स्वा. सावरकर आणि तिरंगा ध्वज : आक्षेप आणि वास्तव

10 Aug 2022 11:49:38
lekh
 
 
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सध्या शहरापासून ते खेड्यांपर्यंत देशभरात ‘हर घर तिरंगा` अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. पण, काही सावरकरद्वेष्ट्यांकडून सावरकरांचा तिरंगा ध्वजाला विरोध होता, असा एक अपप्रचार सध्या जोरात सुरु आहे. त्यानिमित्ताने याविषयीचे सावरकरांचे विचार आणि वास्तव कथन करणारा हा लेख...
 
 
 
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा विरोध हा कधीही तिरंग्याला नसून तिरंग्यावरील चरख्याला होता. तेव्हा काँग्रेस या राजकीय पक्षाचा ध्वज तिरंगी होता व त्यावरही चरखा होता. एका राजकीय पक्षाच्या ध्वजावर चरखा असण्याला विरोध असण्याचे काही कारण नाही व सावरकर काँग्रेसचे सभासदही नव्हते. त्यामुळे त्यांचा काँग्रेसच्या ध्वजाला विरोध करण्याचा संबंधच नव्हता. पण, जेव्हा हा काँग्रेसचा चरखा असणारा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे म्हणून सांगितले जाऊ लागले किंवा तोच भारताचा राष्ट्रीय ध्वज असावा, अशा हालचाली किंवा मागण्या केल्या जाऊ लागल्या, तेव्हा भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर चरखा का असू नये, यामागची भूमिका सावरकरांनी स्पष्ट करून सांगितली. सावरकर म्हणतात, ‘`राष्ट्रीय ध्वजावर जे चिन्ह असते, त्यात त्या राष्ट्राच्या सामान्य वा विशिष्ट ध्येयांचे वा गुणांचे वा गौरवाचे वा परंपरेचे असेच कोणते तरी उपलक्षणात्मक चिन्ह असणेच योग्य आहे. पण, चरख्याने यापैकी काहीतरी सूचित होते काय?” (समग्र सावरकर वाङ्मय- खंड ३, पृष्ठ ७३१) “ `चरखा` हे त्यागाचे प्रतीक होऊ शकत नाही. कारण, वस्त्र वापरण्याची इच्छा हीच भोगाची पहिली पायरी आहे, असे मिल्टनने ईव्हसंबंधी म्हटले आहे.” (सावरकर, शां.शि. तथा बाळाराव. रत्नागिरी पर्व, पृष्ठ १८२) ‘`यापेक्षा (चरख्यापेक्षा) त्या ध्वजावर लाल बावट्याचा हातोडा नि कोयता अधिक शोभेल. शेतकरी नि कामकरी या राष्ट्राच्या मेरुदंडाचे ते किती उत्कृष्ट प्रतीक आहे. त्याहूनही युक्ततर प्रतीक म्हणजे चक्र हे होय. यज्ञचक्र, संसारचक्र असे हे अत्यंत व्यापक आणि अत्युच्च साध्य आणि अत्युच्च साधन सुचविणारे राष्ट्राचे प्रतीक जे चक्र ते ध्वजावर अंकित केले जावे.” (समग्र सावरकर वाङ्मय- खंड ३, पृष्ठ ७३३) अथवा `‘परंतु कुंडलिनी राष्ट्रीय ध्वजावर- जोवर अंकित होऊ शकत नाही, तोवर राष्ट्रीय बाण्यास शोभणारी आणि परिस्थितीत पूर्णपणे व्यवहार्य अशा चंद्र-सूर्याची चिन्हे राष्ट्रीय हिंदी ध्वजावर अंकित करावी.
 
 
 
