोजक अर्जुन डोमाडे यांनी विंदांच्या कवितेतील आशय चित्रातून समर्थपणे मांडता येईल व महाराष्ट्रातील चित्रकारांना एखाद्या स्पर्धेतून ही संधी देता येईल, अशी संकल्पना त्यांनी विदांच्या समोर मांडली.
विदांनादेखील ही संकल्पना खूप आवडली. त्यासाठी त्यांनी लगेचच अनुमतीही दिली. कट्ट्याने आयोजित केलेल्या ‘रंग तुमचे-शब्द विंदांचे’ या अभिनव स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. बाल,कुमार व व्यावसायिक अशा तीन गटांत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध चित्रकार केळकर आणि नेत्र साठे यांनी काम पाहिले होते. ही चित्रे विंदांना दाखवण्यात आली. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक तर केलेच, पण आवडलेल्या चित्रांवर त्यांनी स्वाक्षरीही केली. विजेत्यांना पारितोषिक देणे त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शक्य झाले नाही. मात्र, संगीतकार यशवंत देव यांनी कट्ट्यावर उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान केली. ‘पु. ल. कट्ट्या’वरील या कार्यक्रमाची दखल उभ्या महाराष्ट्राने घेतली आहे.
‘पु. ल. कट्टा’ ही संस्था केवळ पुलंच्या साहित्यावर प्रेम करणार्या चाहत्यांचीच संस्था नाही. पुलं जे आयुष्य जगले, जे सामाजिक भान त्यांनी जपलं, ज्या कालबाह्य रुढींचा धिक्कार आणि पुरोगामी नव्या विचारांचा स्वीकार त्यांनी केला, ज्या दातृत्वाचा आदर्श त्यांनी दाखविला, या समग्र विचारांचा वारसा जपणार्या कार्यकर्त्यांच्याप्रबोधनाची चळवळ आहे. पुलंनी एका पत्रात असं म्हटलंय, ”मी पोथीनिष्ठ मार्क्सवादीही नाही की मी गांधीवादीही नाही.
मानवनिर्मित दु:ख नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त कुठल्यातरी एका पोथीत आहे असं मला वाटत नाही.” या विचाराने प्रेरित होऊन ‘पु.ल. कट्टा’ वाटचाल करीत आहे. विचारांचं हे मुक्त विद्यापीठ सर्वसमावेशक बनवण्याचा , अधिकाधिक प्रभावशाली बनवण्याचा ‘पु. ल. कट्ट्या’चा प्रयत्न आहे. संघर्षापेक्षा सामंजस्य, वैचारिक देवाणघेवाण, लोकशाहीला अभिप्रेत असणारी सहिष्णुता हाच प्रबोधनाकडे जाण्याचा मार्ग आहे, असे ‘पु. ल. कट्ट्या’चे कार्यकर्ते मानतात.
‘पु. ल. कट्ट्या’तर्फे 8 नोव्हेंबर 2018 ते 7 नोव्हेंबर 2019 या कालवधीत पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने चित्र-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कल्याण शहरातील सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या हस्ते दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. पुलंच्या साहित्यातील ‘व्यक्ती आणि वल्ली’ साभिनय सादरीकरण, मराठी भाषा दिनानिमित्त परिसंवाद, चर्चासत्र, अभिवाचन, एकपात्री, कथाकथन व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषित वितरणांचा कार्यक्रम संपन्न झाला होता.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचे अनुभव कथन व त्यांचा गुणगौरव करण्यात आला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील श्रमिकांचे प्रतिभा संमेलन भरविण्यात आले. काव्य, कला ,संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत मैफील भरवित ’चांदणे संमलेन’ पार पडले. या जन्मशताब्दी महोत्सवांची सांगता परिसंवाद, विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा सत्कार या कार्यक्रमांनी झाली.
‘पु. ल. कट्ट्या’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिभा संमेलना’च्या स्मृती जागविणार्या काही चित्रफीत युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. तसेच ‘पु. ल. कट्ट्या’ने पुलं यांच्यावर काही व्हिडिओ क्लिपही तयार केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पुलंचे विचार मांडण्यात आले आहे. पुलं हे आयुष्यात मला भावलेले एक गुंज सांगतो, “उपजीविकेसाठी आवश्यक असणार्या विषयांचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण एवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, कला, संगीत , नाटय, शिल्प खेळ यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं, हे सांगून जाईल,” असे म्हणत असत. त्यांची ही शिकवण या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. ‘पु. ल. कट्ट्या’चा भविष्यातही अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करून कला, साहित्य, नाट्य, संगीत या विषयाची अभिरूची संबंधित करण्याचा व महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित समृद्ध करण्याचा मानस आहे.