असत्यमेव जयते...?

09 Jul 2022 21:41:05
Satyamev
 
 
 
पाठ्यपुस्तकांमधून शिकवला जाणारा इतिहास हा आपल्या मनावर दीर्घकाळ ठसणारा असतो. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या इतिहासातील सुवर्णपाने प्रकाशात आणण्याऐवजी पाठ्यपुस्तकांमधून ठरावीक राजसत्ता, ठरावीक राजकीय विचारधारा यांचेच महत्त्व सतत बिंबवले गेले. अभिजित जोग यांनी ’असत्यमेव जयते...?’ या पुस्तकामधून भारताच्या इतिहासावर चढवली गेलेली असत्याची पुटे पुसून टाकण्यास हातभार लावला आहे.
 
आर्य आक्रमण सिद्धांत
भारताच्या इतिहासासंबंधी कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेलेल्या प्रश्नांबद्दल विस्ताराने सांगणारी एकूण सात प्रकरणे या पुस्तकामध्ये आहेत. त्यापैकी पहिले प्रकरण म्हणजे भारतामध्ये धगधगत ठेवल्या गेलेल्या अनेक वादांचे मूळ असणारा ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत.’ आपल्या गोर्‍या कांतीची, वंशश्रेष्ठत्वाची घमेंड मिरवणार्‍या युरोपीय साम्राज्यवाद्यांनी ‘आम्हाला तुमच्यावर राज्य करण्याचा हक्क आहे’ हे बिंबवण्यासाठी विशिष्ट सैद्धांतिक भूमिकेच्या गरजेतून हा सिद्धांत मांडला. पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या आर्यांनी भारतातील मागासलेल्या काळ्या मूलनिवासी लोकांचा पराभव करून मूलनिवासी द्रविड लोकांना दक्षिणेकडे हाकलून दिले. बाहेरून आलेल्या आर्यांनी वेदांची व वैदिक धर्माची निर्मिती केली. पराभूत मूलनिवासी लोकांनी आपली संस्कृती आणि भाषा सोडून आक्रमक आर्यांची भाषा आपलीशी केली’ असे सांगणारा हा सिद्धांत बिंबवला गेला आणि त्याआधारेच ‘उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय’, ‘हिंदी विरुद्ध तामिळ’, ‘आक्रमक उच्चवर्णीय विरुद्ध मूलनिवासी बहुजन’ असे अनेक नवनवीन वाद जन्माला घातले गेले. जर्मन विद्वान मॅक्समुलरने कुठलाही ठोस पुरावा नसताना आर्य आक्रमणाचा काळ इ.स.पू. १५०० असा ठरवून ऋग्वेद निर्मितीचा काळ इ.स.पू. १२०० असा ठरवला. ऋग्वेदात उल्लेख असलेली ‘सरस्वती’ नावाची कुठली नदी अस्तित्वात नव्हतीच, असे सांगण्यात येऊ लागले.
 
 
आधुनिक काळात मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आर्य आक्रमणाच्या सिद्धांताला सुरुंग लागत गेला. जेनेटिक्स, भाषाशास्त्र अशा ज्ञानशाखांमधील नवनवीन संशोधन या सिद्धांताच्या फोलपणावर प्रकाश पाडू लागला. इ.स.पू. २०००च्या सुमारास लुप्त झालेल्या सरस्वती नदीचे अस्तित्व कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने शोधता आले. ज्या अर्थी सरस्वती इतक्या पूर्वी अस्तित्वात होती त्या अर्थी ऋग्वेद निर्मिती त्याही आधीची असणार. यामुळे आर्य इ.स.पू. १५०० मध्ये भारतात आले आणि मग वेदनिर्मिती झाली, हा दावा पोकळ ठरतो.
 
