पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत महापुराचा कहर....

06 Jul 2022 09:51:28

Flood
 
 
 
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाने झोडपले असून यंदा मान्सूनच्या प्रारंभीच ईशान्य भारतालाही महापुराचा मोठा तडाखा बसला. तेव्हा या महापुराची कारणे, सद्यस्थिती आणि त्यामुळे झालेली जीवितहानी, वित्तहानी यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्यात देशातील वायव्य प्रदेशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे, तर पश्चिम किनारपट्टीवर केरळ, गोवा, कोकण, रायगड, ठाणे, मुंबई येथेही पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशदेखील महापुराने वेढलेले आहेत. परंतु, भारतीय हवामान खात्यातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले आहे की, आसाममध्ये १९८९ ते २०१८ या काळात जून ते सप्टेंबर महिन्यातील मोसमी पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे. तसेच जुलै महिन्यात राजस्थान, पंजाब आणि हरियाणा व पश्चिम किनारपट्टीच्या सर्व भागांना पाऊस झोडपून काढेल, असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
 
एकीकडे मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात ३० टक्के घट नोंदवण्यात आली आहे, तर दुसरीकडे ईशान्य भारतात २२ टक्के जास्त पाऊस यंदा बरसला आहे. देशभराच्या पावसाच्या नोंदणीचा विचार करता, हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे एकूण आठ टक्के पाऊस कमी पडला आहे. पण, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
 
मुंबई व महानगरातील स्थिती
जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुंबई व महानगरात वाहतुकीची दाणादाण उडाली. पहिल्याच पावसाने मुंबईकरांना वेठीस धरले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी तुंबणार नाही, रस्त्यांवर खड्डे पडणार नाही, असे केलेले दावे खोटे ठरले आहेत. हवामान विभागाच्या नोंदणीप्रमाणे कुलाब्याला २२७.८ मिमी पाऊस, तर सांताक्रुझला १७५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या माहितीप्रमाणे, माहिम, दादर, धारावी, परळ आणि वरळी येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली व अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. ‘जी’ दक्षिण विभागात २०८ मिमी व ‘एच’ पश्चिम विभागात १९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माहिमचे नागरिक सुनील देशमुख म्हणतात की, “हिंदमाता जंक्शन व किंगसर्कलमधील रस्ता पाण्याखाली गेला होता आणि वाहतूक कोलमडली होती. पावसाचे गुडघाभर पाणी साचल्याने व रस्ता तुंबण्याच्या समस्या अंधेरी, जुहूला व अनेक ठिकाणी सुद्धा अनुभवाला मिळाल्या.” तलावातील प्रदेशात जास्त पाऊस न पडल्याने तलावातील पाणीसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही. महानगर प्रदेशातील ठाणे, नवी मुंबई इत्यादी भागात जोरदार पाऊस बरसल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.तसेच कल्याण-बदलापूरच्या ग्लोब बिझनेस पार्क आणि विमको नाका येथे पाणी तुंबले होते. ठाण्याच्या वंदना सिनेमा व कोळीवाडा येथे ठाणे स्थानकाजवळ पाणी साचले होते.
 
 
पहिल्या पावसात व काल-परवापासून कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या उद्भवली होती. मुसळदार पावसाच्या तडाख्यात मुंबईत ६० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. १० ते १२ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. धारावीत पाणी साचल्याने पालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याची संतापाची प्रतिक्रिया स्थानिकांकडून केली जात होती. येथील लोकसंख्या एक लाखांपर्यंत असूनही पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात मुंबई महापालिका अयशस्वी ठरली आहे.
 
 
मुंबई शहरात १८ ठिकाणांहून अधिक ठिकाणी ‘शॉर्टसर्किट’च्या घटना घडल्या होत्या. जोरदार पावसामुळे व वार्‍यामुळे पेडर रोडच्या पदपथाला भूस्खलन होऊन तडे गेल्याचीही नोंद आहे.
 
 
चेरापुंजीत नवा जलविक्रम
देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी असलेल्या मेघालयातील चेरापुंजी येथे हंगामाच्या पहिल्या तीन आठवड्यांत जूनमध्ये तब्बल ४,७६० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांत दोन ते तीन वेळा चेरापुंजीलाही मागे टाकत आघाडी घेणार्‍या महाबळेश्वरमध्ये मात्र या कालावधीत केवळ १२० मिमी पावसाची नोंद झाली. चेरापुंजीच्या जागी हल्ली खासी हिल्स (पूर्व) मावसीनराम या नव्या जास्त पावसाची नोंद झालेल्या ठिकाणी ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०१८ व २०१९ या दोन वर्षांत मेघालयात आणि चेरापुंजीत पावसाचे प्रमाण घटले होते. त्याच काळात महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत मोठा पाऊस पडल्याची नोंद झाली होती.
 
 
ईशान्येकडील आसाम, मेघालय इत्यादी राज्यांमध्ये महापुराने कहर केला आहे व लाखो लोकांना संकटात टाकले आहे. खायला अन्न व पिण्याकरिता पाणी मिळणेदेखील तेथे दुरापास्त होऊन बसले आहे.
 
