सर्वहितकारी तटस्थ नायक

18 Aug 2022 21:06:34

Shri Krishna
 
‘सर्वहितकारी तटस्थता` ही कृष्णाची भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली खरी देणगी आहे. ती भारतीय राजनीती विचारांना नवी नाही. श्रीकृष्णाने ती विस्तारली आणि विकसित करून सांगितली.
 
विठ्ठलाचे नामस्मरण करताना एक वर्णन वारंवार येते आणि आपल्या सगळ्यांनाच ते पाठ आहे. ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा...` खरेतर ‘पंढरीचा विठ्ठल` म्हणजे द्वारकेहून पंढरपूरला आलेला कृष्णच आहे, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. कृष्णाचे व्यक्तिमत्व आणि तत्त्वज्ञान गेल्या कित्येक पिढ्या आबाल वृद्धांना, स्त्री-पुरुषांना भुरळ घालत आहे. किती पिढ्या याचा हिशोब कुणालाही लावता आलेला नाही. भारतीय जनमानसात रुजलेला कृष्ण हा सखा आहे, मार्गदर्शक आहे, योद्धा आहे, नेता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो तत्त्वज्ञ आहे. गणेश, दुर्गा, विष्णू अशा कितीतरी देवता-उपदेवता भारतीयांना भेटतात. श्रीगणेशाला हत्तीचे मस्तक आहे. दुर्गा अष्टभुजा आहे. भगवान विष्णू शेषशयी आहे, ही सगळी मिथकं तर्काच्या कसोटीवर टिकणार नाही, पण श्रद्धेच्या कसोटीवर वर्षानुवर्षे या देवता खऱ्या अर्थाने उतरल्या आहेत. संकटात धीर देण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहे, जोवर मानवी जीवन आहे, तोवर अशा देवतांचे अस्तित्व असेल आणि ते मानवी जीवनाला आधार देत राहील. भगवान कृष्णाचे वेगळेपण नेमके इथे सुरू होते. तो मानवी आहे. सर्वच प्रकारच्या मानवी गुणांचे आणि अवगुणांचे भांडार त्याच्यापाशी आहे. किंबहुना, म्हणूनच तो सगळ्यांना त्यांच्यासारखाच भासतो. त्याच्या बाललीला मातांना सुखावतात, तर तरुणींना त्याच्यासारखा सखा हवाहवासा वाटतो. संकटात सापडलेल्या अर्जुनालाही तो ‘पार्थसारथी` म्हणून गवसतो. पण, कृष्ण इथे सुरू होत नाही आणि संपतही नाही.
 
कृष्णाच्या तत्त्वज्ञानात ज्ञानेश्वर माऊलींना ‘भावार्थदीपिका` सापडली आणि ती वारकऱ्यांची लाडकी ‘ज्ञानेश्वरी` झाली. गांधींना सापडलेली गीता पुढे विनोबांची ‘गीताई` झाली. विवेकानंदांना तर त्यांचे चारही योग भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानातच सापडले. ‘कर्मयोग`, ‘ज्ञानयोग`, ‘भक्तियोग` आणि ‘राजयोग` याच काळात समकालीन असलेले लोकमान्य टिळकांसारखे जहाल नेतेसुद्धा गीतेच्या प्रेमात होते आणि त्यांनाही ‘निष्काम कर्मयोगा`चा योग गीतारहस्यात सापडला. कृष्णाला ‘योगेश्वर` असेही संबोधन आहे. यथायोग्य योजना म्हणजे ‘योग` आणि भगवान कृष्णाने त्यात कौशल्य सिद्ध केले होते. प्रत्येक वेळी त्याने परिस्थितीजन्य नव्या योजना योजिल्या आणि यश मिळवून दाखविले. ‘योगेश्वर` हे रुपक त्याला त्यामुळेच लाभले असल्याचे आपल्याला लक्षात येईल. कृष्ण राजकारणी तर होताच, पण त्याला धर्माचे अधिष्ठान होते. कृष्णाचे राजकारण सत्तेसाठी नाही. हस्तिनापूरच्या राजकारणाचा मुख्य संदर्भबिंदू कृष्ण आहे, पण तो त्याचा केंद्रबिंदू नाही. त्याला त्याची मथुराच प्रिय आहे तो हस्तिनापूर नरेश कधीच झाला नाही, त्याला ‘मथुरानगरपती` म्हणून ओळखले जाणेच आवडले. त्याच्या सगळ्याच राजकारणाला धर्माची चाड आहे. राजकारणात तो नीतिनियम मानणारा आहे, पण त्याचा विवेकही तितकाच जबरदस्त सक्रिय आहे. तो धर्मराजाप्रमाणे तत्त्वांना अनावश्यक चिकटून राहत नाही. त्याच्या लाडक्या मथुरेतून तो जेव्हा पळून गेला, तेव्हा ‘रणछोडदास` नावाने प्रसिद्ध झाला. पण, यामागेही विवेक होता. लढाईच्या नव्या तयारीसाठी त्याने घेतलेली ती उसंत होती. ज्यांचे वध कृष्णाने केले ते सगळेच लोक, मग कंस असो किंवा जरासंध, कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाचा वध ही सूडाची प्रक्रिया नव्हती.
 
