मुंबई : आमीर खानच्या कोणत्याही चित्रपटाला एवढा विरोध झाला नव्हता जेवढा लाल सिंग चढ्ढाला होत आहे. आपल्या ड्रीम प्रोजेक्टला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देतील अशी, आमीरला अपेक्षा होती परंतु या चित्रपटाच्या अपयशाने त्याला चांगलेच रडवले आहे. प्रेक्षक 'लाल सिंग चढ्ढा'कडे अशाप्रकारे पाठ फिरवतील हे त्याला अपेक्षित नव्हते. आमीरच्या जोडीने अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी अशीच पाठ फिरवली आहे. बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा आणि बॉयकॉट रक्षाबंधन-बॉलीवूड या ट्रेंडनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या सर्वात सोशल मिडीयावर मिम्सना उधाण आले आहे. आमीर खानच्या 'थ्री इडियट्स'मधील चतुरचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजकुमार हिरानीच्या थ्री इडियट्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये थ्री इडियट्सचे नाव हे आवर्जुन घेतले जाते. त्यात इंजिनिअरींग कॉलेजच्या कार्यक्रमात कुलगुरुंची खिल्ली उडवतानाचा एक सीन आहे. त्यात चतुरनं भाषण करत धमाल उडवून दिली होती. आता त्याच प्रसंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आमीरवर निशाणा साधला जात आहे.
आमिरच्या लाल सिंग चढ्ढानं अकरा दिवसांत फक्त ५५ कोटींची कमाई केली आहे. आमिरला पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या 'लाल सिंग चढ्ढा'ची खिल्ली उडवणारे भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. चतुर फेम ओमी वैद्यच्या त्या मीम्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ओमी आणि आमीरचा त्यात एक संवाद होता. 'एक दिन तुम सब रोओगे और मैं हंसूंगा।' आता ओमीचे ते मीम्स व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हे आमीरला ट्रोल करण्यासाठी मिम्स हे चांगलेच शस्त्र नेटकऱ्यांना मिळाले आहे.