कलाउपासक रोहित

24 Jul 2022 20:13:26
 
rohit
 
 
एखादी नवी कल्पना वा विचार घेऊन चित्र काढणार्‍या व पर्यावरण रक्षणासाठी सजगतेने काम करणार्‍या चित्रकार रोहित खेडकरविषयी जाणून घेऊया...
 
मानवी सजर्नशीलतेचा आविष्कार ज्यातून दिसून येतो तो कलाप्रकार म्हणजे चित्रकला. घरात चित्रकलेचा कोणताही वारसा नसतानाही डोंबिवलीतील रोहित खेडकर अगदी लहानपासून चित्रे रेखाटत असे. वयानुसार ती चित्रे ओबडधोबड असली, तरी त्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेऊन चित्रकलेच्या क्षेत्रातही आपला एक वेगळा असा ठसा उमटविला आहे. रोहितच्या या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊया.
रोहितचा जन्म डोंबिवलीत झाला. त्याचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिरात झाले. रोहित अगदी लहान असल्यापासून चित्रे रेखाटत असे. त्याचा हा गुण त्याच्या आई-वडिलांनी हेरला होता. त्यामुळे त्यांनी डोंबिवलीतील कलाशिक्षक उन्मेष इनामदार यांच्याकडे रोहितला शास्त्रोक्त शिक्षणासाठी पाठविण्यास सुरुवात केली. रोहितला आपण केव्हा पहिले चित्र काढले, हे आता आठवतदेखील नाही. रोहितची आई शिल्पा ही ‘क्लासिकल संगीत’ गायिका आहे. त्यामुळे त्याच्या घरात अगदी कोणी चित्रे काढत नसले, तरी कलेचे वातावरण पूर्वीपासूनच होते. त्याची आई ‘क्लासिकल’चे क्लासदेखील घेत होती. त्याचे बाबा विनय हे बँकेत नोकरी करीत आहे. रोहित हा त्यांना एकलुता एक मुलगा असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबात त्याची जडणघडण झाली असली, तरी त्याला शिक्षणासाठी कधीही कोणताही संघर्ष करावा लागला नाही. तसेच घरात कलेचे वातावरण असल्याने त्याच्या चित्रकलेच्या छंदालाही घरातून कधी विरोध झाला नाही. दहावी झाल्यानंतर चित्रकलेतच पुढील शिक्षण घेण्याचा रोहितचा मानस होता. त्यामुळे त्याने ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी त्याने ‘अप्लाईड आर्ट’चे प्रशिक्षण घेतले. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. हळूहळू त्याची चित्रकला फुलत होती. पण “आपण जे कोणी आहे ते आपल्या उन्मेष इनामदार यांच्यामुळेच,” असे रोहित प्रांजळपणे सांगतो. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून तो इनामदार यांच्याकडे क्लाससाठी जात होते. त्यामुळे रोहितच्या चित्रकलेला खरा आकार देण्याचे काम उन्मेष इनामदार यांनी केले आहे.
 
रोहित सध्या जाहिरात एजन्सीमध्ये नोकरीदेखील करीत आहे. २०१८ पासून उदरनिर्वाहासाठी तो ही नोकरी करीत आहे. कोरोना काळात त्याचे कामदेखील ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने सुरू होते. नोकरी करून मिळणार्‍या वेळेत तो आपली कला जोपासत आहे. साधारणपणे दररोज एखादे ‘पेन्टिंग’ काढून होते. मात्र, ‘कॅनव्हास’वर ‘पेन्टिंग’ करायचा विचार केल्यास किती वेळ जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कधी कधी ‘कॅनव्हास’वर चित्र काढण्यासाठी एक महिनाही लागत असल्याचे रोहित सांगतो. रोहितचा कल एखादी ‘आयडिया’ घेऊन किंवा ‘थॉट’ घेऊन चित्र काढण्याकडे जास्त आहे. सामाजिक विषयांकडेही रोहित जास्तीत जास्त ‘फोकस’ होतील, अशा प्रकारची चित्रे रेखाटत असतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशांत प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात आहे. या क्षेत्रात गंगाराम तांबट, गोपाळ देऊसकर, मिलिंद मुळीक, वासुदेव कामत यासारख्या अनेक दिग्गजांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. मात्र, आपण अजूनही इतके मोठे झालेलो नाही, असे रोहितला वाटते. त्यामुळे आजपर्यंत त्याने कधीही आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविलेले नाही. लहान असताना आई त्याला काही स्पर्धांना घेऊन जायची. पण एके दिवशी आपल्या चित्रांचेदेखील प्रदर्शन भरविता येईल इतके काम करायचे आहे, असा रोहितचा मानस आहे.
रोहितला एक कलाकार म्हणून जो संघर्ष करावा लागणार होता, तो करावा लागलाच. पण मला जे आवडते तेच मी करतो. एखादी ‘आयडिया’ डोक्यात आली की, आपण लगेचच ती कागदावर उतरवितो. चित्रकलेतील कोणता असा प्रकार आवडतो, असे रोहितला विचारले असता, त्याने प्रत्येक कलेचा प्रकार आपल्याला काही ना काही शिकवून जातो, असे सांगितले. अतिवास्तववादी अशी चित्रकला त्याला खूप आवडते. रोहित हा ‘फिल्म मेकिंग’चेदेखील काम करतो. रोहितने ‘फादर डे’ नावाची एक फिल्म तयार केली आहे. तसेच ‘रेडिओ सिटी’साठी त्याने मुंबईतील ट्रेनमधील आयुष्य कसे असते, यावर आधारित ‘मुंबई ट्रेन’ नावाची फिल्म बनविली आहे. या दोन्ही फिल्मसाठी रोहितला पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
रोहित आपण ज्या वस्तू वापरतो, त्यामुळे पर्यावरणाला काही धोका तर पोहोचत नाही ना याचादेखील विचार करतो. त्यामुळेच तो आपले सगळे काम सांभाळून बांबूच्या कापडापासून शर्ट तयार करण्याचे काम करतो. हे काम तो स्वत: करतो आणि तोदेखील हेच शर्ट वापरतो. आपण जे सर्वसाधरणत: कपडे वापरतो ते तयार करताना ९० टक्के जलप्रदूषण होते. त्यामुळे आपण वापरात असलेल्या वस्तूचा निसर्गावर काय परिणाम होतो, याचादेखील विचार करण्याची गरज असल्याचे रोहित सांगतो. प्लास्टिकचा वापरदेखील नागरिकांनी स्वत: हून बंद करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. अशा या हरहुन्नरी कलाकाराला दै. ‘मुंबई तरूण भारत’कड़ून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0