अर्णव, कंगना आठवतात का?

02 Aug 2022 10:29:38

raut
 
 
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी रविवारी रात्री ‘ईडी’ने अटक केली आणि सोमवारी त्यांना न्यायालयातही हजर केले. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या तारखेला सकाळी सकाळी माध्यमांना बेताल बोलून दिवसभराचे खाद्य कोण पुरवणार, याची सर्वांना उत्सुकता होतीच. पण, किशोरीताई नाही, अंधारेबाई नाही की दीपाली सय्यदही नाही, खुद्द पक्षप्रमुखच माध्यमांसमोर साक्षात अवतरले.
 
 
राऊतांसारखे गरळ ओकण्याचे कौशल्य अन्य प्रवक्त्यांमध्येच नाहीच की, म्हणून साहेबांनाच थेट मैदानात उतरावे लागले म्हणा. आता उरलासुरला पक्ष सावरायचा म्हटलं की, असंच रोज माध्यमांमध्ये झळकण्यापलीकडे त्यांच्याकडेही पर्याय नाहीच म्हणा! पण, कालही उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या अटकेला सूडबुद्धीची कारवाई ठरवत सवयीनुसार भाजपला नुसते टोमण्यांचेच टोले लगावले.
 
 
ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, “संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवत असाल, तर सगळे दिवस काही कायम राहत नाहीत. दिवस फिरतील तेव्हा नड्डा काय करणार? संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? ते निर्भीड पत्रकार आहेत. ते मरेन पण शरण जाणार नाहीत.” म्हणजे राऊतांना अटक झाल्यानंतर ते ‘निर्भीड पत्रकार’ ठरतात आणि एरवी कट्टर शिवसैनिक!
 
 
पण, मग अर्णव गोस्वामी यांच्यावर जेव्हा महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली, तेव्हा गोस्वामी कोण होते? त्यांना कशाप्रकारे वागणूक दिली गेली? तेव्हा, आपणही एका निर्भीड पत्रकाराचा आवाज दाबतोय, याचे भान ठाकरेंना होते का? तर नक्कीच नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊत यांच्यावर पत्रकारितेसंबंधी किंवा त्यांच्या पक्षाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावरुन कारवाई झालेली नाही. ही कारवाई आर्थिक घोटाळ्याप्रकरणी झाली आहे, ज्याचा पत्रकारितेशी किंवा शिवसेनेशी काय संबंध? त्यामुळे ठाकरेंना राऊतांची वकिली करायची इतकीच जर हौस असेल तर त्यांनी पत्राचाळ प्रकरणी मान्य होईल असे स्पष्टीकरण देऊन दाखवावे.
 
 
राऊत निर्दोष आहेत, याचे पुरावे द्यावे. पण, ठाकरे यापैकी काहीएक करणार नाहीत. कारण, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, मलिष्का यांच्यासारख्यांवर पोलीस, पालिका यंत्रणांनी कसा छळ केला होता, ते जनता विसरलेले नाही. तेव्हा, हाच तो नियतीचा न्याय!!
 
 
राऊतांचा इतका पुळका का?
 
 
आज ‘ईडी’ने कोठडीत टाकल्यानंतर संजय राऊत शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यापेक्षा ‘पत्रकार’ म्हणून मुद्दाम उल्लेखले जाऊ लागले. पण, आधीही म्हटल्याप्रमाणे पत्रकार म्हणून किंवा शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून या प्रकरणात राऊत अडकलेले नसून व्यावसायिक हितसंबंध आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झालेली ही अटक आहे. पण, मुद्दाम पत्रकार, संपादक असा त्यांचा उल्लेख करुन माध्यमांचीही सहानुभूती पदरी पाडण्याचाच शिवसेनेकडून सुरू असलेला हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. त्याला मराठीतील काही माध्यमांनी (‘चायबिस्कुट पत्रकार’ म्हणून सध्या ख्यातनाम!) अगदी उघडउघड थाराही दिला.
 
 
एका मराठी वृत्तवाहिनीच्या ‘बड्या’ अँकरने तर ‘राऊतांनी सकाळी लेखणी कशी मिस केली असेल’ इथंपासून ते त्यांनी बाळासाहेबांची ‘ठाकरी शैली’ वगैरे कशी आत्मसात केली, त्यांना ‘कार्यकारी’ नाही तर बाळासाहेबांनंतर ‘सामना’चे संपादक म्हणूनच बसवण्याचा मोठेपणा शिवसेनेने दाखवायला हवा होता, म्हणून चक्क राऊतांची कवने गायली. पण, आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या राऊतांना पत्रकार म्हणून एवढी सहानुभूती मुळात दाखवण्याची गरजच काय? यापैकी किती पत्रकारांनी पत्राचाळीतील ज्या नागरिकांची फसवणूक करण्यात आली, जे बेघर झाले, त्यांच्या व्यथा महाराष्ट्रासमोर ठेवल्या?
 
 
पण, आपण पत्रकार आहोत आणि दुसर्‍या पत्रकाराला अटक होतेय, म्हटलं की ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला’ वगैरे म्हणत या टोळक्याची सहानुभूतीच्या लाटेला एकाएकी भरते आले. पण, अर्णव गोस्वामी असतील किंवा ‘लॉकडाऊन’ दरम्यान बातमीमुळे वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दी जमवल्याचा ठपका ठेवत ‘मविआ’ने एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला केलेली अटक असेल, तेव्हा ही सगळी पत्रकार मंडळी कुणीकडे लपली होती? त्यामुळे राऊतांचा खरंच पत्रकार म्हणून पुळका आहे की, खासदार-प्रवक्तेपद त्या पत्रकाराच्या पाठीशी आहे म्हणून हे तळी उचलण्याचे नसते धंदे? त्यामुळे खरंतर या पत्रकार मंडळींनीच राऊतांना एक प्रश्न विचारण्याची हिंमत करुन दाखवावी.
 
 
राऊतसाहेब, तुम्ही एवढ्या वर्षांपासून ‘सामना’चे कार्यकारी संपादक. त्यात सेनेचे निष्ठावान, खासदारही. संपादक म्हणून पगारही गलेलठ्ठच. त्यात खासदारकीचे लाभ ते वेगळे. मग हे जमिनीचे व्यवहार, फसवणूक, बंगले खरेदी याची इतकी हाव कशासाठी?
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0