 
या चिन्हांत राष्ट्रीय सत्य, मानसिक ध्येय, धार्मिक सामंजस्य आणि सद्य व्यवहार्यता इतर चिन्हांपेक्षा पुष्कळ पटीने एकंदरीत अधिक आहेत.” (१९२८ श्रद्धानंद १६ ऑगस्ट) सावरकरांची हातोडा, कोयता, चंद्र, सूर्य या कुठल्याच प्रतिकांना ध्वजावर अंकित करण्यास हरकत नव्हती. कारण, ती राष्ट्राच्या सामान्य वा विशिष्ट ध्येयांचे वा गुणांचे वा गौरवाचे वा परंपरेचे तरी उपलक्षणात्मक प्रतीक होती. केवळ गांधींना प्रिय म्हणून मी त्याला विरोध करणार असा हट्टीपणा सावरकर करत नव्हते. चरख्यातून असा काहीही उपलक्षणात्मक अर्थ सूचित होत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. चरखा, सूत कातणे व खादी याची उपयुक्तता सावरकरांना माहीत होती. म्हणूनच सावरकरांनी रत्नागिरीत असताना खादी भांडाराची उद्घाटने केली होती. पण, सूत कातल्याने नैतिक बळ वाढते किंवा चरख्याने स्वराज्य मिळेल, अशा कल्पना त्यांना अमान्य होत्या. राष्ट्रीय सत्य, मानसिक ध्येय, धार्मिक सामंजस्य आणि सद्य व्यवहार्यता हे राष्ट्रीय ध्वजावर अंकित होणाऱ्या चिन्हांचे निकष असावेत, असे सावरकरांचे मत होते.
 
 
 
 
पारंतत्र्यात असल्यामुळे भारताचा निश्चित असा ध्वज नव्हता. काँग्रेस पक्षाचा जो ध्वज होता, तो त्या राजकीय पक्षाचा ध्वज होता. त्यामुळे तेव्हा तिरंग्याऐवजी इतर दुसरा ध्वज सुचवून तो स्वीकारा असे म्हणणे म्हणजे तिरंगा ध्वजाला विरोधच होता, असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच जरी विरोध केला तरी तेव्हा आपल्या देशाचा ध्वजच निश्चित नव्हता. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या तिरंग्यालाच त्या व्यक्तीचा विरोध होता, असे म्हणता येणार नाही. काँग्रेस या राजकीय पक्षाच्या ध्वजाला विरोध होता इतकेच म्हणता येईल. जर त्या व्यक्तीने दि. १५ ऑगस्ट, १९४७ नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर जर तिरंग्या ध्वजाला विरोध केला असेल, तरच मात्र त्या व्यक्तीचा भारताच्या ध्वजाला विरोध होता, असे म्हणता येईल. दि. १५ ऑगस्ट, १९४७ला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि भारताचा ध्वज निश्चित होण्यापूर्वी कोणीही अमूक एक ध्वज भारताचा ध्वज म्हणून निश्चित करावा, अशी मागणी करू शकत होता. त्यानुसारच सावरकरांनी दि. ७ जुलै, १९४७ला तारेने ध्वज समितीला असे कळविले की, ‘`हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे.
 
 
 
 
अर्थात भगवा पट्टाही असणार नाही, तो ध्वज आपला आहे असे हिंदूजगत कधीही मान्य करणार नाही. काँग्रेसच्या सध्याच्या ध्वजावर असलेला चरखा काढून टाकून तेथे चक्र किंवा प्रगती नि सामर्थ्यदर्शक असे अन्य चिन्ह ठेवावे. सर्व हिंदू नेत्यांनी नि संघटनांनी अशी मागणी करावी.” (ऐतिहासिक निवेदने, पृष्ठ. १७७) या तारेच्या प्रती संविधान सभेचे अध्यक्ष व ध्वज समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष व घटना समितीच्या ध्वज समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. खरे यांना पाठवण्यात आल्या होत्या. सावरकरांची भगव्या ध्वजाची मागणी जरी मान्य झाली नसली तरी त्यांनीच मागणी केल्याप्रमाणे भगव्या पट्ट्याचा राष्ट्रध्वजात समावेश करण्यात आला होता. तसेच, चरखा काढून तेथे चक्र अंकित करावे, ही दुसरी मागणी मान्य झाली होती.
 
 
 
सावरकरांनी दि. १५ऑगस्ट, १९४७ रोजी तिरंगा ध्वज आणि भगवा ध्वज दोन्हीही आपल्या घरावर फडकावून त्याला अभिवादन केले होते. जर सावरकरांचा तिरंग्याला विरोध असता, तर त्यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारून त्याला अभिवादन केले असते का? आपल्या अनुयायांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘`लोकशाहीच्या मार्गाने संबंध देशाकडून कुंडलिनी-कृपाणांकित भगव्या ध्वजाला मान्यता मिळवून घ्यावी आणि मगच तो राज्य-ध्वज म्हणून उभारावा हे युक्त ठरेल. तोपर्यंत खंडित भारताचे प्रतीक म्हणून हा नवा राज्य - ध्वज नि अखंड भारताचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज जोडीने लावणेच इष्ट होय.” (कीर, धनंजय. स्वातंत्र्यवीर सावरकर, पृष्ठ ४०५) इथे सावरकरांचा लोकशाहीवरील दृढ विश्वासही दिसून येतो.
 
