मी या देशाला देव मानते’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

22 Jul 2022 21:04:38
President Draupadi Murmu
 
 
‘मी या देशाला देव मानते’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्रौपदी मुर्मू यांचा विजय हा संविधानाचा विजय आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा विजय आहे, संविधानाच्या सहभागिता, राजकीय न्याय आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचा विजय आहे. भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य या विजयाने अधोरेखित झाले आहे.
 
 
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून देशाने निवड केली. ही निवड झाल्यानंतर केवळ भाजपच्या गोटात आनंद साजरा केला जात नसून या निवडीचा सर्व समाजाला आनंद झालेला आहे. जर आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची संपादकीय वाचली, तर या आनंदाचा अनुभव आपल्याला येईल. निवडून आलेल्या व्यक्तीचे अभिनंदन करायचे असते, हा झाला शिष्टाचार. परंतु, हा विषय सामान्य शिष्टाचारापुरता मर्यादित नाही.
 
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि आपल्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर आपल्या देशात अनेक सकारात्मक भावना निर्माण झाल्या. त्यातील एक भावना अनुसूचित जातीजमातीत राहणारे आपले बांधव हे आपले रक्ताचे बांधव आहेत आणि त्यांच्या विकासासाठी, सन्मानासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात या भावनेचा अनुभव पदोपदी येतो. ‘सेवा विवेक’चे भालिवली परिसरात वनवासी भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाचे जे काम चालते, त्यातही हा अनुभव पावलोपावली येतो. एकराष्ट्रीयत्व बलशाली करण्याच्या वाटेवर आपण खूप पुढे आलो आहोत, असा याचा अर्थ होतो. द्रौपदी मुर्मू यांचा विजय यासाठी देशाच्या दृष्टीने आनंदोत्सवाचा विषय झाला आहे.
 
 
द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास खडतर आहे. कष्टाने त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण क्षेत्रात नोकरी केली. आमदार झाल्या. मंत्री झाल्या. नंतर झारखंडच्या राज्यपाल झाल्या. त्यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जेव्हा निवड झाली, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला. नरेंद्र मोदी यांनी आपली राष्ट्रपतीपदासाठी निवड झाल्याबद्दल सांगितले, तेव्हा त्या म्हणाल्या,“मी ही जबाबदारी कशी पेलणार? आजवर पक्षाने जी कामगिरी दिली, ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जबाबदारी फार मोठी आहे. मी या देशाला देव मानते. त्यामुळे अजूनही जे शक्य आहे ते नक्कीच करीन. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला इतका मोठा मान देणे ही खर्‍या अर्थाने लोकशाही आहे.”
 
 
द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली. ते निवडून येण्याची शक्यता नव्हती. राष्ट्रपतीपदासाठी जो मतदारसंघ असतो, त्यात विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असतात. या सदस्यांचे बहुमत भाजपच्या बाजूनेच होते. आपण निवडून येणार नाही, हे यशवंत सिन्हा यांना माहीत होते. तथापि संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला भूमिका बजावावी लागते. सत्ताधारी पक्षाविरुद्ध त्यांना भूमिका घ्यावीच लागते. लोकांचे राजकीय प्रशिक्षण करण्याचा संसदीय लोकशाहीतील तो एक चांगला उपाय असतो. यशवंत सिन्हा यांनी उमेदवार म्हणून येणारे अपयश स्वीकारण्याची जबाबदारी घेतली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण, जाता जाता एक गोष्ट सांगितली पाहिजे, ती म्हणजे विरोधी पक्षाने योग्य उमेदवाराची निवड केली नाही.
 
 
 
 
यशवंत सिन्हा हे बिनबुडाचे राजनेते आहेत. पदासाठी वेगवेगळ्या पक्षात फिरत राहणे हा त्यांचा राजकीय व्यवसाय आहे. एकेकाळी ते भाजपमध्ये होते, केंद्रीय मंत्रीदेखील होते. पण, जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, खासदारकी मिळत नाही, मंत्रिपदाची कसलीही आशा नाही तेव्हा त्यांनी पक्ष सोडला. आता पराभूत झाल्यावर शिष्टाचाराप्रमाणे आपला पराजय स्वीकारून द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. हे अभिनंदन करीत असताना त्यांनी भाजपवर टीकाही केली. भाजप विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याचा खेळ करीत आहे, राजकारणात फार मोठा भ्रष्टाचार सुरू झालेला आहे.
 
