‘बेस्ट’च्या ‘इलेक्ट्रिक’ बसचे कंत्राट रद्द करा

16 Jul 2022 13:19:44
 
 
 best bus
 
 
 
मुंबई : “ ‘बेस्ट’ प्रशासनातर्फे ’ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आलेले २ हजार, १०० ‘इलेक्ट्रिक’ बसेसचे कंत्राट रद्द करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून कंत्राट रद्द करावे,” अशी मागणी भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवार, दि. १५ जुलै रोजी एक पत्र लिहिले आहे.


 

पत्रात अ‍ॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, “ ‘बेस्ट’ने नव्या २ हजार, १०० ‘ई-बस’ खरेदी करण्याचे कंत्राट ‘ईव्ही ट्रान्स प्रा. लि.’ या कंपनीला दिले असून ही कंत्राटाची निविदा प्रक्रिया चुकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही ‘बेस्ट’ने सदर कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा,” अशी विनंती अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.


“उलट उच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही ‘बेस्ट’ व्यवस्थापन सदर कंपनीलाच कंत्राट मिळावे, म्हणून मदत करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने याप्रकरणी हस्तक्षेप करावा,” अशी विनंती अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.


 
Powered By Sangraha 9.0