गुरुकृपावंत दाजी पणशीकर

14 Jul 2022 10:00:03

daji
 
 
जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या ग्रंथ आणि संत वाङ्मयाची बिनतोड मिमांसा करणारे गुरुकृपावंत नरहरी विष्णुशास्त्री उर्फ दाजी पणशीकर या ८९ वर्षीय चिरतरुण अवलियाविषयी...
 
 
निसर्गरम्य गोव्यातील पेडणे या गावातील पणशीकर कुटुंबात १९३४ साली जन्मलेले नरहरी पणशीकर यांचे बालपण गिरगावात ठाकूरद्वार येथे गेले. बालपणी मुंबईत त्यांच्या शेजारी राहणार्‍या हळदे काका यांच्याकडे येत-जात असताना ना. धो. ताह्मणकर यांच्या ’दाजी’ या पुस्तकाची जोरदार जाहिरात चालायची. तेव्हा, हळदे कुटुंबीयांनी नरहरी पणशीकर यांना कौतुकाने ‘हा तर ताह्मणकरांच्या दाजी सारखाच दिसतो!’ असे म्हटले, तेव्हापासून नरहरीचा ’दाजी’ झाला. त्यानंतर काही वर्षांनी आत्माराम सावंत यांनी एका लेखमालेच्या शेवटच्या लेखात त्यांच्या फोटोखाली ‘दाजी पणशीकर’ अशी नामावली टाकल्याने पुढे ‘दाजी’ हेच नाव रूढ झाले.
 
लहानपणापासूनच पौराहित्यात रमलेल्या दाजींचे आठवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच नाईट स्कुलमध्ये झाले. त्यानंतर कशीबशी दहावी करून विल्सन महाविद्यालयामध्ये अकरावी मॅट्रिकपर्यंत मजल मारली. मात्र, एका शस्त्रक्रियेमुळे त्यांना शिक्षणाला कायमचा रामराम ठोकावा लागला.दाजींचे वडील विष्णुशास्त्री पणशीकर हे व्याकरणाचार्य होते. घरच्याच पाठशाळेत पहिले गुरू पिता यांच्याकडून वेदाध्यायमृत व संस्कृतचा अभ्यास केला. दाजींचे दुसरे गुरू मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे नात्याने त्यांचे मामा होत. त्यांनी दाजींची चांगली जडणघडण केली. हेच त्यांचे विद्यागुरू, साधनेतील गुरू किंबहुना, दाजींच्या आयुष्याचे शिल्पकार होत.
 
दाजींच्या घराण्यात चार ते पाच पिढ्यांनी ‘सरस्वतीस्वरूप’ ग्रंथांचा अभ्यास केला. आजही ही परंपरा सुरू आहे. आजोबा पं. वासुदेवशास्त्री पणशीकर हे ‘निर्णयसागर प्रेस’मध्ये ५२ वर्षे मुख्य शास्त्री असल्याने तेथे संशोधन व संपादनाचे कार्य करीत. रामायण- महाभारतावर आधारित ग्रंथ, ‘योगवासिष्ठ’ इ. १०० हून अधिक ग्रंथ त्यांनी संपादित केले. त्यांचे सर्व ग्रंथ लंडनच्या विद्यापीठात संग्रहित आहेत.
 
पदरी शिक्षण नाही. मात्र, लहानपणापासून उपजत ज्ञान आणि आकलन असल्याने घरात तपासायला आलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये दाजींचा संपूर्ण सहभाग होता. पुढे पौराहित्याच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी मंदिरात नोकरी पत्करली. अडीच वर्षांतच हे काम सोडून दाजींनी पुणे गाठले. पुण्यात पहिल्यांदाच अपघाताने ‘एकनाथी भागवत’ ग्रंथाचे काम मिळाले. १९६७-६८ साली पूर्ण झालेल्या या ग्रंथांची प्रस्तावना दाजींनी लिहिली. याच ग्रथांच्या प्रकाशनात भावार्थ रामायणाचे काम मिळाले. नंतर प्रख्यात विद्वान न. र. फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाभारत ग्रंथाचे खंडही तपासले. पुण्यातील ११ वर्षांच्या कालखंडात दाजींनी ‘सकाळ’ तसेच आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ दैनिकात तसेच साप्ताहिकात लिखाण केले. ज्येष्ठ बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’मध्ये प्रशासकीय कामकाज हाताळत असताना दाजींच्या लेखणीला स्फुरण चढले. लेखन सुरू असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहामुळे १९९८ ते २०१५ एवढा प्रदीर्घ काळ ‘सामना’मध्ये रामायण-महाभारतावर त्यांनी लेखमाला लिहिल्या. त्याची पुस्तके प्रसिद्ध झाली. २००४ साली दाजी ठाण्याचे रहिवाशी बनले.
 
 
 
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ग्रंथ, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, एकनाथांची ग्रंथ संपदा, तुकारामांची गाथा आदी संतवाङ्मयाचा अभ्यास करताना दाजींच्या जीवनात आमूलाग्र बदल होत गेले. यातूनच त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. या ग्रंथसंपदेबरोबरच शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांचं समग्र वाङ्मय आजही दाजींच्या संग्रही आहे. लेखक व व्याख्याता बनल्याचे श्रेय ते लहानपणी वाचलेल्या या अभिजात वाङ्मयाला देतात. ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ज्ञानाला अधिक व्यापक स्वरूप येण्यासाठी दाजींनी १९५५ सालापासून व्याख्याने द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी २००० च्या वर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. भगवान श्रीकृष्ण आणि शिवछत्रपती यांची चरित्र समानता तसेच, कुटुंबसुत्रे, परमार्थ आणि उपासना आदी विषयांवरील व्याख्यानांतून दाजी सुबोध विवेचन करतात. यासोबतच दाजींनी विविध विषयांवर ग्रंथलेखन केले आहे. ‘महाभारत एक सुडाचा प्रवास’- याच्या नऊ आवृत्या निघाल्या आहेत. कपटनीति, अपरिचित रामायण, कर्णाचे उद्दातीकरण होत असताना दाजींनी, कर्ण खरा कोण होता? यातून कर्णाची खरी बाजू मांडून त्याकाळात खळबळ उडवून दिली होती. एकनाथ महाराजकृत ‘भावार्थ रामायण’ हा १७०४ पानांचा ग्रंथ दाजींनी संपादित केला असून याची दहावी आवृत्तीही निघाली आहे. पुराणांमधील निवडक ९८ कथांचा संग्रह ‘कथामृतम’ या ग्रंथामध्ये दाजींनी केला आहे. हिंदी भाषेतले ‘रामायण के ५१ प्रेरक प्रसंग’ याची दुसरी आवृत्ती निघाली आहे. स्तोत्र गंगा दोन (खंड) भागात आहे. या शिवाय इतरही विपुल लेखन दाजींनी केले आहे. उतारवयातही नियमित प्राणायम करून शतायुषी बनण्याची आकांक्षा बाळगलेल्या दाजींना उर्वरित आयुष्यातील क्षण न् क्षण सत्कारणी लावायचा आहे. अशा या चिरतरुण गुरूकृपावंताला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0