ग्राऊंड झिरोच्या दणक्याने मुंबईकरांचे ७ कोटी वाचले!
20 Jul 2022 15:31:20
मुंबई : दादरच्या सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेल्या विविध कामांवरून रंगलेल्या वादाला आता नवीन वळण लागले आहे. शिवाजी पार्कवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोट्यवधींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. मात्र, कंत्राटाला मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटातील काही त्रुटींवर आणि नमूद करण्यात आलेल्या काही गोष्टींवर बोट ठेवत स्थानिक दादरकर रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवत या कामाला विरोध करायला सुरुवात केली होती.
तसेच, या संदर्भात स्थानिकांनी वारंवार मांडलेली भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मांडली होती. दरम्यान, स्थानिक रहिवासी आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या लढ्याला यश आले असून प्रशासनाकडून अखेर शिवाजी पार्कवरील कामाशी संबंधित असलेले हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाच्या निर्णयावर स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून याप्रकरणी पाठपुरावा केल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले आहेत.
बालहट्टामुळे होणारी उधळपट्टी वाचल्याचा आनंद
शिवाजी पार्कवरील धुळीचा त्रास आणि त्यातून निर्माण होणार्या इतर समस्यांमुळे स्थानिक रहिवासी दादरकर हैराण झाले होते. लहान मुलांना आणि विशेषतः ज्येष्ठांना याचा अधिक त्रास होत होता. प्रशासनातील या विभागाचे तत्कालीन अधिकार्यांवर असलेल्या दबावामुळे आणि बालहट्टामुळे कोट्यवधींची अक्षरशः उधळपट्टी होत होती. आमच्यावतीने संबंधित कंत्राटदारावर नोंदविण्यात आलेले आक्षेपदेखील प्रशासनाने मान्य केले असून, पुढील कामासाठी काढण्यात आलेले तीन कोटींचे नवे कंत्राटसुद्धा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंची भूमिका आणि बालहट्टामुळे होणारी उधळपट्टी वाचल्याचा स्थानिक मुंबईकर म्हणून आम्हाला अतीव आनंद आहे. असे स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे, यांनी यावेळी म्हंटले.