'वेगवान' प्राण्याची करावी लागणार प्रतीक्षा; भारतात चित्त्यांचे आगमन लांबणीवर!
14 Aug 2022 16:35:48
मुंबई: देशातून अशयाई चित्ते नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात आफ्रिकन चित्ते दि. १५ ऑगस्टच्या आधी येणार होते. मात्र, त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. मध्यप्रदेशच्या प्रधान मुख्य वसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकन चित्ते भारतात येण्याची तारीख अजून केंद्रीय मंत्रालयाकडून आलेली नाही. तसेच चित्त्यांच्या संख्येबाबत देखील माहिती प्राप्त झालेली नाही.
भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने हे चित्ते भारताच्या ७५व्या स्वंतंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्टच्या आधी मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन होणार होते. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि उपपंतप्रधान आणि नामिबियाचे परराष्ट्र मंत्री नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी केली होती. या सामंजस्य करारात वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेच्या शाश्वत वापरावर भर देण्यात आला आहे.
आशियाई चित्ता भारतातून १९५२मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तब्बल ७० वर्षांनी भारतात आफ्रिकन चित्ता आणण्याची योजना करण्यात आली आहे. १९४७मध्ये, भारतात आशयाई चित्ताच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले होते, परंतु छत्तीसगडच्या सुरगुजा राज्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी उरलेल्या तीन चित्त्यांना ठार मारल्याची नोंद आहे. सध्या आशियाई चित्ते फक्त इराणमध्येच अस्तित्वात आहेत. सावनाह प्रदेश परिसंस्थेत प्रमुख प्रजाती म्हणून चित्ता ही प्रजाती परत आणून व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच कालांतराने पर्यटनातून स्थानिक समुदायाची उपजीविका मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
कसा आहे आराखडा?
मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून सुमारे १५ ते २० चित्ते आणण्यात येणार आहेत. हा पूर्णपणे मानव नियंत्रित प्रकल्प आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या ५ चौ. किमी भागात हे प्राणी सोडण्यात येणार आहेत. त्यांना पुरेल असा अन्नसाठा या भागात आहे. या राष्ट्रीय उद्यानात तब्बल १८-२० हजार चित्तल असल्याचे सांगण्यात आले आहे. हे चित्ते विद्युत कुंपण असलेल्या परिसरात सोडण्यात येणार आहेत. या चित्त्यांवर सॅटेलाईट टॅग लावण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांच्या हालचाली आणि
स्वभाव वैशिष्ट्यांवर लक्ष ठेवले जाईल. त्यांचे नियमित निरीक्षण केले जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास, भारतात इतर ठिकाणी देखील असे प्रकल्प राबविले जातील. चित्यांसाठी सिमांकित केलेल्या भागात इतर मांजर कुळातील कोणत्याही इतर वन्य प्राण्याला प्रवेश नसेल.
भारत सरकार १९६०-७०च्या दशकापासून भारतात चित्ता पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गेल्या दशकात या योजनेला अधिक गती मिळाली. काही वर्षांपूर्वी सरकारने इराणमधून आशियाई चित्ता आणण्याचा प्रयत्न ही केला होता, परंतु त्यावेळी इराणकडून नकार देण्यात आला होता. त्यानंतर जयराम रमेश यांच्या पर्यावरण मंत्री असताना सप्टेंबर २००९ मध्ये, या योजनांना पुन्हा बळ मिळाले होते, परंतु तेव्हा हे शक्य झाले नव्हते.