जुहू किनाऱ्यावर वाहून आला 'पोर्पोईझ'चा मृतदेह

26 Jul 2022 12:30:53
porpoise
 
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर हॉटेल नोवोटेल जवळ रविवारी दि. २४ जुलै रोजी 'इंडो पॅसिफिक फिनलेस पोर्पॉइस'चा मृतदेह वाहून आला. जुहू किनाऱ्यावर तेल/डांबराचे गोळे देखील आढळून आले आहेत. वन विभागाने हा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पावसाळ्यात हवा वाहण्याच्या दिशेत बदल झाल्यामुळे, अनेक समुद्री जीव वाहून येण्याच्या घटना घडतात.
 
या घटनेची माहिती मिळताच 'मॅंग्रोव्ह सेल'चे कर्मचारी आणि 'मरीन  रीस्पोॅंडंटस'चे सदस्य घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह ताब्यात घेऊन, पुढील पशुवैदकीय तपासणी साठी डॉ नेहा शहा यांच्याकडे नेण्यात आला. अद्याप मृत्यूचे कारण कळू शकलेले नाही, अहवाल यायला दोन ते तीन दिवस लागतील असे कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. किनाऱ्यालगतचे मोसमी वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे अनेक समुद्री प्राणी किनाऱ्यावर वाहून येतात. गेल्या आठवड्यात ब्लू बॉटल म्हणजेच 'पोर्तुगीज मॅन ओ' वॉर' जुहू किनाऱ्यावर वाहून आले होते.
पोर्पॉइस बद्दल:
इंडो पॅसिफिक फिनलेस पोर्पॉइस हे आशियाई समुद्रात आढळून येणारे सस्तन समुद्री प्राणी आहेत. त्यांच्या अधिवासात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे खाद्य खातात. यामध्ये मासे, क्रस्टेशियन्स आणि 'सेफॅलोपॉड्स' यांचा समावेश आहे. ते भारतालगत असलेल्या समुद्रात मासे, कोळंबी आणि स्क्विड खात असल्याची नोंद आहे. त्यांच्या आहारातील हंगामी बदलांचा अभ्यास अद्याप  झालेला नाही.
Powered By Sangraha 9.0