बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली. घरांची तोडफोड करण्यात आली. एकूणच जहाल धर्मांधांना ज्या देशामध्ये राजरोस मोकळीक दिली जाते आणि त्या देशातील अल्पसंख्य हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांना सातत्याने त्यांच्या रोषास बळी पडावे लागते. तेथील सरकारेही आंतरराष्ट्रीय दबाब आला की, काही तरी केल्याचे दाखवत असतात. त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न!’
बांगलादेशमधील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवर जे हल्ले होत आहेत, त्याचा तीव्र शब्दात निषेध केला असला तरी इस्लामचा अवमान झाल्याचे निमित्त करून हिंदू समाजास लक्ष्य करण्याचे प्रकार त्या देशात सातत्याने घडत आहेत. मानवाधिकार आयोगाने त्या घटनांचा निषेध केला असला तरी आपल्याच देशातील अल्पसंख्य समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले तेथील सरकार काय करते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने, बांगलादेशसारख्या ‘धर्मनिरपेक्ष’ देशामध्ये जातीय हिंसाचार कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारार्ह नाही, असे म्हटले आहे. अल्पसंख्याक समाजावर जे विनाकारण हल्ले झाले ते रोखण्यामध्ये दुर्लक्ष झाले काय, याची चौकशी करण्यात यावी. तसेच त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी योग्य भूमिका बजाविली होती का, याची चौकशी करण्याचे आदेश आयोगाने गृहमंत्रालयास दिले आहेत. इस्लामचा अवमान झाल्यासंदर्भातील अफवा पसरविणार्या कथित पोस्ट फेसबुकवरून प्रस्तुत झाल्यानंतरची वृत्ते पाहिल्यानंतर मानवाधिकार आयोगाने वर उल्लेखित भाष्य केले.
अलीकडे शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लीम जमावाने लोहागरा, नारैलमधील हिंदू वस्त्यांवर हल्ले केले. त्यांची घरे पेटवून दिली, असे वृत्त ‘डेली स्टार’ने दिले होते. आकाश साहा नावाच्या १८ वर्षे वयाच्या तरुणाने इस्लामचा अवमान करणारी कथित ‘पोस्ट’ टाकल्यावरून शुक्रवारच्या नमाजानंतर त्याचा घरासमोर जमाव जमला आणि त्या जमावाने तेथे निदर्शने केली. आकाश तेथे न सापडल्याने जमावाने आजूबाजूच्या हिंदू घरांवर हल्ले केले. घरे पेटवून दिली. आपल्या घरातील सर्व किमती वस्तू जमावाने लुटून नेल्या. सगळे घरे रिकामे केल्यानंतर घर पेटवून दिले, अशी माहिती दीपाली साहा नावाच्या एका हिंदू भगिनीने दिली. हिंसाचाराचे हे धोके आमचा किती काळ पिच्छा पुरविणार? आम्हाला न्याय कोण देणार? संरक्षण कोण देणार? घर पेटविले तेव्हा जर मी घरात असते, तर मी जळून गेले असते! देवाने मला वाचविले. हे काय जगणे झाले? अंगावरच्या कपड्यांखेरीज माझ्याकडे काही उरले नाही, असे ती भगिनी म्हणाली.
दिपालीच्या मालमत्तेप्रमाणे जमावाने सहापारा गावातील अन्य तीन घरे आणि डझनभर दुकाने पेटवून दिली. आकाश साहा सापडला नाही म्हणून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी आकाशच्या वडिलांना ताब्यात घेतले. मात्र, हिंदू समाजाच्या घरांवर हल्ले करणार्या जमावातील कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बांगलादेशमधील २१ प्रतिष्ठित व्यक्तींनी हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अवघ्या महिन्याभराच्या आत नारैलमध्ये जातीय हल्ल्याची दुसरी घटना घडली. स्थानिक प्रशासन आणि राजकारणी नेत्यांकडून अशा घटना रोखणे दूरच, पण क्वचितच त्यावर त्यांच्याकडून टीका केली जाते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फेसबुक पोस्टवरून हिंदू समाजाविरुद्ध हिंसाचार उसळला होता. त्यामध्ये अनेक दुर्गा मंडपाची नासधूस करण्यात आली. १५० कुटुंबावर हल्ले करण्यात आले. त्या हिंसाचारात तीन हिंदूंना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेनंतर अनेक हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली, घरांची तोडफोड करण्यात आली. एकूणच जहाल धर्मांधांना ज्या देशामध्ये राजरोस मोकळीक दिली जाते आणि त्या देशातील अल्पसंख्य हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांना सातत्याने त्यांच्या रोषास बळी पडावे लागते. तेथील सरकारेही आंतरराष्ट्रीय दबाब आला की, काही तरी केल्याचे दाखवत असतात. त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न!’
