भारताला अभिजात कलाविश्वाचा वारसा आहे. या देदीप्यमान वारशाचे संवर्धन करण्यासाठी आकाश नारायण विश्वास काम करतात. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
यशोदा कृष्णाची कोण आहे? राधेसोबत कृष्णाचे लग्न लावायचा सीन करावा लागेल मग यशोदेचे काय होणार? त्या सहकार्याने असा प्रश्न विचारला आणि आकाश नारायण विश्वास प्रचंड अस्वस्थ झाले. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मानंदंडाबाबत ही मनोरंजन इंडस्ट्री इतकी अनभिज्ञ आहे? की मुद्दाम हे सगळे केले जाते? पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, हिंदू धार्मिक विषयावर सामाजिक विषयावर मनोरंजनात्मक मालिका, शॉर्ट फिल्म किंवा चित्रपट निर्माण करणारे हे जास्तीत गैर हिंदूच आहेत. प्रश्न त्यांच्या आस्थेचा नसल्यामुळे त्यांचे प्रत्येक काम मनोरंजनाच्या आणि ‘टिआरपी’ मिळवण्याच्या उद्देशाने होतात. ‘सिनेइंडस्ट्री’मध्ये संगीत निर्देशक म्हणून काम करताना त्यांना हे विखारी सत्य सातत्याने दिसत होते. पुढे त्यांनी २०१६ साली लघु संगितीका निर्माण करण्याचे ठरवले. आघाडीच्या गायकांनी त्यात गाणी गायली. या लघुसंगितेकेचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाने व्हावा, अशी आकाश यांची इच्छा होती. मात्र, लघुपटाला मदत करणार्यांकडून सूचना आल्या की, मोदींच्या जागी आघाडीच्या फिल्मी सुपरस्टारला घ्या. किंवा पंजाबचे कुणी तरी मोठे उद्योगपती आहेत ते या लघुपटात संदेश देतील. यावर आकाश यांनी नकार दिला. त्यामुळे आकाश यांच्या लघुपटाला आर्थिक साहाय्य बंद करण्यात आले. परिणामस्वरूप आकाश यांनी इतक्या मेहनतीने बनवलेला संगीत लघुपट बासनात गुंडाळला गेला. अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज जिहाद, लव्ह जिहाद वगैरे संकल्पनाबद्दल त्यांनी फक्त ऐकले होते. पण हे सगळे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. तेव्हा मात्र त्यांच्यातले संस्कारी मन बंड करून उठले. हे सगळे कशासाठी? यातून देशाच्या नव्या पिढीची, देशाची संस्कृती, वारसा याची हानी होत आहे, असे त्यांना वाटू लागले. शेवटी सिनेसृष्टीत मोठ्या कष्टाने स्वत:चे बस्तान बसवू पाहणार्या आकाश विश्वास यांनी या सगळ्याला रामराम ठोकला आणि ते मार्गस्थ झाले आपल्या ध्येयाकडे.
