जुहू चौपाटीवर वाहून आले 'पोर्तुगीज मॅन ओ' वॉर'

21 Jul 2022 20:12:04
Jellyfish3
 
 
 
 
 
मुंबई(उमंग काळे): मुंबईच्या जुहू चौपाटीवर पोर्तुगीज मॅन ओ' वॉर हा जेलीफिश सदृश समुद्री प्राणी आढळून आला आहे. पावसाळ्यात हे जीव किनाऱ्यावर वाहून येतात. निळी झालर असलेल्या एका हवा भरलेल्या पिशवी सारखे ते दिसतात. यांच्या धाग्या सारख्या संस्पर्शकाचा दंश झाल्यावर तीव्र वेदना होतात. 'मरीन लाईफ ऑफ मुंबई'चे प्रदीप पाताडे यांनी हा प्राणी आपल्या कॅमेरातून टिपला. गेल्या २-३ दिवसात अजूनही काही नमुने वाहून आल्याचे ड्युटीवर असलेल्या लाईफगार्डने सांगितले. 
 
 

Jellyfish 
 (छायाचित्रे: मरीन लाईफ ऑफ मुंबई टीम)
 
पोर्तुगीज मॅन ओ' वॉर (फिसालिया फिसालिस), या प्राण्याला मॅन-ऑफ-वॉर किंवा ब्लू बॉटल असेही म्हणतात. हे प्राणी जेलीफिशसारखे दिसतात, परंतु ते 'सिफोनोफोर' कुळातील आहेत. हे प्राणी मुख्यत्वे वारा आणि पाण्याच्या प्रवाहांवर अवलंबून असतात, परंतु ते आपल्या पिशवी सदृश अवव्यावातून हवा कमी जास्त करू शकतात. त्यांच्या 'टेंटॅकल्स' (स्पर्शज्ञान होण्याचे अवयव) पेशींमध्ये विषारी द्रव्य असते. ज्याचा दंश झाल्यावर, माणसाला तीव्र वेदना होतात. या दंशाचा वापर हे शिकारीसाठी करतात.
 
 
Jellyfish1
 
 
 
हे प्राणी जुहू बीच वर वाहून आले आहेत. तसेच इतर चौपाट्यांवर वाहून येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टमुळे, मुंबईतील बहुंतांश चौपाट्यांवर सकाळच्या ठराविक वेळेनंतर प्रवेश बंद आहे. परंतु, तरी या वेळेत जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0