डॉ. के. पी. जयस्वाल यांनी ‘हिंदू पॉलिटी` नावाचे दोन खंडांचे पुस्तक लिहिले आहे. यात हिंदूंच्या प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेचे यथार्थ वर्णन आपल्याला सापडेल. कंस ते शिशुपाल या सगळ्यांच्या राजकारणाचे निरीक्षण केले, तर आपल्या लक्षात येईल की, ही मंडळी हे प्रजासत्ताक मोडून स्वत:चे राज्य कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी आसुसलेले लोक होते. ज्या काही क्लुप्त्या वापरून, समोरून लढून कृष्णाला यांचा नि:पात करणे शक्य होते, त्या सगळ्या करून कृष्णाने त्यांचा पराभव केला. कृष्णाची नीतिमत्ता हा नेहमी चर्चेचे विषय. शुक मुनी व राजा परिक्षित यांचा एक संवाद आहे. भागवत पुराणाचे आकलन करतानाचा हा संवाद आहे. भागवत पुराणात कृष्णाचे कर्तृत्व सांगितले आहे, तसेच त्याच्या गोपलीलांही नमूद केलेल्या आहे. परिक्षित शुक मुनींना विचारतो, “जर कृष्ण धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आला असेल, तर लौकिक अर्थाने आपल्याला अनैतिक वाटतात. असे संबंध तो गोपिकांसोबत कसे ठेवू शकतो? शुक मुनींना त्याचे काही समाधान करता येत नाही.” “तो ईश्वराचा अवतार असल्याने त्याला मर्त्य मानवाचे नियम लागू नाही,” असे शुक सांगतात. आता हा संवाद इतका टोकाला जातो की, शेवटी शुक मुनी त्याला सांगतात की, “तू कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचे निरीक्षण, अनुकरण कर, कृतीचे नाही. कृष्ण हा असा आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कुठल्याही एका चाकोरीत बांधता येत नाही. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केला, तरी त्याला कृष्णाचा थांग लागत नाही.”
 
मथुरेवरून कृष्ण पुढे द्वारकेला गेला. द्वारकेचे वय साधारत: दोन ते तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे, असे सांगतात. द्वारका मात्र ही काही काल्पनिक बाब नाही. प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आर. के. राव यांनी ती शोधून काढली आणि द्वारकेच्या अस्त्वित्वाचे दाखलेच समोर आले. कृष्णाचे अस्तित्व होते की नव्हते? असा माणूस कसा असू शकतो? आणि त्याच्या मृत्यूचीही चर्चा कशी होऊ शकते? एक ना अनेक असे कितीतरी प्रश्न कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत राहतात. मात्र, कृष्णाच्या अस्तित्वाचे खरे कारण गीता आहे. लेखाच्या सुरुवातीला ज्या महापुरुषांच्या गीतेवरील कामाचा उल्लेख आला आहे, तिथेच कृष्णाच्या अस्तित्त्वाचे वेगळेपण अवलंबून आहे. त्याची कृती आणि त्याचे तत्त्वज्ञान यात काही फरक नाही. एखादी गोष्ट त्याने का केली, याचा कार्यकारणभाव त्याने विशद केला आहे. ‘न मे कर्म फले स्पृहा`चा संदेश कृष्णाच्या महाभारतातील तटस्थतेत दडलेला आहे. पार्थाला गीता ऐकविण्यासाठी तो उभा राहिला, पण इथे त्याने शस्त्र हातात घेतले नाही. ते का घेतले नाही, त्याचे कारण मग त्याच्याच समान वयाचा असलेला अर्जुन दैवावलंबी होऊन बसला असता. कृष्णाने आपली ‘नारायणी सेना` दुर्योधनाला दिली आणि स्वत: मात्र तटस्थपणे नारायण होऊन पांडवांसोबत उभा राहिला. लढाईत तो स्वत: निश्चित अशा एका बाजूने लढला, पण त्याच्या तटस्थतेविषयी कुणालाच शंका नव्हती. कृष्ण अर्जुनाला सल्ला देत होता. मात्र, त्याचे स्वत:चे राजकारण होते. पांडवांनी युद्ध जिंकण्याच्या प्रक्रियेत त्याला सामावले होते. हे जगातले एकमेव युद्ध असावे, जिथे युद्धाचे प्रारब्ध निश्चित करणारा नायक सत्तेच्या कुठल्याही पदावर किंवा तिच्या लाभावर दावा न करता आपल्या पुढच्या कार्यासाठी निघून गेला. कृष्णाला देवत्व मिळाले, ते त्याच्या या अशा ‘कालजयी` वर्तनातून. जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन कृष्ण गीतेच्या तत्त्वज्ञानाचा रचयिता झाला. ही गीता गेली कितीतरी पिढ्या मानवी मनावर आपली सत्ता कायम ठेवून आहे.
 
