उगाच नको बचत खात्यांचा फाफटपसारा!

29 Jul 2022 11:06:39

ac
 
 
बचत खाती जास्तीत जास्त दोनच असावीत. पहिले खाते प्राधान्याने ‘ऑपरेट’ करण्यासाठी व दुसरे खाते पर्यायी म्हणून असावे व या खात्यात अधूनमधून व्यवहार करावेत. त्याविषयी सविस्तर...
 
 
प्रत्येकाचे कोणत्या तरी बँकेत बचत खाते असतेच. भारत सरकारचा ‘आर्थिक सर्वसमावेशकता’ (फायनान्शियल इन्क्ल्युजन) हा एक देशपातळीवरचा कार्यक्रम आहे. यातून देशाचे खरे आर्थिक चित्र दिसण्यासाठी, प्रत्येकाचे बचत खाते हवेच. हल्ली तरुणांचे नोकरी बदलण्याचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे नोकरी बदलली की, बचत खाते बदलले जाते. कंपनीचे जेथे किंवा ज्या बँकेत ‘सॅलरी’ खाते असते, त्या बँकेतच सर्व कर्मचार्‍यांची बचत खाती उघडण्यासाठी बँक व कंपन्या करार करतात.
 
 
परिणामी, नोकरी बदलली की, पगार नियमित मिळण्यासाठी कंपनी ज्या बँकेत सांगेल, त्या बँकेत खाते उघडावे लागते. काहीजण नवे बचत खाते उघडले की जुने खाते बंद करतात, पण काही जण ते बंद करीत नाहीत, तसेच चालू ठेवतात. परिणामी, विनाकारण बचत खात्यांची संख्या वाढते व त्यांच्यावर विनाकारण खर्च करावा लागतो. बचत खाती जास्तीत जास्त दोनच असावीत. पहिले खाते प्राधान्याने ‘ऑपरेट’ करण्यासाठी व दुसरे खाते पर्यायी म्हणून असावे व या खात्यात अधूनमधून व्यवहार करावेत.
 
 
एका कर्मचार्‍याचे पगार जमा होण्यासाठी एका बँकेत बचत खाते होते. त्याने नोकरी सोडली, पण ते बचत खाते बंद केले नाही व या खात्यात पगार येणे बंद झाल्यामुळे बँकेने हे खाते ‘सॅलरी’ खात्यातून काढून नियमित बचत खात्यात परावर्तित केले. नियमित बचत खात्यात किमान दहा हजार रुपये शिल्लक हवीच, असा या खात्याचा नियम आहे. परिणामी, त्याला या बचत खात्यात रुपये दहा हजार ठेवणे म्हणजे ‘डेड’ गुंतवणूक करावयास हवी आणि जर इतकी रक्कम ठेवली नाही, तर बँकेच्या नियमाप्रमाणे दंड भरावयास हवा.
 
 
त्यामुळे उगाच बचत खाते ठेवू नये. विनाकारण खिशाला भुर्दंड पडू शकतो. बरीच बचत खाती उघडणे, आता प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिशय सुलभ झाले आहे. पण, ती ‘मेन्टेन’ करणे तितकेस सोप्पे नाही. बरीच खाती असली की, त्या प्रत्येक खात्यात तुम्हाला दंड आकारला जाऊ नये म्हणून किमान रक्कम शिल्लक म्हणून ठेवावीच लागते व बचतींवर फक्त दरसाल दर शेकडा अडीच टक्के ते चार टक्के इतक्या कमी दराने व्याज मिळते व देशातील चलनवाढीचा विचार केला तर ‘निगेटिव्ह’ व्याज मिळते. बँकेच्या बचत किंवा ‘रिकरिंग’ खात्यात जर ग्राहक किमान एक लाख रुपये सरासरी शिल्लक ठेवत असेल, तर अशा खातेदारांना काही बँका, किमान शिल्लक नसल्याचा दंड लावत नाहीत. किती दिवस खात्यात किमान रक्कम नव्हती, त्या प्रत्येक दिवसाला दंड आकारला जातो.
 
 
खात्यात किमान रक्कम ठेवल्यानंतरची अधूनमधून बँकेतील शिल्लक किती आहे, हे पाहत राहावे. कारण, कधी कधी खात्यात ‘ऑटो डेबिट’ होऊन किमान शिल्लक खाली जाऊ शकते व परिणामी दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे जेवढी बचत खाती अधिक तेवढी दक्षता अधिक घ्यावी लागते. किमान शिल्लक नसल्याचा दंड आकारला जाणार आहे, असे बँका दंड आकारण्यापूर्वी किंवा दंड आकारल्यावरही खातेदाराला कळवित नाही. खातेदार जेव्हा आपले पासबुक भरुन घेईल किंवा मोबाईल बँकिंगवर आपले खाते ‘सर्च’ करेल तेव्हाच त्याला दंड आकारला आहे, हे कळते.
 
 
‘सॅलरी’ खाते शून्य शिल्लकीवरदेखील उघडले जाते. जर नोकरी बदलली व या खात्यात तीन ते चार महिने पगार ‘क्रेडिट’ झाला नाही, तर बँका हे खाते ‘सॅलरी’ खात्यातून काढून टाकून नियमित बचत खात्यात खातेदाराला न कळविता परावर्तित करतात. हे खाते परावर्तित झाले की, या खात्यासाठी जे काही फायदे असतील ते बंद होतात. परिणामी, खातेदाराला वेगवेगळी शुल्कं भरावी लागतात. ‘आयकर रिटर्न’ फाईल करतानाही सर्व बचत खात्यात वर्षास जमा झालेले व्याज एकत्र करावे लागते व व्याज जर वर्षाला रु. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक मिळालेले असेल, तर त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो.
 