 
पुराचा तडाखा बसलेले प्रदेश
दक्षिण आसाम - बापेता, नागाव, कामरुप, धुब्री, दारंग, काचार, करिमगंज, बजाली, नलबारी.
पश्चिम अरुणाचल प्रदेश - पापुम पारे, कामेंग.
उत्तर मणिपूर - नोने, तामेन गॉन, जिरीबाम.
पूर्व मेघालय - गारो हिल्स (दक्षिण), गारो हिल्स (पश्चिम), गारो हिल्स (नैऋत्य), जैन्तिया (पूर्व), खासी हिल्स (पूर्व), खासी हिल्स (नैऋत्य).
त्रिपुरा - पश्चिमेकडील प्रदेश.
पुरात सापडलेले एकूण नागरिक - ५५ लाखांहून अधिक
पुरामुळे बेघर झालेले नागरिक - २.६ लाख
 
 
आसाममधील पूरस्थिती धोकादायक
आसाममध्ये महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांची संख्या २५ लाखांच्या वर गेली आहे. काचार जिल्ह्यामधील सिलचर शहर पुराखाली जाऊन आता दहा दिवस उलटले आहेत. अनेक घरे, पूल व रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. १ लाख, ७६ हजार, २०१ नागरिकांनी राहण्याकरिता सरकारने पुरवलेल्या ५५५ साहाय्य केंद्रांची मदत घेतली आहे. १३० हून अधिक नागरिकांचा पुरामध्ये बळी गेला आहे. शिवसेनेमधील गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांकडून पुरात सापडलेल्या नागरिकांकरिता ५१ लाखांची देणगी दिली गेली. आसामच्या हिमंता बिस्व सरमा यांनी यावर कृतज्ञता व्यक्त करून ही देणगी पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत नक्की पोहोचेल, अशी घोषणा केली आहे.
 
 
भारतीय हवाई दलाची कामगिरी
भारतीय हवाई दलाने आसाम व मेघालयमध्ये विमानांच्या ७४ उड्डाण फेर्‍यांच्या मदतीने २१ जूनपासून पुरात अडकलेल्या २५३ नागरिकांची सुटका केली. संकटग्रस्तांना २०० टन वजनाचे अन्न, पिण्याचे पाणी व इतर जिन्नस पुरविले. या हवाई दलात सुपर हर्क्युलस, ट्रान्स्पोर्ट एअरक्राफ्ट, नेहमीचे हेलकॉप्टर्स, सुधारित हलके हेलिकॉप्टर्स (अङक) इत्यादीं विमाने वापरण्यात आली. अन्नवाटपामुळे नागरिकांची खाण्याची व्यवस्था सुधारली. पण, आसाम राज्यातील २८ जिल्ह्यातील ३३ लाखांहून अधिक नागरिकांना पुराच्या संकटाला तोंड द्यावे लागले आहे. राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीप्रमाणे, १२० हून अधिक लोकांचे पुरामुळे प्राण गेले आहेत. १७ जणांना भूस्खलनाच्या घटनेत जीव गमवावा लागला. ८.७६ लाख लोक बारपेटा जिल्ह्यात, ५.०८ लाख लोक नागाव जिल्ह्यात, ४.०१ लाख लोक कामरुप जिल्ह्यात, २.७६ लाख लोक काचार जिल्ह्यात, २.१६ लाख लोक करिमगंज जिल्ह्यात, १.८४ लाख लोक ठुबरी जिल्ह्यात, १.७ लाख लोक दारंग जिल्ह्यात अडकले आहेत. आसाममधील स्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. ७६ हजार ११५ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ५१ जनावरे वाहून गेली आहेत. गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री या आसाम व मेघालय भागाच्या पुराच्या घटना जाणण्याकरिता व पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी गेले आहेत.
 
 
मणिपूरमध्ये दरड कोसळून आठहून अधिक जण मृत्यू पावले आहेत. त्यात लष्करी जवान सापडले आहेत. अन्यापैकी ७२ जण बेपत्ता झाले आहेत. त्याठिकाणच्या बचावाचे काम आपत्कालीन व्यवस्थापन दलांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह व रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यानी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंग यांच्याशी संपर्क साधला असून या दुर्घटनेविषयी माहिती घेतली आहे.
 
 
बांगलादेशातही पुराचा हाहाकार
सिल्हेट व सुनामगंजमधील सुरमा नदीमध्ये सेकंदाला १०० घनमीटर पाणी शिरल्यामुळे पुराने हाहाकार माजला आहे. ब्रह्मपुत्रा खोरे (गंगा डेल्टा) आणि अनेक उपनद्यांना आलेल्या पुरामुळे ७० लाख लोक बेघर झाले आहेत. पुरात २५ जण मृत्यू पावले आहेत. सिल्हेटमध्ये गोवैन घाट, कंपानीगंज, कनैघाट, जन्तियापूर, सिल्हेट्सदर, झाकियागंज, बिश्वनाथ, गोलपगंज, बिनी बझार इत्यादी प्रदेश फार वाईट अवस्थेत आहेत. तेथे नागरिकांना सरकारकडून आठ लाख घरांसाठी चार लाख जलशुद्धी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. एक लाख पाण्याची पिंपे (जेरी कॅन) घेऊन पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. ईशान्येकडील प्रदेशात दरवर्षीप्रमाणे पुराची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. पण, सरकारी व्यवस्थेमुळे संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0