कृष्णाचे हे वेगळेपण त्याच्या लहानपणापासूनच केलेल्या आगळिक करण्यापासून सुरू होते. गोवर्धन पर्वत उचलण्याचा पराक्रम तर्कशुद्ध आहे. हे इंद्राशी घेतलेले भांडण आहे. इंद्रादिक देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे यज्ञ व त्यात दिले जाणारे पशुबळी आपल्या गाईवासरांवर सवंगड्यांइतकेच प्रेम करणाऱ्या कृष्णाला मान्य नव्हते. पावसाचा संबध निसर्गचक्राशी असून अघोरी कर्मकांडाशी त्याचा काही संबध नाही, हे कृष्णाने गोपांना ते पटवून दिले आणि गोवर्धनाचा सदुपयोग करून गोकुळातल्या लोकांनी या कर्मकांडाला फाटा दिला. या तर्काला अनेकांचे प्रमाण आहे. ‘सर्वहितकारी तटस्थता` ही कृष्णाची भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली खरी देणगी आहे. ती भारतीय राजनीती विचारांना नवी नाही. श्रीकृष्णाने ती विस्तारली आणि विकसित करून सांगितली. तिचा एक धागा आधी रामायणातही आहे. तुलसी रामायणात एक प्रसंग तुलसीदासांनी वर्णिलेला आहे. रावणाच्या सभेत शिष्टाईसाठी पाठविलेल्या अंगदाला ते एक गोष्ट सांगतात, “काजु हमार तासु हित होई रिपु सन करेहु बतकही सोई।” याचा अर्थ फार रोचक आहे. भारतीय पुराणकथांमध्ये गाजलेल्या दोन युद्धातल्या दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी चालेला हा संवाद आहे. श्रीराम अंगदाला सांगतात, “शत्रूशी असा संवाद साधा की, आपले काम होईल आणि त्याचेही कल्याण होईल.” खरेतर ज्याच्या पत्नीचे अपहरण झाले आहे आणि जो महापराक्रमी म्हणून लौकिक कमावलेला आहे. अशा माणसाच्या तोंडी असा संवाद शोभतो का? याचे उत्तर नाहीच येते. पण, इथेच कृष्णाच्या तत्त्वज्ञानाला सुरूवात होते. कारण, श्रीराम केवळ सीतेचे पती नाहीत, तर ते अयोध्येसारख्या महाकाय साम्राज्याचे राजेही आहेत. त्यामुळे हा संघर्ष अनेकाच्या जीवाशी होणारा होता. युद्ध टाळण्याचा हा प्रयत्न असाच कृष्ण आयुष्यभर करीत राहिला. गवळ्याच्या घरी वाढलेला. बालपणी गुरे राखणारा, तारुण्यात व उर्वरित आयुष्यात लोकोत्तर गोष्टीत रमलेला भगवान कृष्ण देवत्वाकडे वाटचाल करू लागला, यात काही आश्चर्य नाही...
 
 
Powered By Sangraha 9.0