वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...
'रम्य ते बालपण किंवा बालपणीचा काळ सुखाचा’ असे साधारणतः आयुष्याच्या प्रारंभीकाळाचे वर्णन केले जाते. आपल्या बालपणाविषयी मात्र असे म्हणता येणार नाही, असे अनिल बागुल सांगतात. कठीण काळात एकेकाळी अगदी घरोघरी जाऊन पेपर वाटप करणारा हा मुलगा मग पुढे ‘फॅशन’ व ‘इंटिरिअर डिझायनिंग’मधली मानाची समजली जाणारी एक संस्था उभारतो आणि यशस्वीपणे ती पुढेदेखील नेतो. असा हा प्रवास आहे नाशिकच्या अनिल बागुल यांचा...
लहानपणी पाहिलेल्या खडतर काळात आईने अनिल व त्यांच्या भावांना जिद्दीने आणि कष्टाने वाढवले. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आयुष्य आपली परीक्षा पाहते. आपण मात्र कायम सकारात्मकतेने पुढे जायचे असते, हे आपण आपल्या आईकडून व रा. स्व. संघाच्या शाखेतील शिस्तीमुळे शिकलो, असे ते आवर्जून सांगतात. कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये प्राथमिक शिक्षण घेणार्या अनिल यांनी इयत्ता सातवीत ‘स्कॉलरशिप’ मिळवली, दहावीत भरघोस यश संपादन केले. पेपर वाटप करताना त्यांना वाचनाची गोडी, तर लागलीच. परंतु, अग्रलेख वाचताना त्यांची वैचारिक घडणदेखील होत गेली. ‘व्हीजेटीआय’ या संस्थेतून अनिल यांनी ‘टेक्स्टाईल इंजिनिअरिंग’ पूर्ण केले व पुढे ‘बीकॉम’ व ‘एमबीए’देखील केले. त्यांच्या क्षेत्रात सुरुवातीला ‘रेमंड्स’, ‘हिंदुस्थान स्पिनिंग मिल्स’, ‘नॅशनल रेऑन कॉर्पोरेशन’ अशा ठिकाणी नोकरी करत त्यांनी अनुभव घेतला.
एका नोकरीच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये आले आणि पक्के नाशिककर झाले. इथेच पुढे त्यांचा विवाहदेखील झाला. उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे म्हणून शिक्षण घेण्याकडे साधारणतः अनेकांचा कल दिसतो. सभोवताली मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये वाढताना दिसतात अशा वेळेस आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करत विद्यार्थ्यांसाठी नवीन क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी निर्माण करता यायला हवी, असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. मुलतः असणारी ‘डिझायनिंग’, ‘फॅब्रिक्स’, ‘टेक्स्टाईल’ची आवड यातून मुहूर्तमेढ रोवली गेली ती ‘डीआयडीटी’ या ‘फॅशन’ व ‘इंटिरिअर डिझायनिंग’ या संस्थेची. सकाळी १० ते ६ नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा पण वेगळेपण राखून हे त्यांनी ठाम ठरवले होते. ‘फॅशन डिझायनिंग’ म्हणजे केवळ ‘टेलरिंग’ नव्हे, घर-ऑफिसेसमध्ये उत्तम तसेच विचारपूर्वक केलेल्या सजावटीमुळे तिथले वास्तव्य अधिक सुखकर होत कार्यक्षमतेत वाढ होते, हे विचार रुजवण्यासाठी २००६ मध्ये संस्था उभी राहिली. विद्यार्थ्यांसाठी एका नव्या क्षेत्रामध्ये आपल्यातील कलेला वाव देणारी नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास आपल्या मनामध्ये होता, असे अनिल सांगतात.
संस्थेची उत्तमरित्या सुरुवात झाली तरीही सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. संस्थेतर्फे होणारे ‘फॅशन शो’चे आयोजन, संस्थेतून नोकरी करणारी, स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारणारी काही उदाहरणे निर्माण झाली तिथून पुढे विद्यार्थ्यांनी संस्थेला आपलेसे केले. लवकरच पुण्या-मुंबईचा दबदबा असणार्या क्षेत्रात नाशिकचे नाव नव्याने येऊ लागले. शहराचा विस्तार होत आहे. बांधकाम क्षेत्रातही नवनवे प्रोजेक्ट्स सातत्याने उभे राहत आहेत. ‘इंटिरिअर’ची आवश्यकता पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढू लागली. अशावेळी ‘डीआयडीटी’ने कायमच बदल स्वीकारण्याची तयारी ठेवलेली असल्याचे ते सांगतात. आज नाशिकमध्ये मालिकांचे चित्रीकरण होऊ लागलेले आहे. अशावेळी ‘कॉस्च्युम डिझायनर’ हा एक महत्त्वाचा घटक ठरतो.
‘’स्पर्धा वाढती असली तरी महत्त्वाची असते. त्यातूनच आपण नवनवीन प्रयोग करत व स्वीकारत असतो. ध्येयाप्रती सच्चा निष्ठेने आणि कठोर परिश्रमांनी कालसुसंगत वर्तन केल्यास यशप्राप्ती सुकर होते,” असे अनिल सांगतात. आपल्या आवडीनिवडी व छंदांनादेखील आपणच सजगपणे वेळ द्यायचा असतो, असे त्यांना वाटते. लहानपणी वृत्तपत्र वाचनाबरोबरीनेच वाचनालयात जाऊनही अनिल यांचे वाचन सुरू होते. त्यातूनच आपण लेखनही करावे, अशी उर्मी दाटून येऊ लागली. आयुष्याची, करिअरची सुरुवात, मुंबईत नोकरी निमित्ताने होणारा प्रवास यातून लेखनाची आवड पुढे जाऊ शकली नसली तरी आज मात्र त्यांचा स्वतःचा ‘ब्लॉग’ आहे. वृत्तपत्रांमधून सदर लेखन, ‘सायबर’ सुरक्षा या विषयावरील लेखन, तसेच त्यांचे एक पुस्तकदेखील प्रकाशित झालेले आहे.
विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. संस्थेची उभारणी एक वेळ सोपी पण दर्जा राखणे, नवनवीन शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे, नवनवीन कोर्सेसची आखणी करणे अनिल यांना महत्त्वाचे वाटते. आयुष्याचे जरदारी वस्त्र विणताना सुखदुःखाच्याधाग्यांची सांगड होणारच असली तरी कलाकुसर आपल्या हातात असते, असा विश्वास अनिल बागुल यांना वाटतो.