अपंगत्वावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार्यानाशिकच्या मयूर देवरे या शरीरसौष्ठवपटूविषयी...
आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी या त्रयींच्या बळावर व्यक्ती असाध्य ते साध्य करत असतो. नाशिक येथील मयूर देवरे या शरीरसौष्ठवपटूने हे विधान आपल्या कामगिरीने सिद्ध करून दाखविले. अपंगत्वावर मात करून मयूरने शरीरसौष्ठव व बेंच प्रेस स्पर्धेत अनेक सुवर्ण पदके मिळवली. एका पायाला आलेल्या अपंगत्वाने खचून न जाता आई-वडिलांच्या विश्वासाच्या जोरावर विशेष नैपुण्य मिळवलेल्या मयूरच्या प्रयत्नांना सलामच करावा लागेल.
मयूरचा वयाच्या नवव्या महिन्यापासून एक पाय अधू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मसाज, व्यायाम सुरू होते. अशातच त्याने मनातून ठरवले की, अपंगत्वावर मात करायची. इयत्ता आठवीत असताना महानगरपालिकेच्या व्यायामशाळेत मित्रांबरोबर व्यायामाला त्याने सुरुवात केली. मित्र त्याला प्रोत्साहन देत होते व त्याचा उत्साह वाढवत होते. दहावीत असताना व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भरलेल्या ’कर्मवीर श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होऊन त्याने प्रथमच यश संपादन केले.
दहावीची बोर्डाची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर सातपूर येथे भरलेल्या ‘सातपूर श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला त्यानंतर ‘एचएससी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘डी - फार्म’मध्ये त्याने प्रवेश घेतला. आपल्या जिमचा व इतर खर्चाचा आपल्या कुटुंबावर ताण पडू नये म्हणून मयूरने सकाळी आणि संध्याकाळी जिम ट्रेनरची नोकरी सुरू केली. त्यातून त्याचा सरावही व्हायचा आणि त्याच्या खर्चाचीही सोय व्हायची. याच वेळेस त्याला अपंगांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार नागपूर येथील ‘भारतीय पॅरा ऑलिम्पिक संस्थे’चे व्यवस्थापक मुनेकर यांचे मार्गदर्शन त्यास मिळण्यास सुरुवात झाली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत प्रथमच २००८ मध्ये न्यू जर्सी येथे होणार्या ‘पॅरा ऑलिम्पिक’मध्ये शरीरसौष्ठव या खेळात त्याची भारतीय संघात निवड झाली. त्यासाठी त्याने ३० दिवस नागपूरला प्रशिक्षण घेतले. पण, काही कारणास्तव
अमेरिकेची संधी हुकली व दौरा रद्द झाला. पण, त्याचा या सर्व प्रवासामुळे आत्मविश्वास वाढला. त्यामुळे दरवर्षी होणार्या स्पर्धेत आता मयूर सहभाग नोंदवू लागला होता.
त्यासाठी कैलास गुप्ता व अमोल गोळेसर यांचे मार्गदर्शन मयूरला मिळण्यास आता सुरुवात झाली होती. त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आहेत. त्याचे ‘डी-फार्मसी’ पूर्ण झालेले आहे. चार वर्षांपासून स्वतःचे मेडिकल सांभाळून सकाळी जिम कोचिंग करून अनेक नवीन पहिलवानांना घडवण्याचे व स्वतः कसरत करण्याचे काम मयूर अविरतपणे सुरू ठेवत आहे. आताही अनेक स्पर्धांमध्ये मयूर तेवढ्याच उत्साहाने भाग घेतो.त्याची ही जिद्द पाहून इतरांनाही प्रेरणा मिळत आहे.
२००८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात ११० किलो वजन उचलून प्रथम सुवर्णपदक त्याने पटकावले. २००९ मध्ये गोंदिया, नागपूर तर २०१० मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर २०१० मध्येच नागपूर येथे ‘पॅरा ऑलिम्पिक’ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. नागपूर येथे वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने सुवर्णपदकांची लयलूट केली. २०१५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही चौथा क्रमांक पटकावला. अशा प्रकारे मयूरने विविध स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, दोन रजत, दोन कांस्य पदके पटकावली आहेत.
आगामी काळात होणार्या शरीरशौष्ठवच्या ‘मिस्टर आशिया’, ‘मिस्टर वर्ल्ड’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून भारतासाठी पदक आणायचे स्वप्न मयूर बाळगून आहे. तसेच, जास्तीत जास्त तरुण वर्गाला व्यायाम, योगा, शारीरिक स्वास्थ्य याकडे वळविण्याचे ध्येय मयूर बाळगून आहे. मयूरला या कार्यात झेप घेण्यासाठी अनेकविध आव्हानांचा सामना करावा लागला. शरीरसौष्ठवासाठी आवश्यक तो आहार मिळविण्यासाठीदेखील मयूरला खूप संघर्ष करावा लागला.
युवकांनी व्यसनाच्या मागे न लागता व्यायाम करावा व निरोगी राहावे, ‘आरोग्यम धनसंपदा’ या सूत्रानुसार आपले आयुष्याचे निरोगी पद्धतीने व्यतीत करावे, असे आवाहन मयूर या निमित्ताने सर्वांना करतो. मार्च २०२२ मध्ये झालेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स’ या नामांकित शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळाली व त्यात भारताला चौथ्या क्रमांकाचे पदक मयूरने प्राप्त करून दिले. तसेच, नुकत्याच झालेल्या भारत श्री स्पर्धेत मयूरने कांस्य पदक प्राप्त केले.
तसेच, ‘बिटीबी स्पोर्ट्स न्यूट्रीशन’कंपनीचा ‘सदिच्छादूत’ म्हणून मयूरची निवड करण्यात आलेली आहे. अपंगत्व येणे हे जरी आपल्या हातात नसले तरी त्या पुढील आयुष्य हे प्रेरणादायी व्यतीत करता येणे, हे नक्कीच आपल्या हातात असते. शारीरिक मर्यादा हा शाप नसून स्वकर्र्तृत्वाचा असलेला दागिना, हेच खरे मानवी जीवनाचे सौंदर्य आहे. हेच मयूर देवरे याने आपल्या कार्यातून कृतुतून दाखवून दिले आहे.