आदित्य ठाकरेंची युवासेना हेच बंडाचे मुख्य कारण!

06 Jul 2022 20:32:45

Yuvasena



शिवसेना आणि त्यातील मातब्बरांना हतप्रभ करण्यासाठी लादलेली युवासेना हे शिवसेनेच्या र्‍हासाचे मुख्य कारण आहे. ते तपशीलवार समजून घेतले पाहिजे.
 
 
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला. सत्ता स्थापन झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी त्यांची खंतही व्यक्त केली. या सगळ्यांच्याच विधानांचा आपण जर नीट अभ्यास केला, तर आपल्याला एक सूर सापडतो तो म्हणजे त्यांना न विचारले जाण्याचा! कोणतेही नेतृत्व संपूर्ण समाजाचे नेतृत्व होण्याआधी एका विशिष्ट गटाचे नेतृत्व असते. उद्धव ठाकरेंनी जी चूक केली, त्याचेच परिणाम पुढे भोगावे लागले की, चूक होती आदित्य ठाकरेंना युवा सेनेचे प्रमुख करण्याची? राजकारणात येणारी नवीन पिढी आपल्यासोबत नेतृत्वही आणत असते. आदित्यनेही त्याच न्यायाने आपले लोक आणले.
 
 
 
मूळ शिवसेना बाजूला पडली आणि आदित्य ठाकरे यांची युवासेना पुढे यायला लागली. हा प्रवास तसा अनैसर्गिक होता. कमी कुवतीची माणसे आदित्य ठाकरे यांच्या जीवावर शिवसेनेच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ करायला लागली. शिवसेनेच्या स्थानिक संसाधनांमध्येही त्यांनी वाटा मागायला सुरुवात केली. स्थानिक बिल्डर, व्यावसायिक, शिवसेनेचे आर्थिक सहानुभूतदार यांच्याकडे अजून एक वाटेकरी निर्माण झाला.
 
 
 
विरोधी पक्षाशी संघर्ष करण्यापेक्षा हा शिवसेनेतील अंतर्गत संघर्षच मोठ्या प्रमाणावर उफाळून आला. यातून ‘युवासेना विरूद्ध शिवसेना’ हा संघर्ष आकाराला आला. काही वर्षांपूर्वी पुत्रमोहामुळे बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला होता, त्या निर्णयाचे परिणाम शिवसेनेच्या वाटेला आले होते. इतिहास आता स्वतःच स्वतःची पुनरावृत्ती करीत आहे. फरक एवढाच की, बाळासाहेबांचा प्रयोग चालून गेला. मात्र, युवासेनेचा प्रयोग शिवसेनेच्या पूर्ण अंगाशी आला. आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लादण्याच्या प्रयोगात शिवसेनेत उभी नव्हे, तर एकतर्फी फूट पडली.
 
 
 
युवासेना विरुद्ध शिवसेना
 
 
प्रारंभीच्या काळात शिवसेनेने अधिकाधिक युवकांना आणि पक्षातील नव्या फळीला मजबूत करण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली. राज ठाकरेंसारखा युवकांना आकर्षित करू शकणारा करिष्माई नेता त्यासाठी उपयोगी ठरला. भारतीय विद्यार्थी सेनेसाठी महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना मजबूत केली. एक समांतर संघटना म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळीसुद्धा मूळ शिवसेना की भारतीय विद्यार्थी सेना, हा संघर्ष कायम होता. भाविसेचे कार्यकर्ते तरुण होते, दमदार होते.
 
 
त्यांच्याकडे राज ठाकरेंसारखा नेताही होता. मात्र, शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये त्यांना कधीच फारशा महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेेले कित्येक लोक आजही राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये आहेत. यातली कोणाचेही राजकीय करिअर घडू शकले नाही. ठाकरे घराण्यातला नेतृत्व आणि वारशाचा वाद विकोपाला पोहोचला आणि राज ठाकरे मनसे स्थापन करून मोकळे झाले. भारतीय विद्यार्थी सेनेची धुरा मात्र कोणत्या ना कोणत्या दुय्यम नेतृत्वाला देण्यात आली. कुठल्याही घराण्याच्या पक्षात जे घडते, ते इथेही घडायला सुरुवात झाली.
 
 
 
आता वेळ आदित्य ठाकरेंची होती. त्यांचे राज्यव्यापी नेतृत्व रुजविण्यासाठी मग भाविसेला हळूहळू गुंडाळून युवासेना उभारण्यात आली. २०१४ साली शिवसेना भाजप सोबत सत्तेत आली. युवासेनेचेकाम तोपर्यंत संथगतीने सुरू होते. मात्र, २०१४ साली भाजप-शिवसेना युती सत्तेत आल्यानंतर युवासेना आणखी जोमाने काम करू लागली. सत्तेत असल्याचा फायदा मिळावा म्हणून युवासेनेच्याच माध्यमातून अधिकाधिक लोक स्वतःला शिवसेनेशी जोडून घेऊ लागले. यातला संदेश स्पष्ट होता. आदित्य हेच आता नेते!
 
 
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी आमदारकी लढवण्याच निर्णय घेतला. निवडणूक लढविणारा पहिला ठाकरे म्हणून त्यांचा गवगवाही फार झाला. वरळी हा काही आदित्यसाठी सुरक्षित मतदारसंघ नव्हता. मग बरीच जोडतोड करून ते वरळीमधून आमदार झाले. हा एक आमदार निवडून आणण्यासाठी विधान परिषदेवर दोन आमदार पाठविण्याचे संपूर्ण देशातले हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार बनले. त्यात आदित्य ठाकरेंना मंत्रिपदही मिळाले. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांपैकी एक मंत्रिपद उद्धव यांनी मुलाला दिले; तर मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवले. खरी गडबड इथेच सुरू झाली. वरुण सरदेसाई तर आदित्य ठाकरेंसोबत मंत्रालयातल्या महत्त्वाच्या बैठकीतसुद्धा बसू लागले.
 
