मुंबई(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
खाडीकिनारा परिसारत विचित्र असा कुजलेला वास पसरला होता. खाडी जवळ एका सिमेंटच्या पोत्यातून हा वास येत असल्याचे समोर आले. मोंड पोलीस पाटील जितेंद्र राणे यांनी देवगड पोलीस स्टेशनला कळवले. देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रशांत जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी जागेची पाहणी केली. या दरम्यान या पोत्यात बिबट्याचा मृतदेह असल्याचे समजले. परंतु, या मृतदेहाचे चारही पंजे, पाय आणि शीर गायब आहे. आणि मृतदेह कुजलेल्या स्थिती आहे. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रीतसर पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. मोंड खाडीकिनारी सिंमेटच्या पोत्यात बिबट्याचे पाय आणि शीर तोडून कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तस्करीचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. याचा पुढील तपास सुरू आहे.