कल्याण-मुरबाड रेल्वेच्या कामाला सप्टेंबरअखेर होणार सुरुवात

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे राज्यमंत्री कपिल पाटील यांना आश्वासन

    22-Jul-2022
Total Views |

murbad
 
 
मुरबाड: “कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल,”असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना नुकतेच दिले. “या प्रकल्पाच्या निविदा मंजूर करण्याची कार्यवाही वेगाने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच, हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे,” असे उद्गारही वैष्णव यांनी काढले.
 
 
तब्बल सात दशकांपासून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची प्रतीक्षा केली जात होती. मात्र, २०१४ मध्ये खासदारपदी निवडून आल्यानंतर कपिल पाटील यांनी सातत्याने मुरबाडपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. या प्रकल्पाने शेतकर्‍यांबरोबरच रेल्वेलाही मोठा फायदा होणार असल्याकडे लक्ष वेधले होते. अखेर या प्रयत्नांना यश येऊन २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचीघोषणा केली होती. त्यानंतर रेल्वेकडून विविध पर्याय तपासून पाहण्यात आले.
 
 
सुरुवातीला उल्हानगर, त्यानंतर टिटवाळामार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे नेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अखेर कल्याण-आंबिवली-मुरबाड असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला. या प्रकल्पाचे काम वेगाने होण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. त्याला फडणवीस यांनी तत्काळ मान्यता दिली. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला तातडीने हमी दिली गेली नाही. काही महिन्यांपूर्वी हमीचे पत्र पाठविण्यात आले. मात्र, त्यात काही अटींचा समावेश करण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेला गती आली नव्हती.
 
 
राज्यात सत्तापालट होताच, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. ११ जुलै रोजी मुरबाड रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के वाटा उचलण्याची हमी महाविकास आघाडीकडून दिली गेली नसल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली करून दुसर्‍या दिवशीच रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे नव्या भाजप-शिवसेनेच्या राजवटीत कल्याण-मुरबाड रेल्वेला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीतील रेल भवन येथे नुकतीच भेट घेतली. तसेच रेल्वे मंत्रालयाला पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. तसेच, या रेल्वे मार्गाबाबत तत्काळ कार्यवाही करून रेल्वे विभागाच्या सर्व विभागीय तरतुदी पूर्ण करून, येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे आश्वासन दिले.
 
 
दरम्यान, कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावर कल्याण, शहाड, आंबिवली, कांबा रोड, आपटी, मामनोली, पोटगाव, मुरबाड ही नियोजित स्थानके असणार आहेत.
  
रेल्वेमंत्र्यांकडेच मान्यतेचा अधिकार!
रेल्वे प्रकल्पांच्या मान्यतेसाठी तांत्रिक मुद्द्यांबरोबरच विविध मान्यतांमुळे जादा कालावधी लागण्याची शक्यता असते. मात्र, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प हा एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीचा असल्याने त्याला मान्यता देण्याचा अधिकार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. ते या प्रकल्पासाठी अनुकूल असल्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा आहे.सध्याच्या रेल्वेच्या नियमावलीनुसार, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक समितीद्वारे मूल्यमापन होईल. त्यानंतर वित्तीय समितीच्या सदस्यांद्वारे तत्वतः मान्यता दिली जाईल.
 
 
मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली ८५७ कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीति आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीति आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर २१ दिवसांत रेल्वेच्या विस्तारीत बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजुरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीति आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला रेल्वेमंत्री मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.