 
 
कामे करवून घेण्याच्या बाबतीतही हीच मंडळी जागा अडवू लागली. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या नाराज आमदारांमध्ये धुसफूस होती. आदित्य ठाकरेंना मिळालेल्या मंत्रिपदानंतर ही धुसफूस कायम राहिली. मुख्यमंत्रिपद गमावल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होतेच. दिवसेंदिवस त्यांना प्रभावहीन करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ करत असल्याच्या वारंवार बातम्या येत होत्या. नगरविकास खात्यामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची युवासेनेची टीम दाखवत असलेला रस एकनाथ शिंदेंसाठी भविष्यातल्या धोक्याचे संकेत देत होता.
 
 
 
आदित्य ठाकरेंना मंत्रिपदं दिले, शिवाय अपक्ष आमदारांना शिवसेनेने मंत्री केले. त्यामुळे वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेले शिवसैनिक दुखावले गेले. उद्धव यांनी आदित्य यांना शिवसेनेत मजबूत करण्यासाठी जुन्या निष्ठावंतांना डावलले. त्यामुळेच ‘युवासेना विरुद्ध शिवसेना’ असा संघर्ष गेल्या साडेसात वर्षांपासून शिवसेनेत थेट सुरू होता, असं आता थेट बोललं जातंय. एकनाथ शिंदेंच्या मनातली खदखद स्फोटात बदलण्यासही ही बाब कारणीभूत ठरली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या रणनितीत शिंदेंना बाजूला सारण्यात आलं. तेव्हाच त्यांनी शिवसेनेत बंडखोरी करण्याचा निर्णय दिला.
 
 
 
भाजपला पर्याय म्हणून हिंदुत्वाशी तडजोड?
 
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून भाजप सेनेवर सातत्याने एक आरोप करते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या सेक्युलर पक्षांसोबत गेलेली शिवसेना हिंदुत्वापासून दूर होत असल्याचा हा आरोप होता. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचानवा चेहरा म्हणून पुढं केलं जात होतं. भोंग्याचा मुद्दा निघाल्यामुळे शिवसेनेला वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागलं. ’हातात काम आणि मुखात राम’ असा नारा आदित्य यांनी दिला. शिवाय राणा दाम्पत्यावर हनुमान चालीसा पठणासाठी राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. यामुळे शिवसेनेची प्रतिमा धुसर झाल्याचे चित्र होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी होती. राजकीय लाभासाठी आणि भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून उभारी घेण्यासाठी शिवसेना सेक्युलर भूमिका घेत होती.
 
 
 
राष्ट्रीय राजकारणात आदित्य ठाकरेंना ‘सॉफ्ट हिंदुत्व’ आणि सेक्युलर मूल्यांवर चालणारा नेता, अशा प्रतिमेत शिवसेनेला उतरवायचे होते. बाळासाहेबांच्या भूमिका चमत्कारिक वाटल्या तरी त्या ठाम असायच्या. सावरकरांना शिवीगाळ करण्यार्‍यांसोबत सत्तेत बसायचे आणि मग शरयू आरतीला अयोध्येला पोहोचायचे, असा काही वडाला पिंपळाची साल लावण्याचा प्रयोग संजय राऊतांच्या सुपीक डोक्यातून आला होता. मतदारांना तर त्यांनी गृहीत धरलेच होते. पण, सगळ्यात मोठा घात झाला तो स्वत:च्या आमदारांना आणि शिंदेंसारख्या नेत्याला गृहीत धरण्याचा! भुवया उंचवून, शिवराळ भाषा वापरून, संपादकच असल्याने माध्यमांना मथळे देऊन राऊतांनी ही कोसळती बाजू सावरली होती. पण, हा फक्त गिलावा होता आणि आतली पोकळी वाढतच होती.
 
 
 
हिंदुत्वासमोरचे प्रश्न सोडविण्याची पूर्ण जबाबदारी घेतलेले मोदी- शाह हे दोन तेजस्वी ‘आयकॉन’ दिल्ली आणि देशभरात तळपत असताना आदित्य ठाकरे व त्यांच्या युवासेनेच्या पदाधिकार्‍यांचे फक्त भगवी उपरणी घालून मिरविणे खोटे वाटत होते. या दुटप्पीपणाच्या आधारावर आपल्याला उद्या मतदारांना तोंड देता येणार नाही, याची पुरती जाणीव सेनेच्या स्थापनेपासूनशिवसेनेसोबत असलेल्या आमदारांना नक्कीच होती. मात्र, पुत्र अणि प्रपौत्र मोहापुढे त्यांचे काही चालतच नव्हते. आता इतके होऊनही शिवसेनेचा पिळ काही गेलेला नाही. जे काही उरले आहेत, त्यांतील बर्‍यापैकी लोकांनी आता सेनेचे चिन्ह व पक्षाचे नाव काढून आपण केलेल्या लोकोपयोगी कामांची बॅनरबाजी सुरू केली आहे. केवळ सत्तेच्या आधारावर नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला की, ते किती तकलादू असते, त्याचे हा घटनाक्रम उत्तर आहे.






Powered By Sangraha 9.0