पाकिस्तानी कट्टरपंथी आणि युरोप

01 Jul 2022 10:46:36

pakistan 
 
 
 
 
स्वतःच्या देशाची नाचक्की होताना पाकिस्तानी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय आणखी काहीही करू शकले नाहीत. याची नुकताच प्रचिती आली ती पाकिस्तानी कट्टरपंथींनी युरोपमार्गे इस्रायलमध्ये घुसण्याचा कट रचला तेव्हा. इटलीतील गुप्तचर यंत्रणांनी हा खुलासा केल्याने मोठा कट उधळला. १२ पाकिस्तानी नागरिकांवर अटकेची कारवाई झाली. या सर्वांची गोपनीय ठिकाणावरून चौकशी होत आहे. अटक आरोपींपैकी सर्वांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे सांगितले आहे. गब्बर या एकाच गटातील सर्व १२ जण बेकायदेशीरपणे घुसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आळा. पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात राजनयिक संबंध नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक इस्रायलचा प्रवास करू शकत नाही. सौदी अरबने इस्रायललाही मान्यता दिलेली नाही.
 
 
 
‘टाईम्स ऑफ इस्रायल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पाकिस्तानातील कट्टरपंथींनी युरोपातील विविध देशांमध्ये चुकीच्या पद्धतीने घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. काहींनी तर इस्रायलमध्येही प्रवेशाच्या चोरवाटा शोधल्या. इटलीतील पोर्ट सिटी जेनेआमध्ये एका विशेष पथकाने ठिकठिकाणी टाकलेल्या धाडीत अशा १२ जणांना अटकही करण्यात आली. ही इस्रायलसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही देण्यात आला. तसेच युरोपलाही या नापाक घुसखोरीचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.
 
 
 
अटक झालेल्यांपैकी अनेकांचे दहशतवादी संघटनांच्या गटांशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले. युरोपातही हल्ले करण्याच्या तयारीत हा गट असल्याचेही त्यांनी कबुल केले. आता हा प्रकार उघड झाल्यानंतर साहजिकच युरोपातील सर्वच देश दक्ष झाले. पॅरिसमधील २०२० साली ‘शार्ली हेब्दो’ मासिकाच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्यातही पाकिस्तानचे कनेक्शन उघड झाले होते. युरोपातील कट्टरपंथींची वाढती संख्या ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. पाकिस्तानातून पद्धतशीरपणे अशा गुप्त कारवायांसाठी कट्टरपंथी घुसवले जात असल्याचा स्पष्ट आरोपही यात करण्यात आला आहे.
युरोपात दोन वर्षांपासून दहशतवादी संघटनांविरोधात जोरदार मोहीम सुरू असल्याचे दिसते. पाकिस्तानी नागरिक इटलीत कारवायांसाठी सक्रिय असून त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीसह कित्येक युरोपातील देशांंनी पाकिस्तानातील नागरिकांवर नजर ठेवली आहे. पॅरिसवर २०२० मध्ये दोन नागरिकांवर चाकू हल्ला झाला. त्यात झहीर हसन महम्मूदला अटक झाली. आता तो तुरुंगात आहे, अशी अनेक उदाहरणे तिथली प्रसारमाध्यमे देत असतात. युरोपीय देशांना इमरान खान यांच्या सत्तेच्या काळात अशाच कट्टरपंथी दहशतवादी संघटनांपासून धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
 
 
 
एकाच वेळी स्वतंत्र्य झालेल्या भारताने आपली ख्याती सातासमुद्रापार नेली. भारतीयांना जगाच्या पटलावर अभिमानाचे स्थान मिळाले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी जगात भारत कुठे आहे आणि पाकिस्तान कुठे आहे, याची कल्पना आलेलीच असेल. शिवाय दहशतवाद, कट्टरता ही विशेषणे पाकिस्तानी गुन्हेगारांशी जोडण्यात येऊ लागलीत. तसेच, जवळपास युरोपातील सर्वच देशाच्या यंत्रणांच्या रडारवर आल्याने पाकिस्तानी नागरिकांकडे पाहणार्‍या संशयी नजरा ही ओळख कायम राहिली. दिशाहीन नेतृत्व आणि राजकारणासाठी घेतला जाणारा दहशतवाद्यांचा आधार या सगळ्यामुळे जगाच्या पाठीवर झालेली या देशाची नाचक्की आणि नुकसान कधीही भरून निघणारी नाही. दहशतवाद, हिंसाचार, घृणा पसरवण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी ‘युट्यूबर्स’विरोधातील भारताची कारवाई हे त्याचे आणखी एक ताजे उदाहरण. पाकिस्तानी दूतांची अधिकृत ट्विटर खातीही भारतात बंद करण्यात आली आहेत. पाकिस्तानातील सहा ‘युट्यूब’ चॅनलवरही बंदी घालण्यात आली. कायम बंदी, निर्बंध, अशा कारवायांची पाकिस्तान्यांना आता सवयच झाली असावी. सुरुवातीला काश्मीर मुद्द्यावरुन भारताविरोधात निशाणा साधणार्‍या पाकिस्तानने आता उर्वरित भारताच्या शत्रूंशी हातमिळवणी करुन कुरघोड्या सुरू ठेवल्या आहेत. मात्र, याच देशावर ज्या ज्या वेळी संकट कोसळेल तेव्हा मात्र, सर्वात आधी भारताने मदत करावी, अशीच अपेक्षा असते. याच सगळ्या दुटप्पी धोरणांचा शेवट अखेर नाचक्कीकडेच जाणारा आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0