ते ध्येय काय होते? तर त्या ध्येयाला कित्येक पिढ्यांचा वारसा होता. आकाश विश्वास हे मुळचे कोलकात्याचे. त्यांचे वडील नारायण हे शिक्षक तर आई जॉली या गृहिणी. कलासक्त सांस्कृतिक जीवनात अग्रेसर असलेला विश्वास कुटुंबाचा गोतावळा. नारायण हे समाजशील होते. गरजू लोकांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. लहाणपणापासूनच आकाश यांना चित्रकलेची आवड. गायनाचीही गोडी. ते इयत्ता नववीत असतानाची घटना. त्यांच्या शाळेबाहेरील भिंतीवर नेहमी ‘सी ग्रेड’ फिल्मची अश्लिल स्वरूपातली जाहिरात चित्र रंगवलेले असे किंवा निवडणुकीची जाहिरात. एकदा ‘सी ग्रेड’ चित्रपटाची जाहिरात पाहून एका लहान मुलाने त्याच्या आईला विचारले, हे काय आहे? यावर उत्तर न सुचल्याने आईने त्या मुलाला मारले. हे सगळे पाहून आकाश यांना वाटले की, यात मुलाची काय चूक? ही जाहिरात इथे लावणे चुकीचे. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत सांगितले. यावर मुख्याध्यापकांनी विरोध कसा करणार म्हणत विषयाला बगल दिली. मात्र, त्याकाळी आकाश खासगी शिकवणी घेत असत. त्यांच्याकडे त्यातून थोडे पैसे जमा झाले होते. त्यांनी रंग विकत घेतले. भिंतीवर स्वातंत्र्य सैनिकांची चित्र काढली. त्यांच्या कृत्याचा सकारात्मक परिणाम झाला, शाळेच्या प्रशासनाने निर्णय घेतला की,शाळेसमोरील सगळ्याच भिंतीवर असे चित्र काढायचे आणि त्याचा सगळा खर्च शाळा देईल. पुढे बंगालमध्ये पूर आला. त्यावेळी सहकार्यांच्या मदतीने पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करत आकाश पूरग्रस्त भागांना मदत घेऊन गेले. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सेवाकार्य करत होते.
रा. स्व. संघाच्या सेवाकार्याचा असा परिसस्पर्श आकाश यांना झाला. त्यातच स्वातंत्र्यसेनानी किंवा थोर समाजसेवकांची नुसती चित्र काढण्यापेक्षा त्यांच्या जीवनाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न आकाश करू लागले. आपल्या कलेतून राष्ट्रप्रेमाचा आणि सांस्कृतिक वारशाचा संदेश अधोरेखित करायचा हे ध्येय त्यांना येथेच गवसलेे. एका कार्यक्रमात त्यांची भेट सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांच्याशी झाली. आपल्या ध्येयाबाबत त्यांनी मन्ना डे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मन्ना डे म्हणाले, तुझे ध्येय प्राप्त करायचे असेल, तर तुला शहराबाहेर पडून भारत जाणून घ्यायला हवा. मन्ना डे यांच्या म्हणण्यानुसारच ‘पाईन आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर आकाश आधी दिल्ली आणि नंतर मुंबईत राहू लागले. सुरुवातीला छोटीमोठी कामे केली. त्यातून आर्थिक भक्कमता निर्माण केली. मात्र, त्यांचे ध्येय त्यांची पाठ सोडत नव्हते. आपल्या देशातील कलेचा वारसा अतियश मुल्यवान आहे. तो जपला पाहिजे. सांस्कृतिक वारसा सांगणारे कलासैनिक तयार व्हायला हवेत. या ध्यासाने त्यांनी आणि त्यांची पत्नी अरूणा यांनी ‘एकतारा गुरूकूल’ पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्थापन केले. पालघरमधील २०० कलासक्त कुटुंब या गुरूकूलशी जोडले गेले आहेत. माफक शुल्कात येथे भारतीय संगीत, नृत्य शिकवले जाते. लुप्त होत असलेल्या संगीत साधनांवर इथे संशोधन होत आहे. उदाहरणार्थ तारपामध्ये तीन छिद्र असतात. त्यामुळे पूर्ण संगीत सूर त्यात बसत नाहीत, तर तारपामध्ये सात छिद्र केली, तर त्याचा वापर कसा होईल? यावर संशोधन होत आहे. पालघर जिल्हा वनवासीबहुल आहे. इथे वारली आणि तत्सम वनवासी बांधवांची विशिष्ट संगीत नृत्य आणि चित्रशैली आहे, याबाबतही आकाश संशोधन करतात.
खरेच केवढे वेगळे काम आणि वेगळी दृष्टी. सांस्कृतिक सैन्याच्या या सेनापतीचे काम देशाच्या कलाविश्वातले देदीप्यमान कार्य आहे.