भरतनाट्यममध्ये कारकिर्द घडवणार्या, भरतनाट्यमचे प्रशिक्षण देणार्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भरतनाट्यम सादर करणार्या पवित्र कृष्ण भट्ट यांच्याविषयी जाणून घेऊया...
भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली असून या कलेने डोंबिवलीतील नर्तक पवित्र कृष्ण भट्ट यांना चांगलीच ओळख मिळवून दिली आहे. त्याचे प्रशिक्षण घेतानाच त्यात ते कधी समरस झाले हे त्यांनाही समजले नाही. अशाप्रकारे कलेशी एकरूप झालेल्या पवित्र यांच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी जाणून घेऊया.
पवित्र कृष्ण भट्ट मूळचे मंगळुरू येथील आहेत. पण त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यामुळे ते कर्नाटकमधील असले, तरी मुंबईत राहिल्याने त्यांना उत्तम मराठी बोलता येते. त्यांचे शालेय शिक्षण ‘डॉन बॉस्को’ येथे झाले. ‘के. जे. सोमय्या आर्ट्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालया’तून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. ‘बॅचलर ऑफ डान्स’ ही पदवी त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीने अमरावतीतून मिळवली. भरतनाट्यममधील पदव्युत्तर पदवी त्यांनी चेन्नईतून प्राप्त केली. पवित्र कृष्ण भट्ट यांच्या घरातच नृत्याचा वारसा होता. त्यांच्या आई ललिता या कर्नाटक संगीत गात होत्या. लग्नानंतर त्यांनी गायन सोडून दिले, पण गायनाची आवड मात्र सदैव सोबत राहिली. पवित्र भट्ट यांचे वडील कृष्ण भट्ट यांनादेखील कलेविषयी प्रेम होते. त्यामुळे नृत्याचे वातावरण घरातच होते. त्यामुळे पवित्रदेखील नृत्याकडे वळले. पवित्र कृष्ण भट्ट यांच्या पत्नी अपर्णा शास्त्री यादेखील भरतनाट्यम नर्तकी आहेत. पवित्र कृष्ण भट्ट यांचे पहिले गुरू वसंता आणि सुब्बलक्ष्मी हे होते. त्यांच्याकडून 14 वर्ष त्यांनी नृत्याचे धडे घेतले. त्यानंतर दीपक मसुदर गुरूजी यांच्याकडून त्यांनी भरतनाट्यमचे ‘अॅडव्हान्स’ प्रशिक्षण घेतले आहे. ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’सारख्या पुरस्कारांनी मसुदर यांना गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भरतनाट्यम शिकायला मिळाले, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे पवित्र यांनी सांगितले.
पवित्र यांनी अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यामुळे ते नियमित वाचन करीत असतात. नृत्य आणि संगीत या गोष्टीदेखील त्यांना आवडतात. तसेच अध्यात्माचीदेखील त्यांना आवड आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून पवित्र कृष्ण भट्ट भरतनाट्यम शिकायला जात असत. एक-दोन वर्षांचा ‘ब्रेक’ वगळता गेली ३० वर्षे ते भरतनाट्यमची साधना करीत आहेत. ते २० वर्षांपासून भरतनाट्यम शिकवित आहेत. नृत्य हे करिअर का निवडले? नृत्य का करतो? असे त्यांना आईवडिलांनी कधीच विचारले नाही. पवित्र कृष्ण भट्ट मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले, पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. भरतनाट्यममध्ये करिअर करू शकतो का, असा प्रश्न पवित्र यांना सुरुवातीला पडला होता. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रवास केला. भरतनाट्यममध्ये केवळ विद्यार्थी घडायचे. बॉलिवूडमध्ये ते काम करीत नव्हते. पण या क्षेत्राला करिअर म्हणून निवडण्यासाठी सगळे ठरवायचे होते. त्यासाठी पवित्र भट्ट यांनी पदवीनंतर एक वर्षाचा ‘ब्रेक’ घेतला आणि ते आपल्या गुरूसोबत कॅनडाला गेले. भरतनाट्यममध्ये करिअर होऊ शकते, हे त्यातून त्यांना समजले. समुद्राला वरून पाहून आतमध्ये काय आहे ते समजत नाही. एकदा का त्याच्या आत शिरलो की, मग ते उमगते. तसेच नृत्यक्षेत्रात उतरल्यावर आनंद मिळू लागला. आपण किती शिकू शकतो, हे समजले.
भरतनाट्यममध्ये आपण करिअर केल्यावर आपल्या कुटुंबाला सांभाळू शकतो का, हा विचार मनात होतातच. म्हणून एकीकडे भरतनाट्यम शिकणे आणि दुसरीकडे मुख्य प्रवाहातील शिक्षण घेणे या दोन्ही गोष्टी समांतर सुरू होत्या. पवित्र कॉलेजला असतानाच त्यांच्या आईची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या वडिलांनी निवृत्ती घेतली होती. त्यामुळे साहजिकच कुटुंबाची जबाबदारी पवित्रवर होती. भरतनाट्यम करताना ते माझे करिअर कधी झाले हे मलाच समजले नाही, असेही पवित्र सांगतात.पवित्र यांना मुंबई विद्यापीठातून ‘युथ फेस्टिवल’मध्ये भरतनाट्यममध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. पंडित जसराज यांच्याकडून न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना पहिले बक्षीस मिळाले आहे. तसेच त्यांच्याच हस्ते पवित्र यांना ‘आचार्य विश्वनाथ देव फाऊंडेशन टॅलेंट सर्च अवॉर्ड’ मिळाले होते. अमेरिकेत ‘अतिउत्कृष्ट युवा पुरस्कार’ मिळाला आहे. २०२२ मध्ये केंद्रीय मंत्रालयाच्या ‘वंदे भारतम् आझादी का अमृतमहोत्सव’मध्ये भरतनाट्यम या प्रकारात पवित्र यांच्या ग्रुपला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या ग्रुपला प्रजासत्ताक दिनाला परेडमध्ये राजपथ येथे भरतनाट्यम नृत्य करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये १४ मुलींनी सहभाग घेतला होता. आता सरकारकडून अनेक कार्यक्रम त्यांच्या ग्रुपला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करीत आहोत, याचा खूप आनंद झाल्याचे पवित्र यांनी सांगितले.
एलिफंटा, चेन्नई अशा अनेक फेस्टिवलमध्ये पवित्र आणि त्यांचा ग्रुपदेखील सहभाग घेत आहेत. ‘रेनड्रॉप फेस्टिवल’, ‘नेहरू सेंटर युवा उत्सव’, ‘स्वामी हरिदास संमेलन’, ‘संगीत नाटक अकादमी नृत्य प्रतिभा’, ‘नृत्यांजली’, ‘हेमा मालिनी जय स्मृती फेस्टिवल’, ‘पंडित गोपीकृष्ण महोत्सव’, ‘कृष्णगण सभा चेन्नई’, ‘ब्रह्म गण सभा’, ‘कार्तिक फाईन आर्ट्स’, ‘शनिवारवाडा फेस्टिवल’, ‘काळा घोडा फेस्टिवल’, ‘श्री कृष्ण गण सभा’, ‘पवई फाईन आर्ट्स’, ‘परिक्रमा फेस्ट’, ‘वर्ल्ड डान्स डे फेस्ट’, संगीत नाट्य अकादमी यासारख्या अनेक फेस्टिवलमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या हरहुन्नरी कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!