भाजपच्या दहीहंडीमुळे वरळीत विरोधकांचे थर गडगडले

18 Aug 2022 22:30:48

news news
 
 
भाजप मुंबई अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलारांचे ठाकरेंवर टीकास्त्र


मुंबई (गायत्री श्रीगोंदेकर) : वरळीतील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उत्सवाची राज्यभरात चर्चा आहे. वरळी हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वरळीत भाजपच्या दहीहंडी उत्सवाला युवकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा उत्सव मोठ्या राजकीय बदलाचे संकेत आहेत का? भाजपची यामागील रणनीती नेमकी काय? याबाबत भाजप मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी दै.मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.


वरळीतील दहीहंडी उत्सवाची राज्यभरात चर्चा आहे. काय सांगाल ? 


भारतीय जनता पार्टी यावर्षी राज्यभरात ३७२ ठिकाणी गोविंदा आणि दहीहंडीचे कार्यक्रम करते आहे. मोठ्याप्रमाणात आम्ही टी शर्टचे वाटप, सराव शिबिरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गोविंदांना विमा कवच यास्गळ्यावर आम्ही मोठ्याप्रमाणावर काम करतोय. साहजिक आहे की युवकांचा ओढा हा मोदीजींच्या पाठीशीच आहे. युवकांचे नेतृत्वातील पहिले चॉईस हे नरेंद्र मोदी आहेत. म्हणून युवकांचा उत्साह वाढविणाऱ्या या सणाचे, साहसी खेळाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्याचे आम्ही ठरविले. त्यानुसार हा कार्यक्रम आम्ही जांबोरी मैदानावर करत आहोत. स्वाभाविक आहे ते केल्यामुळे आमच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.


वरळी हा युवासेनेचे नेते आणि प्रमुख आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. त्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून येणारं प्रत्युत्तर याकडे तुम्ही कसे पाहता?

मुळात ते काय बोलता याच्याशी आमचा काही संबंध नाही. मुळात वरळी कोणाचा गड वगैरे मी मानत नाही. स्वतः आदित्य ठाकरे भाजपसोबतच्या युतीमध्ये भाजपच्या मतावर निवडून आले आहेत. त्यांना अजून सिद्ध करायचं आहे की पक्षच्या मतावर ते निवडून येऊ शकतात का? २०१४ला हे आम्ही सिद्ध केला आहे. २०१४ला मी स्वतः युतीविना निवडून येऊन हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे हा गड त्यांचा नव्हेच ! त्या मतदारसंघाचे कधीकाळी नेतृत्व भाजपचे दत्ताजी राणे करत होते. ते त्याठिकाणहून मंत्री होते. आज गिरणगावात गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आम्ही आजही लढा देत आहोत. म्ह्णून त्या मतदारसंघात भाजपने कार्यक्रम करणे स्वाभाविक आहे. त्याचा त्रास उद्धव ठाकरेजिच्या पक्षाला होत असल्याने ते जर पोपटपंची करत असतील तर त्याला मी फारसं महत्व देत नाही.


आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातून तुम्हाला प्रत्युत्तर देता आलं असतं मात्र तसं न करता दादरमधून तुम्हाला आव्हान दिलं जातंय. याचा अर्थ नेमका काय?

दादरमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन हे प्रत्युत्तर नाही ती त्यांची पळापळ आहे. ती त्यांची धावपळ आहे. त्याचं कारण असं की, ज्या नावाने ते दादरमध्ये दहीहंडी लावत आहेत. 'निष्ठेची दहीहंडी' असं. उद्धव ठाकरेंच्या त्या निष्ठेची कार्यपद्धती ही प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र गोळा करून आहे. अख्या दादर विधानसभेत त्यांना साडेतील हजार प्रतिज्ञापत्र मिळाली आहे.वरळीच्या त्यात सर्वात शेवटचा नंबर आहे. २ हजार पण प्रतिज्ञापत्र आली नाही. मग तिथे निष्ठावान नसल्यामुळे दादरमध्ये निष्ठावान शोधण्यासाठी ते जरूर गेले असतील. संपूर्ण मुंबईत त्यांनी लक्षात ठेवावं भाजपची संख्या ऑनलाईन, व्हेरीफाईड सदस्य संख्या १७ लाख इतकी आहे. तुम्ही आमच्या जवळपासही नाहीत.


कोणी कितीही थर लावले तरी मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा शिवसेनेचाच बसणार असं शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटातील आमदार म्हणत आहेत. विशेषतः आ सचिन अहिर यांनी तुम्हाला हे आव्हान दिले आहे. याकडे कसे पाहता?


निष्ठावान म्हणजे कोण? हे सचिन अहिरांनी उत्तर दिलं आहे. आणि हे शिवसेनेचे निष्ठावान असतील आणि याआधारावर थर लागणार असतील तर आम्हीही तयार आहोत त्यांना प्रत्युत्तर द्यायला.





Powered By Sangraha 9.0