मुंबई(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील दिवेआगर किनाऱ्यावर शुक्रवारी दि. १२ ऑगस्ट रोजी दुर्मिळ 'लॉगरहेड कासव' वाहून आले होते. या बाबत माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. या कासवाला स्थानिक लोकांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या कासवाच्या अंगावर 'बार्नॅकल्स' प्रजातीचे कालवे होते. हे कालवे काढून या कासवाला दिघीच्या खाडीत सोडण्यात आले. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर देखील शुक्रवारी दि. १२ ऑगस्ट रोजी एक 'ग्रीन सी कासव' वाहून आले होते.
शुक्रवारी दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारून दिवेआगर किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवन रक्षकाला कासव वाहून आल्याचे निदर्शनास आले. या बाबत त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी वन विभागाला कळवले. तसेच मुंबईतील कांदळवन कक्षाला कळविण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या कासवाच्या अंगावर कालवे असल्यामुळे त्याचे जीवन कठीण झाले होते. स्थानिक लोकांनी हे कालवे काढून, या कासवाची सुखरूप सुटका केली आहे. नुकतीच नारळी पौर्णिमा झाल्यामुळे समुद्राला उधान आले होते. लाटांच्या जोरामुळे हे कासव समुद्रात जाऊ शकत नव्हते. वनविभागाने आणि स्थानिक लोकांनी या कासवाला खाडीत सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कासवाला दिघीच्या खाडीत सोडण्यात आले. लॉगरहेड कासव हे खोल समुद्रात वास्तव्य करते. परंतु, पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना समुद्री प्राणी किनाऱ्यावर वाहून येण्याचे प्रमाण वाढते. हे कासव जिवंत असल्यामुळे त्याला सुखरूप खाडीत सोडण्यात आले.
"हे कासव वृध्द होते, या कासवाला थोडा विश्राम देऊन त्याला दिघी खाडीत सोडण्याचा निर्णय वन विभागाकडून घेण्यात आला. पावसाळ्यात समुद्री प्राणी वाहून येण्याचे प्रमाण जास्त आहे, आम्ही वेळोवेळी या कासवांची सुखरूप सुटका करू."
-देवेंद्र नार्वेकर, स्थानिक.
या पूर्वी लॉगरहेड कासवाचे महाराष्ट्रात चार नोंदी आहेत. लॉगरहेड कासव डहाणू किनाऱ्यावर २०१६ आणि २०१७ साली मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर, २०२१मध्ये जून महिन्यात मालवण बंदर जेट्टी आणि वायरी किनाऱ्यावर या कासवांची पिल्ले वाहून आली होती. या समुद्री कासवांची हालचाल संथ गतीने असल्यास त्यांच्या अंगावर कालवे चिकटतात, आणि हालचाल नसल्यामुळे, कालव्यांचे एकावर एक थर वाढत जातात,परिणामी कासवाचे वजन देखील वाढते, आणि त्याला हालचाल कारणे अधिक कठीण होते.
- प्राची हटकर, (लॉगरहेड कासवाची पहिली नोंद करणाऱ्या सागरी जीवशास्त्रज्ञ)
महाराष्ट्रातील समुद्री कासव
जागतिक सागरी परिसंस्थेत समुद्री कासवांच्या एकूण सात प्रजाती आढळतात. त्यामधील महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेत प्रामुख्याने तीन प्रजातीच्या कासवांचा अधिवास आढळून येतो. यामध्ये सर्वसामान्यपणे सर्वाधिक संख्या ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीची असून त्यापाठोपाठ ’ग्रीन सी’ आणि ’हॉक्सबिल’ कासवांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या विणीसाठी येतात. यंदा वर्षाच्या सुरुवातीस या कासवांची १९६ घरटी कोकण किनारपट्टीवर आढळून आली. घरट्यांमध्ये आढळलेल्या एकूण १८ हजार, ९७ अंड्यामधील ११ हजार, २७३ अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली. या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. तसेच मार्च ते एप्रिल २०२२मध्ये महाराष्ट्रात ग्रीन सी कासवाची ५ घरटी देवबाग-तारकर्ली किनाऱ्यावर आढळून आली होती. 'हॉक्सबिल’ कासवांचे प्रजनन राज्यातील किनारपट्टीवर होत नाही. मात्र, मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अनावधानाने ही कासवे सापडल्याची आणि जखमी अवस्थेत किनाऱ्यांवर वाहून आल्याची नोंद आपल्याकडे आहे.
या तीन प्रजातींखेरीज राज्याच्या समुद्रात ’लेदरबॅक’ ही सागरी कासवांमधील सर्वात मोठी प्रजात आणि ’लॉगरहेड’ प्रजातीच्या कासवांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. डहाणू येथील ’समुद्री कासव उपचार केंद्रा’त काही वर्षांपूर्वी जखमी ’लॉगरहेड’ कासवांवर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याची पुन्हा समुद्रात सुटका करण्यात आली. तसेच यंदा जून महिन्यात रायगड जिल्ह्यातील भारदखोल येथील समु्द्रात ’लेदरबॅक’ प्रजातीचे कासव आढळून आले होते. मासेमारीच्या जाळ्यात सापडलेल्या या कासवाची मच्छीमारांनी सुटका करून त्याला पुन्हा समुद्रात सोडले. सिंधुदुर्गातील देवबागच्या किनाऱ्यावर १९८५ साली आढळलेल्या ’लेदरबॅक’ कासवाचा छायाचित्रीत पुरावा संशोधकांकडे उपलब्ध नव्हता. मात्र, भारडखोलच्या समुद्रात या कासवाच्या वावराचा छायाचित्रीत पुरावा प्रथमच सागरी संशोधकांच्या हाती लागला होता. वरील दोन्ही पुराव्यांच्या आधारे राज्याच्या सागरी परिसंस्थेत ’लेदरबॅक’ आणि ’लॉगरहेड’ कासवांचा अधिवास असण्याबाबत सागरी अभ्यासक ठाम मत मांडत नाहीत. परंतु या वर्षी, मे महिन्यात तेरेखोलच्या खाडीत देखील 'लेदरबॅक' समुद्री कासवाचे दर्शन झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील काढण्यात आला होता. तसेच आता हे लाॅगरहेड कासव दिवेआगर किनाऱ्यावर वाहून आल्यामुळे, महाराष्ट्रात पाच समुद्री कासवांचा अधिवास असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी २०१६ आणि २०१७मध्ये लॉगरगेड कासवांची पिल्ले मालवण बंदर आणि वायरी किनाऱ्यावर आढळून आली होती. आता या सगळ्या प्रजाती मिळून, महाराष्ट्रात पाच समुद्री कासवांचा अधिवास असल्याचे समोर येत आहे.