तिबेटींकडून आंतरराष्ट्रीय न्याय दिन!
आपल्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागलेल्या तिबेटी जनतेने जगातील विविध देशांमध्ये आश्रय घेतला आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा आणि त्यांचे असंख्य अनुयायी भारतात आश्रय घेऊन आहेत. तिबेटचे विजनवासातील सरकार हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथून तिबेटी बांधवांना मार्गदर्शन करीत आहे. चीनच्या आक्रमणाविरुद्ध आवाज उठवीत आहे. चीनकडून तिबेटमध्ये मानवाधिकाराचे जे उल्लंघन होत आहे; तसेच तिबेटमध्ये तेथील जनतेवर जे अत्याचार होत आहेत, त्याच्या निषेधार्थ आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या दिवशी तिबेटी जनतेने धर्मशाला येथे जोरदार निदर्शने केली. यावेळी बोलताना तिबेटच्या मुक्तीसाठी संघर्ष करीत असलेले तेन्झिन पसांग यांनी, तिबेटमध्ये मानवी हक्काची गळचेपी होत आहे, याकडे आपल्या भाषणातून लक्ष वेधले. चिनी साम्यवादी पक्षाच्या हुकूमशाही राजवटीखाली तिबेटी जनता भरडली जात आहे.
२००९ सालापासून सुमारे १५९ तिबेटींनी आत्मदहन केल्याकडे पसांग यांनी लक्ष वेधले. गेल्या एक दशकापासून चिनी प्रशासनाने तिबेटमधील स्थानिक शाळा पद्धतशीरपणे मोडीत काढून त्याजागी निवासी शाळा उघडल्या. तिबेटी बालकांना त्यांच्या पालकांपासून तोडण्यासाठी आणि त्यांच्यावर तिबेटी संस्कृतीचे कसलेही संस्कार होऊ नयेत म्हणून चीनकडून असे करण्यात येत आहे. तिबेटी जनतेचे न्याय अधिकार हिरावून घेणार्या चीनला या सर्वांबद्दल जबाबदार धरावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदाय, जागतिक नेते, जागतिक संघटना यांना यानिमित्ताने करण्यात आले. आपल्या मायभूमीत परत जायला मिळावे यासाठी तिबेटी जनतेचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. बलाढ्य चीनला मायभूमीतून एक ना एक दिवस हाकलून लावायचे या निर्धाराने तिबेटींच्या पिढ्यांचा संघर्ष सुरू आहे. आज ना उद्या आपण मायभूमीत परत जाऊ, अशी आशा परागंदा झालेल्या तिबेटी जनतेला वाटत आहे.
केरळमध्ये पवित्र रामायण मास!
केरळ प्रांतांमधील विविध घरांमध्ये गेल्या १७ जुलैपासून पवित्र रामायण मास पाळण्यास प्रारंभ झाला. मल्याळम पंचांगातील शेवटचा ‘कार्कीदाकम’ हा महिना तेथील हिंदू समाज रामायण महिना म्हणून पाळत आला आहे. वाल्मिकी रामायणाचे अध्यात्म रामायण म्हणून मल्याळमध्ये जे भाषांतर करण्यात आले आहे, त्यातील रचनांचा पाठ या महिन्यात केला जातो. रामायणाचा पाठ करण्यासाठी, रामाची भक्ती आणि पूजापाठ करण्यासाठी हिंदूंच्या घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी दि. १७ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान हा रामायण उत्सव साजरा करण्यात येत आहे. केरळमधील सर्वसामान्य हिंदू समाजाच्या घरांमध्ये रामायण लोकप्रिय करण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक पी. परमेश्वरन यांच्याकडे जाते. १९७० मध्ये केरळमधील कोची येथे झालेल्या विश्व हिंदू संमेलनात रामायण महिना साजरा करण्याची कल्पना त्यांनी मांडली. सध्या कोरोनामुळे राज्यातील बहुतांश मंदिरे बंद असल्याने रामायण पाठ करण्याचे कार्यक्रम प्रामुख्याने घराघरांमधूनच होत आहेत. त्याचप्रमाणे विविध हिंदू संघटना ‘डिजिटल’ आणि समाज माध्यमांचा वापर करून हा उपक्रम सर्वदूर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरन यांनी सत्तरच्या दशकात जी कल्पना मांडली ती आज केरळमधील असंख्य हिंदू घरांमध्ये रुजली असल्याचे म्हणता येईल.