पाच शतकांचा तिखट प्रतिकार
‘पराभूत आहे जगती पुत्र भारताचा?’ या प्रकरणामध्ये इसवी सन पूर्व काळापासून भारतावर झालेल्या आक्रमणांचा आणि त्यात भारतीयांनी मिळवलेल्या विजयांचा पट मांडला आहे. ज्या शक, कुशाण, हुणांनी आक्रमणे केली, ते एकतर पराभूत होऊन परत गेले किंवा भारतीय संस्कृतीच्या प्रवाहात विरघळून गेले. त्यानंतर इस्लामी सत्तेच्या उदयाच्या या कालखंडात मुस्लिमांच्या पहिल्या दोन खलिफांच्या आशीर्वादाने मुस्लीम सेनापती भारत पादाक्रांत करायला आले. परंतु, त्यांचे दारूण पराभव झाले.
इ. स. ७१२ मध्ये मोहम्मद बिन कासीम याने केलेले आक्रमण हे भारतावरचे पहिले यशस्वी इस्लामी आक्रमण. परंतु, तरीही इ. स. १२०३ पर्यंत इस्लामी आक्रमकांना भारतामध्ये पक्की मांड ठोकताच आली नाही. नागभट्ट, बाप्पा रावळ, राजा रत्नपाल, जयपाल, नरसिंहदेव, हमीरसिंह, राणा कुंभ, लाचित बडफुकन असे एकाहून एक वरचढ नरशार्दूल इस्लामी आक्रमकांना धूळ चारत राहिले. विशेष गोष्ट म्हणजे नायकीदेवी, कुर्मादेवी, कर्णावती, रामप्यारी अशा स्त्रियांनीही आक्रमकांशी यशस्वी लढे दिले.
 
इस्लामी आक्रमणाला भारतातील सर्व जातीजमातींनी धर्मनिष्ठा प्रकट करून तिखट प्रतिकार केला, हेही पुस्तकात अधोरेखित केले गेले आहे. इ. स. १०३४ मध्ये बहराईचच्या लढाईमध्ये तुर्कांना धूळ चारणारा सुहेलदेव हा मागास समजल्या गेलेल्या पासी समाजातील होता. त्याने बहुजन समाजातील तब्बल २१ राजे एकत्र आणले होते. कामरूपचा राजा पृथू याने वनवासी जमातींच्या सैन्यासह नालंदा विद्यापीठाचा विध्वंस करून आलेल्या बख्तियार खिलजीला पळवून लावले. या प्रखर प्रतिकाराचा परिणाम असा झाला की, सव्वाशे-दीडशे वर्षांमध्ये अरबस्तान, उत्तर आफ्रिका, स्पेन-पोर्तुगाल, इराण, मध्य आशिया एवढा प्रचंड भूभाग व्यापणार्‍या इस्लामला भारतामध्ये लक्षणीय आणि चिरस्थायी सामरिक यश मिळवायला तब्बल साडेपाचशे वर्षे जावी लागली.
 
गैरसोयीचा इतिहास नाकारण्याची सवय
‘नकार विकृती : जे सोयीचं नाही ते घडलंच नाही’ या प्रकरणामध्ये ‘इतिहासात घडलेल्या वंशविच्छेद, जातीय संहार यांसारख्या अत्याचाराच्या आठवणी घडल्याच नाहीत, असे प्रतिपादन करून त्यांचे इतिहासातील अस्तित्व नाकारणे’ अशा वृत्तीवर प्रकाश टाकला आहे. ही वृत्ती म्हणजेच ‘नकारविकृती.’ ज्यूंचा नाझींनी केलेला नरसंहार आणि इस्लामी आक्रमकांनी हिंदूंचा शतकानुशतके केलेला संहार हे जागतिक इतिहासातले दोन काळे अध्याय. जर्मनीने या पापाची कबुली देऊन तसे पुन्हा होऊ नये, यासाठी ज्यू हत्याकांडांची भीषणता अधोरेखित करणारी स्मारके, संग्रहालये उभारली आहेत. भारतात मात्र ‘सामाजिक सलोखा बिघडेल’ या सबबीखाली भूतकाळातल्या अप्रिय गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने सुनियोजित पद्धतीने नकारविकृती कशी रुजवली, त्याला इस्लामवादी, साम्यवादी यांची साथ कशी लाभली, याचे लेखकाने विवेचन केले आहे.
 