 
त्यामुळे बरीच खाती असल्यास, ‘आयकर रिटर्न’ फाईल करतानाही दक्षता बाळगावी लागते, तसेच बर्‍याच खात्यांपैकी कोणतेही खाते ‘डॉरमन्ट’ होऊ नये म्हणून प्रत्येक खात्यात अधूनमधून व्यवहार करावे लागतात. खाते ‘डॉरमन्ट’ झाल्यास, परत ती ‘केवायसी’ देण्याची प्रक्रिया पूर्ण करुन खाते नियमित करावे लागते. बरीच बचत खाती असलेल्यांचा एक फायदा म्हणजे खात्यात असलेल्या शिलकीनुसार तुम्ही अनेक ‘डेबिट कार्ड’ वापरुन व्यवहार करु शकता.
 
 
वित्तीय सल्लागारांच्या मते, तीनपेक्षा अधिक बचत खाती ठेवू नयेत. एक खाते मिळणार्‍या उत्पन्नाच्या ‘क्रेडिट’साठी वापरावे. परिणामी, ‘आयकर रिटर्न’ फाईल करताना सर्व मागे मिळणार्‍या उत्पन्नांचा आकडा एकाच खात्यात मिळू शकेल. दुसरे खाते घराच्या खर्चासाठी वापरावे, हे खाते बायकोबरोबर संयुक्त उघडावे. घरखर्चासाठी स्वतंत्र खाते ठेवल्यामुळे, नक्की मासिक घरखर्च किती होतो, याची आकडेवारी सहज मिळू शकते. प्रत्येकाचे वैयक्तिक स्वरुपाचे काही खर्च असतात. हे भागविण्यासाठी तिसरे खाते बंद करावयाचे असेल, तर खासगी बँका तुम्हाला ऑनलाईन खाते बंद करायची सोय देतात. तुम्ही बँकेचे काही देणे नसल्यास, बँकेच्या ‘नेट बँकिंग’ संकेतस्थळावरुन तुम्ही खाते बंद करू शकता, बहुतेक राष्ट्रीयकृत बँकेत तुम्हाला स्वत: जाऊन बंद करावे लागते.
 
 
तुमची जर बरीच खाती असतील, तर प्रत्येक खात्याचे तुम्हाला ‘एसएमएस’ शुल्क भरावे लागणार. तुमच्या खात्यात ‘डेबिट’ किंवा ’क्रेडिट’ कोणताही व्यवहार झाला की त्याचा व्यवहार झालेला कळावा, या सेवेसाठी बँक शुल्क अधिक ‘जीएसटी’ आकारते. तुमची जितकी बँक बचत खाती असतील, त्या प्रत्येक खात्याचा ‘एसएमएस’ शुल्काचा भुर्दंड तुम्हाला पडणार.
हल्ली प्रत्येक खातेदाराला बँकेतर्फे ‘डेबिट कार्ड’ दिले जाते, जितक्या बँकांना तुमची खाती असतील, तितकी तुम्हाला ‘डेबिट कार्ड’ मिळणार व या प्रत्येक ‘डेबिट कार्ड’साठी तुमच्या खात्यातून वार्षिक शुल्क व ‘जीएसटी’ ‘डेबिट’ केले जाणार. तुमची ’एसएमएस’ कमी असोत वा जास्त; ‘डेबिट कार्ड’चा वापर कमी असो वा जास्त, तुम्हाला त्यांच्यासाठी असलेला शुल्क भरावाच लागणार. ‘डेबिट कार्ड’ वापरासाठी ‘पिन क्रमांक’ लागतो. समजा, काही कारणाने खातेदाराला ‘पिन क्रमांक’ बँकेकडून बदलून घ्यावयाचा असेल, तर खातेदाराला यासाठी शुल्क आकारले जाते.
 
 
कधी कधी ‘डेबिट कार्ड’ गहाळ होऊ शकते किंवा हरवू शकते, तरीही ‘डुप्लिकेट कार्ड’साठी अर्ज केल्यावर बँक शुल्क आकारते. अगोदर बचत खात्याच्या ‘चेकबुक’ना ग्राहकांना शुल्क आकारले जाई. बचत खात्याची ‘चेकबुक’ वर्षाला ठरावीक फुकट दिली जातात. पण, यापुढे ‘चेकबुक’वर ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. म्हणजे जेवढी बचत खाती तेवढी ‘चेकबुक’ व तेवढ्या ‘चेकबुक’वर तेव्हा तेव्हा ‘जीएसटी’ भरावा लागणार. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ प्रत्येक बचत खात्यावर खाते वापरल्याबद्दल ठरावीक रक्कम खात्यातून देखभाल खर्च म्हणून ‘डेबिट’ करते. असे खातेदारांना सातत्याने बरेच शुल्क भरत राहावे लागते. म्हणून बचत खात्यांचा उगाच फाफटपसारा वाढवू नका. किमान बचत खाती ठेवून आदर्श आर्थिक व्यवहार करा. मध्यंतरी भारत सरकारनेही जनतेला विनाकारण बचत खात्यांची संख्या वाढवू नका, असे योग्य आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद द्या व तुमचे पैसे वाचवा!
 
 
Powered By Sangraha 9.0