मुंबई(प्रतिनिधी): लोणार सरोवर आणि आसपास जंगलाला आता वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच लोणारला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यातील दहा संवेदनशील वन्यजीव अधिवास 'धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास' घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला. दि. ६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या १८ व्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यामुळे लोणार सरोवराच्या भोवतालच्या जंगलात असलेले वन्यजीव संरक्षित होणार आहेत.
लोणार सरोवर हे जागतिक किर्तीचं पर्यटन केंद्र असल्याने जगभरातून लोणार सरोवराला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. लोणार सरोवराभोवती मोठं जंगल आहे आणि या जंगलात रहिवाशांनी अतिक्रमण करुन अधिवास थाटला आहे आणि त्यामुळे या जंगलातील वन्यजीव हे धोक्यात आले आहेत. लोणारच्या भोवताली जंगलात विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ पक्षी, प्राणी आहेत आणि त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे.
लोणार सरोवराच्या परिसरातील ३.६५ चौरस किमी क्षेत्रातील रहिवाशांचे पुनर्वसन करुन हे क्षेत्र आता अभयारण्य म्हणून लवकरच विकसित करणार असल्याचा निर्णय सरकारने या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार सरोवर याठिकाणी जगभरातून पर्यटक आकर्षित होतील आणि संरक्षित वन्यजीवांचाही अभ्यास करतील अशी सरकारला अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराचा विकास खुंटला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराचा दौरा करुन विकासासाठी मोठ्या घोषणाही केल्या होत्या. पण वर्ष उलटून गेल्यावरही लोणार परिसरात कुठलही विकासाच काम सुरु झालं नाही. या वर्षीही तीन महिन्याआधी राज्यपालांनी सुद्धा लोणार सरोवराचा दौरा करुन अनेक मान्यता दिल्या पण कुठल्याही विकासाला चालना मिळाली नव्हती.
लोणार सोबतच मयुरेश्वर – सुपे (५.१४५ चौ.किमी.), बोर (६१.६४), नवीर बोर (६०.६९), विस्तारित बोर (१६.३१), नरनाळा (१२.३५), गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८ चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (२२.३७), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (२९.९०), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (२.१७) यांचा धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासंच्या यादीत समावेश आहे.