सूफी पंथ : शांततेचा आभास
भारतामधील इस्लामचे सहिष्णू चित्र रंगवण्यासाठी सूफी तत्वज्ञानाचा आधार घेतला गेला. इस्लाममधील एकेश्वरवादाशी फारकत घेत अद्वैत तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारा हा पंथ आहे. परंतु, इस्लामशी द्रोह केल्याबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये सूफी संतांना किंमत मोजावी लागली. त्यानंतर सूफी पंथियांनी आपला तोंडवळा इस्लामच्या रूढ चेहर्‍यापेक्षा वेगळा ठेवूनही अंत:करणात आक्रमक आणि विस्तारवादी इस्लामच कसा जोपासला, हे ‘सूफी.. यू टू?’ या प्रकरणामध्ये सांगितले आहे. संगीत, नृत्य या माध्यमांतून हिंदूंवर प्रभाव पाडणार्‍या अनेक सूफी ‘संतां’ची हिंदू धर्म, परंपरा, लोक यांच्याबद्दलची मते किती विषारी होती, हे खुद्द त्यांच्या तोंडून आलेल्या उद्गारांच्या साहाय्यानेच लेखकाने दाखवून दिले आहे. उदा. निजामुद्दीन अवलिया म्हणतो, “पाखंडी लोकांना (हिंदूंना) मृत्यूनंतर शिक्षा भोगावी लागेल.” ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती हा महंमद घोरीसोबत जिहादमध्ये सामील होण्यासाठी भारतात आला होता. अजमेरची सगळी मंदिरे जमीनदोस्त करण्याची त्याने शपथ घेतली होती. अमीर खुस्रो हा भारतीय कविमनावर मोठा पगडा असलेला सूफी संतकवी आहे. या खुस्रोने इ. स. १३०३ चितोडवर विजय मिळवताना खिजर खानाने केलेल्या ३० हजार हिंदूंच्या कत्तलीबद्दल अल्लाचे आभार मानले होते.
 
रणावीण स्वातंत्र्य देशा मिळाले?
‘फक्त अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले’ या वर्षानुवर्षे केल्या गेलेल्या अपप्रचाराचा लेखकाने समाचार घेतला आहे. त्यासाठी लेखकाने विविध क्रांतिकारकांची कामगिरी, आझाद हिंद सेनेची देदीप्यमान कामगिरी, १९४५ साली झालेले नाविकांचे आणि अन्य सैन्यदलांचे बंड अशा महत्त्वाच्या घटनांचे पैलू उलगडून त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यावर झालेल्या सखोल परिणामांवर भाष्य केले आहे. यातून ‘दे दी हमे आझादी, बिना खड्ग बिना ढाल’ या प्रचारातलाफोलपणा दिसून येतो.
 
 
 
शेवटच्या प्रकरणामध्ये लेखकाने आपल्या पुस्तकामागच्या भूमिकेचे विस्तृत विवेचन केले आहे. तो म्हणतो “...कधी तरी ‘सच का सामना’ करावाच लागतो. सत्याला सामोरं जाऊन त्याच्याशी निगडित प्रश्नांचा आणि भावनांचा निचरा केला नाही, तर गाडलेली भुते कधीतरी आपल्यासमोर येऊन उभी राहतातच. इतिहासातल्या चुकांची पुनरावृत्ती भविष्यात टाळायची असेल, तर सत्य सर्वांसमोर सांगितले जायलाच हवे,” हे लेखक आग्रहाने सांगतो.
 
समकालीन नोंदी, विश्वासार्ह ग्रंथांमधील उद्धृते यांच्या आधारे केलेली पुस्तकाची मांडणी यामुळे प्रस्तुत पुस्तकाला संदर्भग्रंथाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पानांचा आणि छपाईच्या दर्जामुळे पुस्तक केवळ वाचनीयच नाही, तर संग्राह्यही झाले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर भारतीयांच्या डोळ्यांवर बांधलेली अज्ञानाची पट्टी दिसते. ही अज्ञानाची, आत्मविस्मृतीची पट्टी दूर करण्यासाठी ‘असत्यमेव जयते...?’ सारखी पुस्तके अधिकाधिक प्रमाणात यायला हवीत.
 
पुस्तकाचे नाव : ‘असत्यमेव जयते...?’
लेखक : अभिजित जोग
प्रकाशक : भीष्म प्रकाशन
पृष्ठसंख्या : ४३५
किंमत : ५९९ रु.
 
 
 
Powered By Sangraha 9.0