नवी दिल्ली : देशात काही लोक नकारात्मकतेच्या गर्तेत पूर्णपणे बुडला आहेत. सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करूनही जनता विश्वास ठेवण्यास तयार नसल्याने ते आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना जनतेचा विश्वास जिंकता येणार नाही, असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगाविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पानिपत रिफायनरी येथे इंडियन ऑइल २जी इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टिका केली.
आपल्या देशातही नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकलेले, निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आहेत. रकारविरोधात खोटे बोलूनही जनार्दन अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा नैराश्यात हे लोकही आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत. देशातील जनतेने ५ ऑगस्ट रोजीच या लोकांकडून काळी जादू पसरविण्याचा कसा प्रयत्न झाला, हे बघितले आहे. काळे कपडे परिधान केल्याने नैराश्य दूर होईल, असा या लोकांना विश्वास वाटतो. मात्र, या लोकांनी अंधश्रद्धेतून कितीही काळी जादू केली, तरीदेखील जनतेचा विश्वास जिंकणे त्यांना अशक्य असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगाविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज अमृत महोत्सवात देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे, त्याचवेळी काही लोकांकडून या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे.
इथेनॉल प्लांटविषयी बोलताना ते म्हणाले की, कट-आउट स्टबलच्या वाहतुकीसाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. नवीन जैव-इंधन प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार असून भविष्यात नवीन संधी निर्माण होणार आहेत. सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. यामुळे देशातील प्रदूषणाची आव्हानेही कमी झाली आहेत, असेही ते म्हणाले.