 
 
या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे विचार जाणून घेणेही इष्ट ठरेल. महात्मा गांधी दि. २४ जुलै, १९४७ च्या प्रार्थना सभेत म्हणाले होते की, "'The new flag does not render the old flag redundant. Even after the king is dead, the kingdom remains and old coins are not discarded for the new ones. When the new coins are issued old coins do not suffer any depreciation of value. Therefore, so long as there is even one old flag in stock at the Gandhi -shram the two flags will have the same value. (Collected Works of Mahatma Gandhi- खंड ९६, पृष्ठ १२८)
 
 
 
दि. ६ ऑगस्ट, १९४७ ला भारताच्या ध्वजासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना महात्मा गांधी म्हणाले होते, "'I must say that if the flag of the Indian Union will not contain the emblem of the charkha I will refuse to salute that flag. You know the National Flag of India was first thought of by me and I cannot conceive of India's National Flag without the emblem of the charkha.'' (उपरोक्त, पृष्ठ १९६) तसेच, दि. २७ जुलै, १९४७ ला राष्ट्रध्वजासंबंधी (हरिजनबंधूमध्ये दि. ३ ऑगस्ट, १९४७ला छापून आले होते) म्हणाले, "'The improved flag has no need of khadi. We do not want to disfigure with khadi the shop windows of our towns. The poor in the villages may by all means wear khadi. We shall not treat it as an offence. Old women in their huts may spin away on the charkha. In this new age this should be considered a favour.' I will refuse to salute the flag that is modified on the above lines however artistic it may appear.'' (उपरोक्त, पृष्ठ १५२)
 
 
 
जसा गांधींचा खादी व चरख्याचा आग्रह होता, तसा सावरकरांचा चरख्याला विरोध आणि भगव्या रंगाचा आग्रह होता. पण, सावरकर असो नाहीतर गांधी, दोघांचेही आपापले विरोध, सूचना, आग्रह, विनंती वगैरे दि. १५ ऑगस्ट, १९४७ आधीचे आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर म्हणजे दि. १५ ऑगस्ट, १९४७ नंतर दोघांनीही कधीही अशोकचक्रांकित तिरंगी ध्वजाला विरोध वा नाराजी व्यक्त केलेली नाही, उलट दोघांनीही तिरंगी ध्वजाचा सन्मान करून त्याला वंदनच केले आहे. दि. १० मे, १९३७ ला रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून संपूर्ण मुक्तता झाल्यावर बऱ्याच संस्था, पक्ष, व्यक्तींनी सावरकरांचा सत्कार केला होता. दि. १५ मे, १९३७ ला रत्नागिरी काँग्रेस कमिटीनेही जिल्हा परिषदेचे विशेष निमंत्रण देऊन सावरकरांच्या हस्ते ध्वजारोहण केले. त्याप्रसंगी बोलताना आपल्या संपूर्ण मुक्ततेनंतरच्या पहिल्याच राजकीय भाषणात सावरकर म्हणाले, ”हिंदूध्वजाला उचलून धरणारे तुम्ही आज हा ध्वज कसा उभारता, या प्रश्नाला उत्तर एकच की, हा राष्ट्राचा ध्वज आहे. या ध्वजाखाली सर्व धर्माच्या लोकांनी समत्वाने उभे राहिले पाहिजे. या ध्वजाखाली उभा राहून जो जातीय वा धर्मीय भावना ठेवील तो पापी होय. घरात ज्याप्रमाणे आपण अन्य गोष्टी करण्यास स्वतंत्र असतो, त्याप्रमाणे दुसऱ्या वेळी मी हिंदू असण्यास प्रत्यवाय नाही.. या ध्वजाखाली आपण सर्वांनी एक होऊन राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पूर्ण स्वातंत्र्यासाठी झटूया.” (रत्नागिरी पर्व, पृष्ठ ३९३-३९४) सावरकरांनी ध्वजारोहण केलेला हा ध्वज चरखा असलेला काँग्रेसचा तिरंगा ध्वज होता, याची नोंद घेणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0