कर्णबधिरांची माय - माया कुलकर्णी

28 Jul 2022 09:48:22
 
mansa
 
 
 
साक्षरतेचे धडे देऊन कर्णबधिरांना सक्षम करणार्‍या समाजसेवी शिक्षिका माया कुलकर्णी यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
राष्ट्रनिर्माणाचे काम शिक्षक करीत असले तरी, मळलेली वाट न चोखाळता हस्तसंवादाची भाषा शिकून गेली २५ वर्षे कर्णबधिरांना साक्षर करण्याची किमया साधणार्‍या शिक्षिका माया कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या माया लक्ष्मण वैद्य) यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे आजोबा रामचंद्र नारायण म्हाळगी हे जनसेवा संघाचे संस्थापक व कामगार शिक्षणाचे प्रणेते असल्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे बालपणापासूनच माया यांना सामाजिक कार्याची ओळख झाली. घरात अनेक मोठ्या नावाजलेल्या राजकारणी व्यक्तींची कायम ऊठबस असे. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे आचरण असणारे आई-वडिलांनीही मेहनतीचे, प्रामाणिकपणाचे धडे दिल्याचे त्या सांगतात.
 
 
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, माया यांचे माध्यमिक शिक्षण गिरगावातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डीजीटी हायस्कूलमध्ये झाले. वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर तत्सम क्षेत्रातील सेवा करण्याचे वा समाजाला उपयोगी अशा नर्सिंग कोर्स करून समाजसेवा करण्याचे ठरवले होते. मात्र, रुग्णसेवा हातून घडली नसली तरी याच निर्धारातून कर्णबधिरांचे ‘बीएड’ करून विशेष शिक्षणातील पदवी प्राप्त केली आणि माया कर्णबधिरांच्या ’माय’ बनल्या. या शिक्षकी पेशात काम करताना येणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पती संजय कुलकर्णी व त्यांच्या दोन्ही मुलांचे कायमच सहकार्य मिळाल्याचे माया सांगतात.
 
 
लहानपणापासून वडिलांनी वाचनाची लावलेली आवड आजही कायम असून विशेषतः अध्यात्मिक विचार असल्याने देवपूजेतही त्यांची श्रद्धा आहे. बॅडमिंटन खेळाची आवड असून किचन गार्डनिंगचे अनेक प्रयोग त्या करत असतात. शिक्षकी पेशा आणि वाचन असल्याने माया स्फुटलेखन व हलकेफुलके काव्यलेखनही करतात.
 
 
माया कुलकर्णी मुलुंड येथे स्थायिक असल्या तरी, शिक्षिका म्हणून ठाण्यातील कमलिनी कर्णबधिर विद्यालयामध्ये १९९८ सालापासून कार्यरत आहेत. सुरुवातीपासूनच जीवनात काहीतरी वेगळं करायचं, हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला. आजूबाजूला बहिरेपणा असणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात येणार्‍या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी माया यांनी कर्णबधिरांना शिकवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात गुरू विजूताई भागवत व संस्था पदाधिकारी व शाळेतील सहकार्‍यामुळे समाजातील अशा विशेष विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड वाढत गेली. त्यामुळे, शिक्षिका ते मुख्याध्यापिका इथपर्यंत मजल मारल्याचे त्या सांगतात.
 
 
‘भारतीय स्त्री जीवन विकास परिषदे’द्वारे ठाणे पूर्वेत चालवल्या जाणार्‍या कमलिनी कर्णबधिर विद्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्‍या माया कुलकर्णी विद्यार्थ्यांची काळजी पालकांप्रमाणेच घेतात. या विशेष शाळेत सध्या 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शीघ्र निदान व उपचार केंद्रातून लहान वयोगटातील विद्यार्थ्यांची कानाची तपासणी, पालकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ सर्जरीसाठी योग्य मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र उपलब्ध करून देणे, वाचा व श्रवण थेरपी प्राप्त करून देणे, समावेशित विद्यार्थ्यांना सपोर्ट सिस्टीम देणे, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पुरवणे, असे प्रयत्न करण्यात माया यांचा कायमच पुढाकार असतो.
 
 
या विद्यालयात मुख्याध्यापिका झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अनेक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने दुचाकी मेकॅनिक कोर्स, फोटोग्राफी कोर्स, ब्युटीपार्लर कोर्स, मेंदी कोर्स, फॅब्रिक पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, वारली चित्रकला सादरीकरण अशा अनेक व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यातही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.
 
 
समाजसेवी वृत्तीच्या माया मितभाषी असल्या तरी विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल भिवंडी ग्रुप, तसेच ‘रोटरी क्लब’तर्फे ‘आदर्श शिक्षिका’, ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. ‘मीरा मेहता इनरव्हील क्लब ऑफ मुंबई’तर्फे नुकताच पुरस्कार मिळाला आहे. ‘एफएम’ वाहिनीवर कर्णबधिरांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर २०१९ मध्ये त्यांची मुलाखत झाली.
 
 
माया यांना कर्णबधिर मुलांसाठी भविष्यात खूप काही करायचं आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांना विशेष शाळेबरोबरच सामान्य शाळेत शिकवण्याची संधी वाढवण्यासाठी पालकांना तयार करणं, कर्णबधिरांच्या वाचन-लेखनातील प्रगतीसाठी प्रयत्न करणे, याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्या सांगतात. नवीन पिढीला संदेश देताना, येणार्‍या प्रत्येक आव्हानांना मिळालेली संधी समजून नवीन पिढीने सामोरे जावे. मेहनत व प्रामाणिकपणाच व्यक्तीला पूर्णत्व देतो, असे त्या सांगतात. अशा या समाजसेवी शिक्षिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0