 
 
ध्रुवीकरणाच्या राजकारणाने भारताच्या लोकशाहीला आणि सांप्रदायिक सद्भावाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, 15वे राष्ट्रपती कोणताही पक्षपात न करता राज्यघटनेच्या संरक्षकाचे काम करतील. हीच अपेक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “राष्ट्राचे प्रमुख या नात्याने द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या आदर्शाची रक्षा केली पाहिजे आणि लोकशाहीचे संरक्षण केले पाहिजे.”
 
 
 
यशवंत सिन्हा आणि ममता बॅनर्जी या दोघांना एक प्रश्न जर विचारला की, संविधानाचे आदर्श आणि लोकशाहीचे संरक्षण तुम्ही किती केले आणि करीत आहात? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भयानकरितीने मुस्लीम सांप्रदायिकता वाढविली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या राजवटीत अनेक भाजप कार्यकर्त्यांचे निघृण खून झालेले आहेत. भयानक दंगे झाले आहेत. ज्यात हिंदू होरपळून निघाले आहेत. सांप्रदायिकतेची आग लावणार्‍या ममतादीदींना तेव्हा राज्यघटना आठवत नाही का? यशवंत सिन्हा यांचा प्रवास खासदारकी आणि पदे देणार्‍या पक्षात चालू असतात, ते राज्यघटनेच्या कोणत्या कलमांचे पालन करीत आहेत? आपल्या राज्यघटनेत पक्षबदलाचे कोणतेही कलम नाही. भाजपमध्ये असताना त्यांना कधी लोकशाही धोक्यात आल्याचा साक्षात्कार झाला नाही. हे रडणे म्हणजे ढोंगी आणि स्वार्थी माणसाचे रडणे आहे.
 
 
 
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 2024 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ताच्युत करण्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र आले पाहिजे, याची चर्चा ममतादीदी, यशवंत सिन्हा, शरद पवार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, इत्यादी राजकीय नेतेमंडळी करीत असतात. आणि काँग्रेसचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षाने एकत्र यावे असा असतो. विरोधी पक्ष एकत्र आहेत, हे भारताला दाखविण्यासाठी वर्षांतून एखाद-दुसर्‍यावेळी हे नेते एका व्यासपीठावर येतात, एकजुटीचा हात हातात घेऊन फोटोसेशन होते आणि विरोधकांची एकजूट झाली असा डंका मारला जातो.
 
 
 
हे किती फसवं असतं, याचा प्रत्यय राष्ट्रपती निवडणुकीत आला. मतदानात विरोधी पक्षातील 17 खासदार आणि 126 आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मते दिली. याचा अर्थ असा झाला की, नेत्यांचा आदेश पक्षातील खासदार आणि आमदारही पाळीत नाहीत. दुसर्‍या भाषेत शिवसेनेचा राष्ट्रीय ट्रेझर झाला. उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी जाहीर करून टाकले की, त्यांचा पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहील. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत देणार नाही. आपण म्हणू या विरोधीऐक्य जिंदाबाद!
 
 
 
द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा संविधानाचा विजय आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा विजय आहे, संविधानाच्या सहभागिता, राजकीय न्याय आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचा विजय आहे. भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य या विजयाने अधोरेखित झाले आहे. द्रौपदी मुर्मू यांचा विजय हे सांगतो की, तुमचा जन्म कोठे झाला, कोणत्या जातीत झाला, कोणत्या घराण्यात झाला, कोणत्या धर्मात झाला, याला काहीही महत्त्व नाही. महत्त्व तुमच्या कर्तृत्वाला आहे, गुणवत्तेला आहे, तुमच्या देश समर्पणाला आहे, तुमच्या धैर्यशीलतेला आहे.
 
 
 
द्रौपदी मुर्मू यांच्या पतीचे निधन झाले. दोन मुलांचे निधन झाले. पण, त्या खचल्या नाहीत. देशसेवेचे आणि समाजसेवेचे सतीचे वाण त्यांनी सोडले नाही. त्यांचे नाव द्रौपदी आहे. द्रौपदी आणि सीता या भारताच्या दोन सर्वश्रेष्ठ नारी झाल्या. द्रौपदी हे नाव धारण करणे त्यामानाने सोपे आहे. मात्र, द्रौपदीसारखे जगणे महाकठीण आहे. द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास महाभारतातील द्रौपदीच्या अलौकिक गुणांचे स्मरण करून देणारा आहे. त्यांच्या कार्यकाळासाठी शत शत शुभेच्छा.
 
Powered By Sangraha 9.0