तब्बल १ कोटींहून अधिक भाविकांनी घेतले काशिविश्वनाथाचे दर्शन

आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत

    20-Aug-2022
Total Views |
Vishvanath
 
वाराणसी : श्रावण महिना हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला गेला आहे. याच महिन्यात काशीमध्ये विश्वनाथांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र भाविकांच्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. यावर्षी एक कोटींहून अधिक भाविकांनी येथे येऊन काशिविश्वनाथाचे मनोभावे दर्शन घेतले आहे. विश्वनाथ मंदिराने ही माहिती जारी केली आहे. भाविकांनी मंदिरात पाच कोटींहून अधिकचा दानधर्मही केला आहे.
 
 
श्रीकाशिविश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार वर्मा यांनी सांगितले की, पवित्र श्रावण महिन्यात बाबा भोलेनाथांचे दर्शन घेणार्‍या भाविकांनी याआधीचे सर्व विक्रम मोडले. जलाभिषेक करण्यासाठी दररोज अडीच ते तीन लाख भाविक मंदिरात पोहोचले. त्याचवेळी संपूर्ण महिन्यात हा आकडा एक कोटींच्या पुढे गेला आहे. विश्वनाथांच्या मंदिरात मनीऑर्डर, दानपेटी, ऑनलाईन, ऑफलाईन अशा विविध माध्यमांतून सुमारे पाच कोटी रुपये जमा झाले आहेत.
 
 
सुनील कुमार वर्मा यांनी सांगितले की, श्रावणात ४० किलोपेक्षा जास्त चांदी आणि एक कोटींपेक्षा जास्त किमतीचे सोनेदेखील भक्तांनी दान केले आहे. यावेळी श्रावणामध्ये भाविकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तंबू, मॅटिंग, पिण्याचे पाणी, ग्रील, इलेक्ट्रिक कुलर यासह अन्य साधनांचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था करण्यासाठी मंदिर प्रशासनाने सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.