ठाणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकातील मुख्य पादचारी पुलावर रेखाटलेली भव्य रांगोळी, शहिद जवानांची प्रतिकृती आणि पुलावर लावण्यात आलेला २७५ फुट लांबीचा राष्ट्रध्वज ठाणे स्टेशन मास्तर आर.के. मिना यांनी हटवण्यास भाग पाडले.
यासंदर्भात मिना यांना विचारले असता, हा पादचारी पुल संवेदनशील असुन सॅटीसवरून येणाऱ्या प्रवाश्यांना अडथळा ठरत असल्याने वरीष्ठांच्या आदेशावरून कार्यवाही केल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी प्रवाशी संघाने ठाणे स्थानकात आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात दुपारपर्यत ७५ हुन अधिक दात्यांनी रक्तदान केले. प्रवाशी संघाचे प्रमुख राजु कांबळे आणि अध्यक्ष सुजित लोंढे यांच्या पुढाकाराने प्रवाशी संघाच्या सदस्यांनी व महिलांनी हा उपक्रम राबवला होता.
प्रतीवर्षीप्रमाणे यंदा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने ठाणे रेल्वे स्थानकातील मुख्य पादचारी पुलावर शहीद जवानाची प्रतिकृती व भव्य रांगोळी चितारली होती. त्याचबरोबर संपूर्ण पुलाच्या कठड्यांवर २७५ फूट लांबीचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता.याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणुन भाभा रुग्णालयाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. सकाळपासुन या उपक्रमांना रेल्वे प्रवाश्यांनी भरभरून प्रतिसाद देत राष्ट्राभिमान जागवणाऱ्या या उपक्रमांचे कौतुक केले.
मात्र, रेल्वे स्टेशन मास्तर आर.के.मिना यांनी प्रवाश्यांच्या असुविधेचे कारण देत शहिद प्रतिक व रांगोळीसह तिरंगा ध्वज हटवण्याचे निर्देश दिले. पुलावर अडथळा नको म्हणुन रक्तदान शिबिरही बंद करण्यास सांगितल्याचा आरोप प्रवाशी संघाने केला आहे. दरम्यान, एकीकडे ठाणे स्थानकात फेरीवाले आणि भिकाऱ्यांचा कायम राबता असताना त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष्य करून असे सामाजिक उपक्रम राबवण्यास नकार दर्शविणाऱ्या स्टेशन मास्तर मिना यांच्या या भूमिकेबाबत प्रवाश्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.