खाकीतला देवमाणूस; हेडकॉन्स्टेबल यांनी वाचवला महिलेचा जीव

05 Jul 2022 19:01:40
सद 1
 
 
मुंबई(प्रतिनिधी): सिंघु्दुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या आंबोली मधील हिरण्यकेशी नदीपात्रात सोमवारी दि. ४ जुलै रोजी दुपारी एक महिला सेल्फी काढण्याच्या नादात नदीत वाहून जात होती. प्रसंगावधान दाखवत आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी या महिलेला सुखरूप बाहेर काढले.
 
 
 
सध्या संपूर्ण कोकणात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, तळ कोकणात वर्ष पर्यटनाला सुरुवात झाली आहे. आंबोलीमध्ये मोकांची गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. याच दरम्यान हिरण्यकेशी नदीपात्रामध्ये एक अपघात घडला. एक महिला सेल्फी काढायच्या नादामध्ये नदीत वाहून गेली. नदीचा प्रवाह इतका होता की ती जवळपास ५०० मीटर वाहून गेल्यानंतर एका झाडाला पकडून नदीपात्रातच अडकली होती. या बाबत माहिती मिळताच आंबोली पोलिस आणि आंबोलीतील तरुण तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आणि बचाव कार्य सुरू केले.
 
 
 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आंबोली पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी नदीमध्ये उडी मारली. या दरम्यान हिरण्यकेशी नदीचे पात्र ओथंबून वाहत होते. देसाई यांनी आपल्या कमरेला एक दोरी बांधली होती, ज्याचे दुसरे टोक किनाऱ्यावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांच्या हातात होते. देसाई यांनी या महिलेला सुखरूप काठावर आणले. आणि तिचा जीव वाचवला. ही महिला सेल्फी काढण्याच्या नादात वाहून जात होती. वर्षा पर्यटनाला जाताना पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0