मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी 'एमरजन्सी'मधील तिचा लूक बघून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कंगनाची विचारसरणी बघता या चित्रपटात ती स्वतः भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे, हे बघून तिच्या चाहत्यांमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. 'आणीबाणी' ही देशात घडलेली अतिशय महत्त्वाची राजकीय घटना होती, या निमित्ताने ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत आहे. शिवाय कंगना स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा कारणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटात इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटातबाबत नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली.
कंगना रणौतचा लूक बघून चाहत्यांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला, त्यांनंतर काही दिवसातच अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. त्यातच महत्त्वाची भूमिका असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकरणार हा प्रश्न प्रेक्षक विचारात होते, याचेही उत्तर आता मिळाले आहे. ही भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकरणार आहे.
कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे, यात श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या पोस्टला कंगनाने 'एक सच्चा राष्ट्रवादी.. ज्यांचे देशावर अमाप प्रेम आणि अतुलनीय अभिमान होता. आणीबाणीच्या काळात घडलेला एक तरुण नेता..' असे कॅप्शन दिले आहे.
तर अभिनेता श्रेयस तळपदे यानेही पोस्ट शेअर केली आहे. 'बाधाएं आती हैं आएं.. घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।' अशी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता त्याने शेअर केली आहे. शिवाय तो म्हणतो, 'एका खऱ्या राष्ट्रभक्ताची 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मला आशा आहे की तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन' असेही तो म्हणाला आहे.